
मुंबई : छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरातील एका वसतिगृहात अल्पवयीन मुलींचे धर्मांतरण केले जात असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. या वसतिगृहात ९० मुली राहत असून, संस्थेचा मान्यता कालावधी संपुष्टात आल्याची माहितीही दानवे यांनी सभागृहात दिली. या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत त्यांनी वसतिगृह चालकांना कारागृहात टाकण्याची मागणी केली. याला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. ९ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा बाल विकास अधिकाऱ्याच्या निलंबनाची घोषणा केली.
या वसतिगृहात मुलींच्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याने त्यांच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचा मुद्दाही दानवे यांनी उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, हे प्रकरण जिल्हा बाल विकास अधिकाऱ्याशी निगडित आहे आणि या अधिकाऱ्यांकडे यापूर्वी दहा तक्रारी दाखल झाल्या होत्या, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याची मागणी दानवे यांनी लावून धरली. बाल कल्याण समिती अर्ध-न्यायिक असल्याने तिचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या. मात्र, हे प्रकरण समोर येण्यापूर्वी राज्य महिला आयोगाने कोणतीही ठोस कारवाई का केली नाही, असा सवाल करत दानवे यांनी राज्य महिला आयोगाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी जिल्हा बाल विकास अधिकाऱ्याच्या निलंबनाची घोषणा केली.