मुंबई : बॉक्स ऑफिसवर सध्या एक चित्रपट भरघोस कमाई करताना दिसत आहे. आणि अभिमान आहे की तो मराठी चित्रपट आहे. केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा हा या चित्रपटाने १७ दिवसांमध्ये ५७.१५ कोटींची कमाई केली आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये मराठी चित्रपट कमाई करत नाही किंवा मराठी चित्रपटांना प्रेक्षक येत नाहीत आणि चित्रपटगृहे मराठी चित्रपटांना मिळत नाहीत, अशा सर्व तक्रारदारांची तोंडंच बाईपण भारी देवा या चित्रपटाने बंद केली आहेत.
दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्याच्या शेवटी १२.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाच्या कमाईत दुप्पटीने वाढ झाली. या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात तब्बल २४.८५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
....आणि बाईपणचे नामकरण झाले
केदार शिंदेंच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे सुरुवातीला नाव 'मंगळागौर' ठेवण्यात आले होते. मात्र, या नावावरुन चित्रपट कोणत्या तरी देवीचा किंवा धार्मिक कथेवर आधारित आहे की काय असा प्रेक्षकांचा समज होईल म्हणून या चित्रपटाचे नाव बदलण्याचा विचार करण्यात आला. ज्यावेळी चित्रपटासाठी बाई पण भारी देवा हे गाणे गीतकार वलय याने लिहिले त्यावेळी त्यात 'बाईपण भारी देवा' हे वाक्य लिहिले होते. त्यामुळे 'मंगळागौर' जर का नाव ठेवले तर ज्यांना मंगळागौर काय हेच माहीती नाही त्यांच्यापर्यंत हा चित्रपट पोहोचणार कसा? या प्रश्न उभा राहिल्यामुळे या चित्रपटाचे सह निर्माते अजित भुरे यांनी 'बाईपण भारी देवा' हे नाव चित्रपटासाठी पक्के केले.