पुणे : कोंबिंग ऑपरेशन आणि गुन्हेगार तपासणी मोहिमेदरम्यान काही गुन्हेगारांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. हे आरोपी स्टेट बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकणार होते. ही घटना शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास वारजे येथील रोजरी स्कूलजवळ घडली. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून पोलिसांनी देखील प्रत्तुतरादाखल गोळीबार केला. या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस पथक आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे हे गस्त घालीत होते. त्यावेळी आठ ते दहा जणांचा जमाव संशयास्पद अवस्थेत उभा असल्याचे दिसून आले. पोलीस त्यांच्या दिशेने जात असतानाच एका आपोपीने पोलिसांच्या दिशेने पिस्तूल रोखले. पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी झालेल्या झटापटीमध्ये एका आरोपीने एक धारदार हत्यार पोलिसांना फेकून मारले. हे शस्त्र लागून पोलीस कर्मचारी कट्टे हे जखमी झाले आहेत. पळ काढलेल्या आरोपींपैकी पाच जणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
दरम्यान, अन्य पळून जात असलेल्या आरोपींवर पोलिसांनी गोळीबार केला असून हे आरोपी अंधाराचा फायदा घेत टेकडीच्या दिशेने पसार झाले. त्या आरोपींचा शोध सुरु असून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे, दोन लोखंडी कोयते, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, हातोडा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेले आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या विरूद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तपासा दरम्यान ते एसबीआय बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे उघडकीस आले.