पाशा पटेल यांना 'श्री गोविंदभाई मेमोरियल अवॉर्ड' जाहीर !
05-Sep-2023
Total Views | 46
मुंबई : कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी अथक परिश्रम घेवून देशातील तेलबिया उत्पादना संदर्भात शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी विशेष कार्य केलं आहे. त्यांचा या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेऊन द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबई आणि जीजीएन रिसर्च राजकोट/इंदूरच्या सहकार्यानं यंदाच्या 'श्री गोविंदभाई मेमोरियल अवॉर्ड' करता त्यांची निवड करण्यात आली आहे.
द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबई यांच्या ६०व्या वार्षिक समारंभात पाशा पटेल यांना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोखरक्कम आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
तेलबिया उत्पादक शेतकर्यांना अतुलनीय पाठिंबा आणि त्यांचा प्रती असणारी तळमळ यामुळे पाशा पटेलांची 'श्री गोविंदभाई मेमोरियल अवॉर्ड २०२२-२३' करता निवड केल्याचे द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबईचे अध्यक्ष अजय झुनझुनवाला यांनी सांगितलं आहे.
देशातील तेलबिया उत्पादन वाढवण्यासोबतच बांबू लागवड क्षेत्रातील त्यांचे कामदेखील महत्त्वपूर्ण आहे. डिझेल, पेट्रोल, दगडी कोळसा, प्लॅस्टिक, ॲल्युमिनियम या प्रदूषण पसरविणाऱ्या घटकांना भविष्यात पर्याय शोधण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे. या सर्वांना पर्यावरणपूरक बांबू हा कसा पर्याय आहे, याचे महत्त्व पाशा पटेल हे गेल्या पाच वर्षांपासून पटवून देण्याचे काम करत आहे.