" 'ती' बालस्वरुप रामललाची मूर्ती नाहीच"; काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान
19-Jan-2024
Total Views | 60
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता काँग्रेसचे मोठे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी रामललाच्या मूर्तीविषयी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी मूर्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
राम मंदिराच्या गर्भगृहात विराजमान झालेल्या मूर्तीवर प्रतिक्रिया देताना दिग्विजय सिंह म्हणाले की, "मी सुरुवातीपासून म्हणत आलो आहे की रामललाची मूर्ती कुठे आहे? दुसऱ्या मूर्तीची काय गरज होती? शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद जी महाराज यांनीही रामाची मूर्ती बसवावी असे सुचवले होते. रामजन्मभूमी मंदिरातील मूर्ती बालस्वरूपात असावी आणि माता कौशल्याच्या मांडीवर असावी, परंतु मंदिरात ठेवण्यात आलेली मूर्ती बालकाच्या रूपात असल्याचे दिसून येत नाही."
रामललाची मूर्ती कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे. या मूर्तीची उंची ५१ इंच आहे, अशी माहिती मंदिर ट्रस्टने दिली होती. या मूर्तीचे वजन १.५ टन असल्याचे सांगण्यात येत आहे. आज दि. १९ जानेवारी २०२४ शुक्रवारी सकाळी रामललाची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात विराजमान करण्यात आली. मूर्ती विराजमान होताच, दिग्विजय सिंह यांच्या वादग्रस्त निधानामुळे नव्या वादाला तोंड फुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.