मुंबई : गिरणी कामगारांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) 'म्हाडा'ला प्राप्त होणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील रांजगोळी, रायचूर व रायगड जिल्ह्यातील कोल्हे येथे प्राप्त होणाऱ्या २५२१ सदनिकांची सोडत लवकरच जाहीर करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केले. सन २०२० मध्ये बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी जाहीर सोडतीतील १३१ यशस्वी पात्र गिरणी कामगार/वारस यांना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते चावी वाटप करण्यात आले.
दरम्यान, वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमांतर्गत मुंबई मंडळातर्फे सन २०२० मध्ये बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी जाहीर सोडतीतील १३१ यशस्वी पात्र गिरणी कामगार/वारस यांना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते चावी वाटप करण्यात आले. यावेळी अतुल सावे म्हणाले, सन २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर सोडतीतील ३०३८ पैकी ८५६ यशस्वी पात्र गिरणी कामगार/ वारस यांना आतापर्यंत तीन टप्प्यांतर्गत सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले आहे.
तसेच, येत्या वर्षभरात गिरणी कामगारांना जास्तीत जास्त घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. काही गिरणी कामगारांनी पश्चिम महाराष्ट्रात गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून पश्चिम महाराष्ट्रात गिरणी कामगारांसाठी काही योजना राबवता येईल का याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचे अतुल सावे यांनी सांगितले.
गिरणी कामगार घर सनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे म्हणाले की, येत्या सप्टेंबरपर्यंत बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील ५०० यशस्वी पात्र गिरणी कामगार/ वारस यांना सदनिकांच्या चावीचे वाटप केले जाणार आहे. विजयादशमीपर्यंत या सोडतीतील सर्व गिरणी कामगारांना चावी वाटप करण्याचे नियोजन आहे. रायगड जिल्ह्यातील मौजे कोन येथील एमएमआरडीएने उभारलेल्या व सन २०१६ मध्ये जाहीर सोडतीतील १९४८ यशस्वी गिरणी कामगार/वारस यांना ऑक्टोबरमध्ये सदनिकांचा ताबा दिला जाणार असल्याचे आमदार सुनील राणे यांनी सांगितले.
यावेळी गिरणी कामगार घर सनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, म्हाडाचे सचिव राजकुमार सागर, मुंबई मंडळाच्या सहमुख्य अधिकारी नीलिमा धायगुडे आदी उपस्थित होते.