मुंबई : मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार्याने होत असलेल्या चेंबूर येथील न्यू टिळक नगर रिद्धी-सिद्धी को. ऑप.हौसिंग सोसायटीच्या स्वयंपुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ आज भाजपा विधानपरिषद गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते पार पडला. 'स्वयंपुनर्विकास' हे माझे स्वप्न असून हौसिंग सोसायट्यांनी स्वतःच्या इमारतीचा पुनर्विकास स्वतःच करावा, अशा प्रकारची भुमिका घेऊन हे अभियान मुंबई शहरात सुरू केल्याचे दरेकर यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, स्वयंपुनर्विकास योजने अंतर्गत हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. स्वयंपुनर्विकास हे माझे स्वप्न आहे. हौसिंग सोसायट्यांनी स्वतःच्या इमारतीचा पुनर्विकास स्वतःच करा अशा प्रकारची भुमिका घेऊन या मुंबई शहरात हे अभियान मी सुरू केले. त्यावेळेस काहींना वाटले सोसायटी कसा स्वयंपुनर्विकास करणार. मी सांगितले पैशाची व्यवस्था मुंबई जिल्हा बँक करेल, आर्किटेक, जेजे मार्गदर्शन पाहिजे ते मुंबई जिल्हा बँक करेल. इतकेच नाही तर शासन दरबारी एक खिडकी योजना करून स्वयंपुनर्विकासासाठी वेगवेगळ्या सवलती दिल्या जातील. अशा प्रकारची भुमिका घेतल्यानंतर मुंबईत १६०० स्वयंपुनर्विकासाचे प्रकल्प आमच्याकडे आले. त्यापैकी ३७ प्रकल्पना आम्ही ४००-५०० कोटीचे कर्ज मंजूर केले आणि त्यातील स्वयंपुनर्विकासाच्या १२ इमारती उभ्या राहिल्या असल्याचेही दरेकरांनी म्हटले.
यावेळी दरेकर यांनी गोरेगाव येथे गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेत स्वयंपुनर्विकासासाठी १०-१२ सवलती जाहीर केल्या. तशा प्रकारचे शासन निर्णयही झाले असल्याचे सांगितले. त्याचबरोबर सरकारने सोसायटीचे चार टक्के व्याज दर घ्यावे. म्हणजे १२ टक्के व्याज दर असेल तर ८ टक्के सोसायटीची लोकं देतील, चार टक्के शासनाने द्यावे. जेणेकरून सोसायटीच्या सभासदांवर भार कमी येईल, अशी मागणी केली असून येणाऱ्या काळात ती पूर्ण करून घेऊ, असेही दरेकरांनी आश्वस्त केले.
डिम्ड कन्व्हेन्स बाबत बोलताना दरेकर म्हणाले की, पूर्वी डिम्ड कन्व्हेन्स होते. मात्र प्रत्यक्षात ते होतच नव्हते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्यात बदल केला की, डिम्ड कन्व्हेन्स केले नाही तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल आणि त्या निश्चित दिवसांत खऱ्या अर्थाने डिम्ड कन्व्हेन्स झाले. कायद्यात बदल केल्याने आज जास्तीत जास्त सोसायट्यांचे डिम्ड कन्व्हेन्स होतेय.
जिल्हा बँकेकडे स्वयंपुनर्विकासासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाची मागणी आली आहे. १६०० प्रकल्प आमच्याकडे मागणी करताहेत. किती पैसे द्यायचे याबाबत मुंबई बँकेला मर्यादा आहेत. म्हणून आम्ही राज्य सहकारी बँकेबरोबर कॉन्सर्शियम करून या प्रकल्पांसाठी पैसे देण्याची व्यवस्था करतोय. याबाबत नाबार्डलाही सांगितलेय की, या स्वयंपुनर्विकासासाठी हजार कोटी रुपये पुनर्वित्त करायला द्या. नाबार्डने त्याला मंजुरी देत देण्याचे कबूल केले आहे. हजार कोटी रुपये नाबार्डने दिले तर अशा प्रकारचे आणखी प्रकल्प गतीने पूर्ण करू शकू, असेही दरेकर यावेळी म्हणाले.
या शुभारंभ प्रसंगी मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई बँकेचे संचालक जिजाबा पवार, मा. नगरसेवक राजा चौगुले, एकनाथ जगताप, सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत तावडे, सेक्रेटरी आनंद राऊत यांसह रहिवासी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.