‘किलर व्हेल’चे प्रताप

    19-Jun-2023   
Total Views |
killer whales struck the yacht

अलीकडील काळात युरोप खंडाच्या नैऋत्य भागात विशेषतः दक्षिण स्पेन जवळील समुद्रात ‘ऑर्का’ म्हणजेच ‘किलर व्हेल’ने बोटींवर हल्ला करण्याच्या तीन घटना घडल्या. बोटींवर हल्ला चढवून ती बुडवण्याचा प्रयत्न झाला. गेल्या वर्षभरात या घटनांमुळे तीन बोटीदेखील बुडाल्या आहेत. परंतु, वेळेत बचाव केल्यामुळे, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण, हे समुद्री सस्तन प्राणी हल्ले का करत आहेत? याचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. हे ‘ऑर्का’स एकमेकांकडून आक्रमक वर्तन शिकत आहेत का, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. थोडे मागे डोकावून पाहिले, तर ‘किलर व्हेल’ आणि बोटी यांच्यातील संघर्षाच्या नोंदी २०२० पासून वाढल्या आहेत. मात्र, कोणतीही मानवी दुखापत किंवा मृत्यूची नोंद झालेली नाही. बहुतेक प्रकरणांमध्ये, हे ’किलर व्हेल’ बोट बुडवू शकलेले नाहीत.

सर्वात अलीकडील चकमक ही गेल्या आठवड्यात स्पेनच्या किनारपट्टीवरची. एका सेलिंग यॉटच्या रडरला तीन ‘ऑर्का’स येऊन एकमेकांना आदळले, ज्यामुळे ती अखेरीस बुडली. गेल्या तीन वर्षांत घडलेल्या घटनांमुळे पोर्तुगालमधील एका शास्त्रज्ञाच्या मते हे हल्ले सूचित करतात की, व्हेल मासे जहाजांना नुकसान पोहोचवू इच्छित आहेत. ’मरिन मॅमल सायन्स’ या जर्नलमध्ये गेल्या जूनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, २०२० मध्ये इबेरियन किनार्‍यालगत ‘ऑर्का’ आणि बोटी किमान १५ वेळा समोरासमोर आले आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये पोर्तुगालच्या राष्ट्रीय सागरी प्राधिकरणाने खलाशांसाठी याबाबत विशेष सूचना देखील जाहीर केली होती. यामध्ये किशोरवयीन ’किलर व्हेल प्रजातीमधील जिज्ञासू वर्तनाबद्दल माहिती देण्यात आली.

यामध्ये ‘किलर व्हेल’ हे बोटच्या ‘रडर’ आणि ‘प्रोपेलर’कडे आकर्षित होऊ शकतात आणि बोटींकडे जाण्याचा प्रयत्न करू शकतात, असे सांगण्यात आले होते. पोर्तुगालमधील एवेरो विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञांनी या हल्ल्यांमागे सूड भावना असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मानवांनी ‘ऑर्का’ लोकसंख्येला हानी पोहोचवल्याचा दीर्घ इतिहास आहे. मग ते त्यांची शिकार करण्यापासून ते ६० आणि ७०च्या दशकात जीवंत पकडण्यापर्यंत इतके आहे. मानवाने अनेक ‘ऑर्कां’ना विविध कारणांसाठी त्यांच्या कुटुंबांपासून वेगळे केले आहे. परंतु, ‘ऑर्का’स हे ऐतिहासिकदृष्ट्या मानवांबद्दल आक्रमक असल्याचे कोणतेच दाखले उपलब्ध नाहीत. बोटीवरील या हल्ल्यांना कदाचित ‘फॅड’मुळे केलेली वागणूक असे म्हणून पाहता येईल.

एका व्हेलने तसे केले म्हणून आपणही तसे करून पाहावे, या भावनेतून हे हल्ले झाले असण्याची शक्यता आहे. परंतु, कदाचित या बोटींसोबत खेळणे त्यांना उत्तेजक आणि रोमांचक वाटत असावे, असेही मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. समुद्राच्या पाण्यात वेगाने जाणार्‍या बोटीमुळे ‘ऑर्का’देखील मोहात पडू शकतात आणि बोटींचा पाठलाग करताना रोमांच येऊ शकतो, असे तज्ज्ञांनी प्रसार माध्यमांना सांगितले. डॉल्फिन आणि काही इतर समुद्री सस्तन प्राण्यांच्या प्रजातींमध्ये खेळ खेळणे, हे एक सामान्य वर्तन आहे. बोट मालकांनी उपस्थित केलेल्या चिंतेचे निराकरण करणे, तसेच मानव आणि ‘ऑर्का’स या दोघांची सुरक्षा लक्षात घेणे आवश्यक आहे. या चकमकींचा प्रभाव कमी करण्यासाठी मार्ग सर्वांनी एकत्र येऊन काढायला हवा.

सागरी संशोधक, संरक्षक आणि बोटमालक यांनी एकत्र येऊन ’ऑर्का’ या वादामुळे होणारा धोका आणि त्रास कमी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरणे विकसित करणे, गरजेचे आहे. या प्रयत्नांमध्ये शैक्षणिक मोहिमा राबविणे, जबाबदार नौकाविहार पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि वाढलेल्या मासेमारी आणि बोटिंगच्या विशिष्ट क्षेत्रांवर तात्पुरते निर्बंध लागू करणे, यांचा समावेश होऊ शकतो. स्पेन आणि पोर्तुगालच्या किनार्‍यावरील ’ऑर्का’स आणि बोटी यांच्यातील वाढत्या चकमकी हे मानवी-वन्यजीव संघर्षाचे नवे वळण आहे. ‘ऑर्का’सने दाखवलेल्या आक्रमकतेमुळे बोटींना त्रास आणि नुकसान होऊ शकते. परंतु, या चकमकींमागील मूळ प्रेरणा समजून घेणे महत्त्वाचे आहे. खेळकर वृत्ती ओळखून आणि पर्यावरणीय घटकांचा विचार करून, आपण मानव आणि ‘ओर्कां’चे सहजीवन कसे समृद्ध करता येईल, यादृष्टीने काम केले पाहिजे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास.