नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मोचा चक्रिवादळ रविवार म्यानमारच्या किनारपट्टीवर धडकले आहे. या वादाळाचा परिणाम म्हणून देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस तर काही राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागाने सोमवारी वर्तविली आहे.
पश्चिम बंगालमधील पूर्वा मेदिनीपूर आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यांचा किनारी भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. सतर्कता म्हणून लाईव्ह गार्ड्स तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण (एनडीआरएफ) पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. किनारपट्टी क्षेत्रातील लोकांनी समुद्राजवळ किंवा समुद्रकिनारी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले असून, हवामान विभागाने नियमावली तयार केली आहे.
दरम्यान, मोचा मोचा चक्रिवादळ रविवारी म्यानमारच्या किनारपट्टीवर धडकल्यावर त्याचा प्रभाव काही अंशी कमी झाला आहे. त्यामुळे दिल्ली -एनसीआरसह पंजाब, हरियाणा, चंदीगड तसेच राजस्थानच्या अनेक भागात वादळी वार्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्याचबरोबर ईशान्य भारतातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपूरा, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. देशातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असताना दुसरीकडे पूर्व भारतात उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आला आहे. पूर्व भारतात कमाल तापमानामध्ये २ ते ४अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ वातावरण राहील असा, अंदाज वर्तविण्यात आला आहे.