‘फॉक्सकॉन’चे सीईओ आणि तैवानी नागरिक असलेले यंग लिऊ यांना नुकताच ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ‘पद्मभूषण’ पुरस्कार यादीतील ते एकमेव विदेशी नागरिक. लिऊ यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर करणे हा ‘फॉक्सकॉन’च्या भारतातील आजवरच्या योगदानाचा हा सन्मानच. तसेच या पुरस्काराने चीनला शह देण्याबरोबरच ‘फॉक्सकॉन’च्या भारतीय गुंतवणुकीचा मार्गही अधिक प्रशस्त केला आहे. त्याचे आकलन...
तैवानचे यंग लिऊ यांचा उद्योजकतेचा प्रवास हा प्रेरणादायी असाच. १९८८ मध्ये एका छोट्या मदरबोर्ड कंपनीपासून सुरुवात करून, त्यांनी आज ‘फॉक्सकॉन’ला जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनीत परिवर्तित केले आहे. यात ७० टक्क्यांपेक्षा अधिक ‘आयफोन’ तसेच इतर असंख्य इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्ड्स एकत्र केले. ही उल्लेखनीय यशोगाथा लिऊ यांचे दूरदर्शी नेतृत्व, धोरणात्मक भागीदारी तसेच नावीन्यपूर्णतेची बांधिलकी यातूनच लिहिली गेली आहे.
आपल्या प्रभावशाली जागतिक कामगिरीच्या पलीकडे, लिऊ यांनी भारतात केलेली गुंतवणूक ही भारताच्या वाढीला चालना देणारीच ठरली. देशांतर्गत वाढती इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठ तसेच येथे उपलब्ध असलेले, कुशल कर्मचारी बळ यांच्यातील क्षमता ओळखून, त्यांनी देशात लक्षणीय गुंतवणूक केली. ‘फॉक्सकॉन’ने भारतभर अनेक उत्पादन सुविधा स्थापन केल्या असून, हजारो रोजगार निर्माण केले. तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांना चालना देण्याबरोबरच ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमामधील त्यांचे योगदान हे केवळ असाधारण.
लिऊ यांनी ’फॉक्सकॉन इंडिया इनोव्हेशन हब’सारख्या उपक्रमांद्वारे तसेच भारतीय विद्यापीठे आणि संशोधन संस्थांसोबत भागीदारी करत, कायमच नावीन्यपूर्ण, तंत्रज्ञान हस्तांतरणाला सक्रियपणे प्रोत्साहन दिले. या सहकार्याचे उद्दिष्ट स्वदेशी प्रतिभेला चालना देणे, तसेच स्थानिक तंत्रज्ञान परिसंस्थेची जपवणूक करणे, हे आहे. यातूनच विकासाला चालना मिळताना दिसते. लिऊ हे भागीदारी आणि मुत्सद्देगिरीचे मूल्य ओळखतात. तैवानशी भारताचे संबंध अधिक मजबूत करण्यात, सांस्कृतिक देवाणघेवाण सुलभ करण्यात तसेच आर्थिक सहयोगात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांचे प्रयत्न प्रादेशिक स्थिरतेला चालना देण्यासाठी, तसेच परस्पर समंजसपणा वाढवण्यासाठी मोलाचे ठरले आहेत.
कोणत्याही अन्य बड्या उद्योग समूहाप्रमाणेच, ‘फॉक्सकॉन’ने आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला, ज्यात कामगार पद्धती तसेच पर्यावरणीय परिणामांबद्दलची चिंता यांचादेखील समावेश होता. तथापि, त्यांनी त्यांचे निराकरण केले असून, कामगार-अनुकूल धोरणे लागू करणे, सुरक्षा मानकांच्याच सुधार घडवून आणणे, तसेच पर्यावरणाला अनुकूल अशा उपक्रमांमध्ये गुंतवणूक करणे यांचा समावेश आहे. ’कृत्रिम बुद्धिमत्ता’ तसेच ’स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग’ यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी भविष्यातील केंद्र म्हणून ते भारताकडे पाहतात. ‘फॉक्सकॉन’ भारतात सातत्याने वाढवत असलेली गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरणासाठीचे प्रयत्न तसेच प्रतिभेला चालना देणारे विविध उपक्रम यातूनच ‘फॉक्सकॉन’ने भारतात उत्पादन केंद्राचा पाया रचला आहे.
लिऊ यांच्यासाठी हा पुरस्कार म्हणजे त्यांचा स्वतःचा गौरव नसून, देशाची आर्थिक वाढ, तांत्रिक क्षेत्रातील प्रगती यात भारताने जे योगदान दिले आहे, त्या भारताचे हे कौतुकच आहे. देशातील महत्त्वाकांक्षी उद्योग तसेच नवोन्मेषकांसाठी ते प्रेरणादायी असेच. भारत जगभरात उत्पादन केंद्र म्हणून चीनला समर्थ पर्याय म्हणून उदयास येत आहे. ‘फॉक्सकॉन’ने भारतात त्यासाठी जी गुंतवणूक केली, ती उत्पादनाला चालना देणारी ठरली, हे वास्तव. हा ’पद्मभूषण’ पुरस्कार भारताच्या आर्थिक परिदृश्यात ‘फॉक्सकॉन’च्या योगदानाकडे लक्ष वेधणारा ठरला आहे. तो केवळ कंपनीने भारतात केलेली गुंतवणूक इतकाच मर्यादित नसून, ‘फॉक्सकॉन’ने भारतासाठी ज्या नव्या संधींची दारे उघडली, त्याही पलीकडे जाऊन पाहिले पाहिजे.
’फॉक्सकॉन’ आणि भारत
’फॉक्सकॉन’चा भारतातील प्रवास २००६ मध्ये चेन्नईमध्ये पहिल्या उत्पादन केंद्राच्या स्थापनेपासून सुरू झाला. ’फॉक्सकॉन’च्या भविष्यातील भारतातील वाढीचा श्रीगणेशा यातूनच झाला. आज देशभरात कंपनीचे नऊ उत्पादन सुविधा प्रकल्प आहेत. या प्रकल्पातून हजारो रोजगार दिले जात आहेत. देशातील विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रांची पूर्तता ही केंद्र करतात, तर ७० हजारांहून अधिक कुशल कामगारांना रोजगार देतात. तसेच भारताच्या वाढत्या उत्पादन परिसंस्थेत थेट योगदान देतात. ’फॉक्सकॉन’ची प्रमुख ओळख ही ‘अॅपल’साठी ‘आयफोन’ निर्माण करणारी कंपनी अशी असली, तरी ती इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात विविध प्रकारची उत्पादने घेते. यात स्मार्टफोन, टेलिव्हिजन, सेट-टॉप बॉक्स, नेटवर्किंग उपकरणे तसेच इलेक्ट्रिक वाहनांसह विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्सचे उत्पादन करते. देशांतर्गत बाजारपेठेतील वाढती मागणी कंपनीच्या उत्पादनांना बळ देणारी ठरत असून, त्यातूनच ‘फॉक्सकॉन’ देशात नवनवे प्रकल्प उभारत आहे. चेन्नईमध्ये कंपनीने ’फॉक्सकॉन इंडिया इनोव्हेशन हब’ची स्थापना करून, कंपनी ’आर अॅण्ड डी’ तसेच नवोन्मेषामध्ये सक्रियपणे गुंतवणूक करते. हे हब भारतीय विद्यापीठे आणि संशोधन संस्थांसोबत सहकार्य वाढवते, स्थानिक प्रतिभांचे पालनपोषण करते. तसेच ’५-जी’ तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स यांसारख्या क्षेत्रात अत्याधुनिक संशोधन चालवते.
‘फॉक्सकॉन’ची भारतासाठीचे धोरण ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या महत्त्वाकांक्षेशी सुसंगत असेच. कंपनी भारत सरकारसोबत सक्रियपणे सहकार्य करते, विविध धोरणात्मक संवादांमध्ये भाग घेते आणि अनुकूल व्यावसायिक वातावरणाच्या विकासासाठी योगदान देते. जागतिक उत्पादन केंद्र म्हणून भारताच्या भविष्यासाठी या भागीदारीमध्ये प्रचंड अशी क्षमता आहे. यंग लिऊ यांना प्रदान करण्यात आलेला ‘पद्मभूषण’ पुरस्कार हा ‘फॉक्सकॉन’च्या भारतातील गुंतवणुकीच्या पलीकडचा आहे. केवळ एक कंपनी आणि तिची गुंतवणूक असे याकडे न पाहता, ज्या कंपनीने भारतात हजारो रोजगार दिले, उत्पादन केंद्र म्हणून उदयास येण्यासाठी असलेल्या क्षमतांची जाणीव करून दिली, नवनिर्मितीसाठीची बीजे पेरली त्यांचा विचार व्हायला हवा. ’फॉक्सकॉन’ने भारताच्या आर्थिक वाढीत दिलेले हे योगदान अमूल्य असून, भारताच्या विकासाची बीजे त्यात रोवलेली आहेत, असे म्हटले तर फारसे चुकीचे ठरणार नाही.