लखनऊ : उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात एका मदरशाच्या संचालकाने तपासासाठी आलेल्या अधिकाऱ्याला धमकावल्याची घटना समोर आली आहे. ही धमकी महदेइया येथील जलालुल उलूमचे व्यवस्थापक सुलतान अहमद यांनी बस्ती मंडळाचे अल्पसंख्याक कल्याण उपसंचालक विजय प्रताप यादव यांना दिली आहे. पीडित अधिकाऱ्याने १८ जून रोजी आरोपी सुलतान अहमदविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
हे प्रकरण सिद्धार्थनगर जिल्ह्यातील सिद्धार्थनगर पोलीस स्टेशन क्षेत्राशी संबंधित आहे. सुलतान अहमद मिनी आयटीआय मदरसा जलालुल उलूम हा मदरसा चालवतात. १४ जून रोजी बस्ती मंडळाचे अल्पसंख्याक कल्याण उपसंचालक विजय प्रताप यादव हे मदरशांची पाहणी करण्यासाठी पोहचले होते. या तपासणीत अनेक त्रुटी आढळल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. मदरशात नियुक्त केलेल्या ३ पैकी १ कर्मचारी कोणतीही परवानगी न घेता गैरहजर असल्याचे सांगण्यात आले. यासह ३ पैकी २ शिक्षक जागेवर आढळून आले नाहीत.या दोघांच्या गैरहजेरीबाबत कोणतीही लेखी माहिती मिळाली नाही.
मदरशातील स्वच्छतेची स्थिती अत्यंत वाईट असल्याचे अल्पसंख्याक कल्याण उपसंचालकांनी सांगितले. त्यांनी स्वत: झाडू घेऊन परिसरात पसरलेली घाण साफ केली. या पाहणीत उपसंचालक विजय प्रताप यादव यांच्यासह जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकारी तन्मय पांडे उपस्थित होते. या सर्व उणिवा लक्षात घेऊन तन्मय पांडेने मदरसा ऑपरेटरला नोटीस बजावून १७ जून २०२३ पर्यंत उत्तर मागितले आहे.लेखी उत्तर देण्याऐवजी, शेवटच्या दिवशी, १७ जून रोजी, मदरशाचे संचालक, सुलतान अहमद यांनी उपसंचालक विजय प्रताप यादव यांना फोन केला आणि गंभीर परिणामांची धमकी दिली. यादरम्यान सुलतान म्हणाला, "केवळ माझा मदरसा तपासण्यासाठी सापडला का?"
याप्रकरणी सिद्धार्थनगर पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. दुसरीकडे, आपल्यावर झालेल्या आरोपांनंतर मदरसा संचालक सुलतान यांनी सर्व दोष अधिकाऱ्यांवर टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उपसंचालक विजय प्रताप यांच्यावर मदरशातील मुलींचे व्हिडिओ परवानगीशिवाय व्हायरल केल्याचा आरोप केला. तसेच सुलतान म्हणाला की, अधिकारी विजय प्रताप यादव यांच्या विरोधात पोलिस तक्रार देखील करणार आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.