स्त्री ही आपल्या आयुष्यात अनेक प्रकारची स्थित्यंतरे अनुभवत असते. तिला अनेक प्रकारच्या शारीरिक तसेच मानसिक बदलांना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे अनेक भूमिकाही तिला पार पाडाव्या लागतात. विविध प्रकारच्या जबाबदार्या स्वीकाराव्या लागतात. विधात्याने स्त्रीचे शरीर बनवताना त्यानुसारच बनवलेले आहे.
लहान मुलगी, वयात आलेली मुलगी, विवाहित स्त्री, माता, रजोनिवृत्तीला आलेली स्त्री, रजोनिवृत्तीनंतरची स्त्री, अशी अनेक शारीरिक व मानसिक स्थित्यंतरे ही स्त्री आयुष्यात निभावून नेते. या सर्व कालखंडात स्त्रियांना अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक अडचणी, तसेच आजारांना सामोरे जावे लागते. स्त्रीरोगांचा सखोल अभ्यास करणार्या या वैद्यकीय शाखेला ‘गायनॅकोलॉजी’ असे म्हटले जाते. या ‘गायनॅकोलॉजी’मध्ये सर्वांत उपयुक्त, खात्रीशीर आणि अत्यंत सुरक्षित उपचार पद्धती म्हणजे होमियोपॅथी. होमियोपॅथीच्या उपयुक्ततेमुळेच नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात ५९ टक्के लोकांनी होमियोपॅथीक उपचार पद्धतीला प्रथम पसंती दिली आहे. होमियोपॅथी ही संथ काम करते व आजार बरा होण्यास वेळ लागतो, हा मोठा गैरसमज लोकांच्या मनातून दूर झाल्यावर तर होमियोपॅथीची औषधप्रणाली संपूर्ण जगात झपाट्याने लोकप्रिय होत आहे.होमियोपॅथीच्या याच उपयुक्ततेचा अभ्यास करून भारत सरकारने आयुष मंत्रालय स्थापन केले व होमियोपॅथीला राजाश्रय दिला.
स्त्रीरोगामध्ये स्त्रीच्या फक्त शरीराचा अभ्यास केला जात नाही, तर स्त्रीच्या आयुष्यात होणार्या विविध स्थित्यंतरांमध्ये स्त्रीच्या मानसिकतेमध्ये झालेला बदलही अभ्यासला जातो. विविध प्रकारच्या वयोगटात संप्रेरकांमुळे म्हणजेच हार्मोन्समुळे स्त्रीच्या शरीराबरोबरच मानसिक भावना व स्वभावही बदलत असतो. या होणार्या बदलांचा अभ्यासही तितकाच महत्त्वाचा. स्त्री म्हणजे नुसते शरीर नाही, तर त्यामागेही काहीतरी असते. माणूस हा शरीर, मन व ऊर्जा किंवा आत्मा यांनी बनलेले असते. या तीनही गोष्टी एकमेकांना पूरक असतात. यातील एकही गोष्ट एकमेकांशिवाय राहू शकत नाही. म्हणजेच शरीराशिवाय मन आणि ऊर्जा यामुळे माणूस बनतो. या ऊर्जेलाच आपण ‘चैतन्यशक्ती’ असे म्हणतो.
स्त्रीरोगामध्ये जर संपूर्ण अभ्यास करायचा असेल, तर त्यात होमियोपॅथीने अत्यंत महत्त्वाचे असे योगदान दिले आहे.होमियोपॅथी ही एकमेव औषधप्रणाली आहे की, ती स्त्रीच्या शरीराबरोबर मन व चैतन्यशक्तीचादेखील अभ्यास करते. शरीरावर होणारे बदल, मानसिकता, संप्रेरकांमध्ये होणारे महत्त्वपूर्ण बदल यांची सांगड घालते व यांच्या एकत्रित अभ्यासानेच स्त्रीरोग हा नीट समजून घेतला जातो व त्याच्यावर नैसर्गिक उपचार केले जातात. कारण, होमियोपॅथीतील औषधे ही संपूर्णपणे नैसर्गिक तत्वांपासून बनवली जातात. जेव्हा एखादी स्त्री उपचारासाठी येते, तेव्हा तिच्या सर्वसाधारण शारीरिक लक्षणांवरून तिला झालेल्या आजाराचे भौतिक निदान करता येते. म्हणजेच काय तर आजाराला एखादे विशिष्ट असे नाव देता येते. परंतु, नुसते भौतिक निदान करून उपयोगाचे नसते, याच ठिकाणी होमियोपॅथीक डॉक्टरांचा वेगळेपणा व उत्कृष्टता सिद्ध होते. होमियोपॅथी डॉक्टर जेव्हा अशा रुग्णांला तपासतात, तेव्हा नुसते शारीरिक निदान करून थांबत नाही, तर त्या रुग्णांची सखोल माहिती घेऊन त्याचा अभ्यास करतात व शरीराच्या लक्षणांची सांगड मन व चैतन्यशक्तींशी घालून आजाराचे मूळ कारण शोधून काढतात.
(क्रमश:)
डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
९८६९०६२२७६