इसिस मॉड्युलप्रकरणी फराज अहमद आणि अब्दुल समद मलिकला अटक
अलिगढ मुस्लिम विद्यापीठात उप्र एटीएसची कारवाई
09-Jan-2024
Total Views | 47
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून इसिस मॉड्युलप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. एटीएसने अमास उर्फ फराज अहमद आणि अब्दुल समद मलिक या दोघांना अटक केली आहे.
उत्तर प्रदेश एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, अमासला ८ जानेवारी २०२४ रोजी अलिगढ येथून अटक करण्यात आली. त्याच्या अटकेसाठी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. असेच बक्षीस असलेला अब्दुल समद मलिक याने यापूर्वीच न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले होते.
अमास अहमद आणि अब्दुल समद मलिक हे दोघेही अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचे तपासात समोर आले आहे. ते इसिसचे समर्थक होते आणि मोठा दहशतवादी हल्ला करण्याची त्यांची योजना होती. अमास अहमद २०२२ मध्ये विद्यापाठातून मानसशास्त्रात पदवीधर झाला होता आणि २०२३ साली त्याने एमबीएची प्रवेश परिक्षा दिली होती. अब्दुल समदहा विद्यापीठात मास्टर ऑफ सोशल वर्कचे शिक्षण घेत होता. अटक केलेल्या दोन्ही संशयितांना नियमानुसार न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून पुढील तपास सुरू आहे.
काही लोक इसिससाठी काम करत असून देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. या माहितीची पुष्टी केल्यानंतर एटीएसने ३ नोव्हेंबर २०२३ रोजी गुन्हा नोंदवला आणि अब्दुल्ला अर्सलान, माझ बिन तारिक आणि वाजिहुद्दीन यांच्यासह सात जणांना अटक केली होती.