हनुमंतांनी राक्षसांचे निर्दालन केले, भाजप भ्रष्टाचाराचे करणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी
भाजप स्थापनादिनानिमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
06-Apr-2023
Total Views | 38
1
नवी दिल्ली : राक्षसांना सामना करताना हनुमंत अतिशय कठोर झाले होते. त्याचप्रमाण भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचा सामना करण्यासाठी भाजपही कर्तव्यकठोर होतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी केले. भाजप स्थापनादिनानिमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
लक्ष्मणावर संकट आले तेव्हा हनुमंतांनी त्यांचे प्राण वाचविण्यासाठी संपूर्ण पर्वतच आणला होता. त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजप सरकार काम करत आहे. हनुमंतांच्या सामर्थ्याप्रमाणेच आजच्या भारताला आपल्या सामर्थ्याची जाणीव झाली आहे. ज्यावेळी राक्षसांचा सामना करून त्यांचे निर्दालन करायचे होते, त्यावेळी ते अतिशय कठोर झाले होते. त्याचप्रमाणे ज्यावेळी देशाच्या राजकारणातील घराणेशाही, भ्रष्टाचार आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रश्न येतो; त्यावेळी भाजपही राजकारणातील या अनिष्ट बाबींच्या विरोधात जोरदार लढा देण्यासाठी सज्ज होते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भाजपला हनुमानापासून प्रेरणा मिळते, असे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, हनुमान प्रत्येकासाठी काहीना काही करतात मात्र, ते स्वतःसाठी काहीही करत नाहीत. यातूनच भारतीय जनता पक्षाला प्रेरणा मिळते. हनुमंतामध्ये मध्ये अफाट शक्ती आहे, परंतु जेव्हा त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला तेव्हाच त्यांनी शक्तीचा वापर केला. त्याचप्रमाणे भारतातही २०१४ पूर्वी अशीच परिस्थिती होती. मात्र, आज भारताला हनुमानाप्रमाणे आपल्या शक्तीची जाणीव झाली असून समुद्रासारख्या मोठ्या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि त्यांना तोंड देण्यासाठी आज भारत पूर्वीपेक्षा अधिक सक्षम आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.