मुंबई : मुंबईसह राज्यातील सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांची घरे उपलब्ध करण्याकरीता गृह निर्मितीचा वेग वाढविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या वतीने विभागातील ४ हजार ८२ घरांची सोडत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, म्हाडा’वरील लोकांचा विश्वास वाढतोय. यामुळेच या सोडतीसाठी १ लाख २० हजार १४४ अर्ज आले. हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ‘म्हाडा’च्या घरांची लॉटरी पारदर्शकपणे काढण्यात येत आहे. यामध्ये मानवी हस्तक्षेप नाही. पूर्णपणे संगणकीकृत पद्धतीचा वापर केला आहे.
'म्हाडा’ने घरे निर्मिती साठी हौसिंग स्टॉक घ्यावा - देवेंद्र फडणवीस
म्हाडा’ने अधिकाधिक घरे निर्माण करावीत. मुंबईतील नागरिकांची मागणी वाढली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात घरे निर्माण करावीत. आता प्रीमियम ऐवजी हौसिंग स्टोक घ्यावा तसेच ‘म्हाडा’ला मोफत जमीन मिळते त्यामुळे म्हाडाच्या घरांच्या किमती खासगी बिल्डरांच्या घरांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. शासनाचेही हेच स्वप्न आहे, की सर्व सामान्यांना कमी किमतीत घरे उपलब्ध व्हावीत यासाठी शासन ‘म्हाडा ’च्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न करील आणि पुढील सोडतीमधील घरांच्या किमती इतर घरांपेक्षा कमी असतील.
सर्वसामान्य जनतेला त्यांच्या उमेदीच्या काळात घराचे स्वप्न साकार झाले. तर त्याचा मोठा आनंद संबंधितांच्या परिवारास होतो. त्यामुळे गृहनिर्माण प्रकल्पांचा वेग वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. म्हाडा पारदर्शकपणे सोडत काढून जनतेचा विश्वास जिंकत आहे. म्हाडा पुनर्विकास करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. नवनवीन योजना राबवीत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
गृहनिर्माण मंत्री सावे म्हणाले की, घरांची मागणी वाढत आहे. लवकरच पुढील सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीमध्ये ज्यांना घराची लॉटरी लागली नाही त्यांना पुढच्या लॉटरीत कागदपत्रांची पडताळणीची आवश्यकता असणार नाही. गृहनिर्माण प्रकल्पांची त्यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष जयस्वाल यांनी प्रास्ताविक केले. अपर मुख्य सचिव वल्सा नायर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, पालकमंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, आमदार मंगेश कुडाळकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, म्हाडाचे उपाध्यक्ष संजय जयस्वाल, समितीचे अध्यक्ष जॉनी जोसेफ उपस्थित होते.