युद्ध संग्रहालयाशी जोडले जाणे भाग्याचे; फडणवीसांच्या हस्ते लेहमध्ये त्रिशुळ युद्ध संग्रहालयाचे भूमिपूजन

लष्करी अधिकाऱ्यांसह मान्यवरांची उपस्थिती

    03-Sep-2023
Total Views | 33
Government of Maharashtra Devendra Fadnavis

लेह :
महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने उभारण्यात येत असलेल्या लेहमधील त्रिशूल युद्ध संग्रहालयाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्रिशुळ युद्ध संग्रहालयाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात झाले. 'राज्य सरकारने या कामासाठी ३ कोटींचा निधी दिला असून येत्या काळात आवश्यकता पडली तर तो निधीही दिला जाईल. युद्ध संग्रहालयाच्या कामासोबत महाराष्ट्र जोडला जाणे आमच्यासाठी भाग्याचे आहे," अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

लेहच्या करू भागात महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने उभारण्यात येणाऱ्या संग्रहालयाचे भूमिपूजन रविवारी पार पडले. यावेळी युद्ध संग्रहालयाची संकल्पना मांडणारे भाजप आमदार श्रीकांत भारतीय, 14 कोर कमांडर लेफ्टनंट जनरल रशीम बाली, मेजर जनरल पी. के. मिश्रा उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्रिशूळ हे उत्पत्ती, स्थिती आणि लयाचे प्रतीक आहे. त्रिशूळ हे शौर्याचे प्रतिक आहे. त्रिशूळ डिविजनने सुद्धा असेच शौर्य कायम दाखविले आहे. जेथे श्वास घेणे कठीण आहे, अशा ठिकाणी तुम्ही पराक्रम गाजवताय. आम्ही तुमच्या शौर्याला सलाम करतो. देशाचा सन्मान वाढविण्यात लष्कराची भूमिका अतिशय महत्वाची आहे आणि त्यात त्रिशूळ डिविजनचे योगदान महत्वपूर्ण आहे.

आज भारत सर्व क्षेत्रात प्रगती करतो आहे. चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यावर आता भारताने सूर्याची मोहीम हाती घेतली आहे. भारत आज जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. लष्करासाठी दुर्गम भागात रस्ते, पुल अशा सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण केले जात आहे. या संग्रहालयामुळे सीमावर्ती भागात पर्यटनाला सुद्धा मोठी चालना मिळेल आणि महाराष्ट्रातील पर्यटक येतील, तेव्हा त्यांना अभिमान वाटेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सुमारे वर्षभरापूर्वी त्रिशुळ युद्ध संग्रहालयाची संकल्पना उदयास आली होती. महाराष्ट्रातील अ‍ॅड. मीनल भोसले आणि सारिका मल्होत्रा या दोन महिलांनी या भागात भेट दिली, तेव्हा या संकल्पनेचा उदय झाला. त्यांनी श्रीकांत भारतीय यांच्या कानावर हा विषय टाकला आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर यासाठीचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारने घेतला. राज्य सरकारने हा निधी दिल्याबद्दल लेफ्ट. जनरल रशीम बाली, मेजर जनरल पी. के. मिश्रा यांनी यावेळी बोलताना महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत.

यावेळी लष्करी शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसेच स्थानिक नागरिकांचा समावेश असलेला एक सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा यावेळी आयोजित करण्यात आला होता. त्रिशूळ युद्ध स्मारकानजीक हे संग्रहालय उभारण्यात येत असून, ते त्रिशुळाच्या आकाराप्रमाणे असणार आहे. यात तीन प्रदर्शन कक्ष असणार असून, त्यात १९६२ , १९६५ , १९७१, १९९१ आणि अगदी अलिकडच्या काळात झालेल्या कारवायांमधील शहीदांच्या स्मृती असणार आहेत.

त्रिशूळ विभागविषयी थोडक्यात

हे त्रिशुळ विभाग साहसी जवानांचे असून, एकिकडे पाकिस्तान तर दुसरीकडे चीन अशा दुहेरी क्षेत्रात भारताच्या अखंडतेसाठी ते कार्यरत असतात. या संग्रहालयात पाषणशिल्प, या त्रिशुळ डिविजनच्या स्थापनेचा इतिहास, विविध अभियानांमध्ये मिळालेले यश, युद्धात वापरलेले शस्त्र, दारुगोळा, वाहने, संपर्क व्यवस्था, जवानांनी कुटुंबीयांशी केलेला पत्रव्यवहार इत्यादी बाबी असणार आहेत. १९६२ च्या युद्ध काळात या डिविजनची स्थापना करण्यात आली होती. आतापर्यंत १५० वीरता पुरस्कार या विभागाला मिळालेले आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121