ठाणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारताची महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सन २०४७ पर्यंत भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केले आहे. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी व देशाला महासत्ता बनविण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान असावे, यासाठी ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार अहोरात्र काम करीत आहे. तेव्हा, आपण सर्वजण मिळून भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करुया, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांनी केले.
स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण ना. चव्हाण यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंह आदीसह प्रशासनातील इतर अधिकारी-कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. सुरुवातीस ना. चव्हाण यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्मांचे स्मरण करीत अभिवादन करून जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना ना. चव्हाण म्हणाले की, गेल्या वर्षभराच्या काळात गरीब, वंचित, शेतकरी, युवा, महिला, बेरोजगार अशा सर्वच घटकांसाठी सरकारने निर्णय घेतले असुन महाराष्ट्र नव्याने घडविण्यासाठी अनेक उपक्रमांना चालना देण्यात आली आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ मिळावा, या दृष्टीने शासन सदैव प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील वार्षिक योजनांसाठी नियोजन समितीच्या माध्यमातुन ७५० कोटी इतका निधी मंजूर झाल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईच्या शेजारी असलेला ठाणे जिल्हा हा महत्त्वाचा जिल्हा असून या जिल्ह्याच्या विकासात अनेक आव्हाने आहेत. ठाणे जिल्ह्याचे नागरीकरण झपाट्याने होत असताना मुरबाड, शहापूर सारख्या आदिवासी भागाच्या विकासाच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे ना.चव्हाण यांनी सांगितले. या सोहळ्यात स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे नातेवाईक, तसेच उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या गुणवंत अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
शिवसेनेच्या मध्यरात्री ध्वजारोहणाच्या वादाला पूर्णविराम
ठाणे जिल्हा शिवसेना मध्यवर्ती शाखेत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री झेंडा फडकावण्याची परंपरा धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्यापासुन सुरु आहे. ही परंपरा,विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम ठेवली आहे.गेल्यावर्षी शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याने तणावाचे वातावरण होते. गतवर्षी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना नौपाडा पोलिसांनी नोटीसाही बजावल्या होत्या. पण यंदा ठाकरे गटाने स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची जागा बदलूनठाण्यातील चंदनवाडी येथील पहिल्या शिवसेना शाखेत ध्वजारोहण केल्याने दोन्ही गटातील वादाला पूर्णविराम मिळाला.
ठाणे महापालिकेने केला टीडीआरएफ जवानांचा सन्मान
ठाणे महापालिकेच्यावतीने स्वातंत्र्यदिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिका मुख्यालयात आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या १० प्रातिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर, इर्शाळवाडीसह इतर आपत्तींमध्ये बचाव आणि मदत कार्य करणाऱ्या ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या (टीडीआरएफ) ३३ जवानांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक नारायण पवार, संदीप लेले, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर पालिकेतील राष्ट्रपुरूषांच्या प्रतिमांना, तसेच शहरातील विविध ठिकाणच्या महनीय व्यक्तींच्या पुतळयांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
ठाणे झेडपी मध्ये ध्वजारोहण
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्याहस्ते जिल्हा परिषदेचे प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले व ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी 'मेरी माटी मेरा देश' अंतर्गत सेल्फी पॉइंटचे उद्घाटन करून पंचप्राण शपथ तसेच तंबाखु मुक्त भारत शपथ घेण्यात आली.याप्रसंगी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी ललिता दहितुले तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.