ठाणे : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते, पालघर व ठाणे जिल्हा समन्वयक आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला हे गणेश दर्शनासाठी गेले असता कळवा पूर्व येथील, आतकोनेश्वर नगर, घोलाई नगर, पोंडपाडा, भास्कर नगर झोपडपट्टीतील महिलांनी पिण्याचे पाणी मिळत नसल्याबद्दल स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरूद्ध तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी कळवा पूर्व येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन आनंद परांजपे व नजीब मुल्ला यांनी येथील जनतेला दिले.
कळवा पूर्व येथील आतकोनेश्वर नगर, घोलाई नगर, पोंडपाडा, भास्कर नगर परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवांच्या गाठीभेटी घेत असताना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार, कळवा पूर्व भासपडपट्टीतील महिलांनी व नागरिकांनी ठाणे जिल्हाध्यक्ष परांजपे तसेच प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्याकडे केली. स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड हे गेली तीन टर्म आमदार असूनही, येथील जनतेच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली नसल्याबद्दल तीव्र रोष व्यक्त केला.
याबाबत संतप्त रहिवाशांशी बोलताना आनंद परांजपे म्हणाले की, “संध्याकाळपासून मी व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, ज्येष्ठ माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, समाजसेवक राजनाथ सिंह, युवक जिल्हाध्यक्ष नित्यानंद वाघमारे, युवक कार्याध्यक्ष संदेश पाटील, परिवहन सदस्य मोहसीन शेख, प्रदेश युवक सचिव परवेज चौधरी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गायकवाड आदी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कळवा पूर्व वस्तीतील या डोंगर परिसरात गणरायाचे आशीर्वाद घेण्यासाठी घरोघरी जात आहोत. यावेळी लोकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्ही अनुभवत आहोत. लोकांना आता बदल हवा आहे.