खोपोली अपघात : शॉर्टकट निवडला आणि १३ जणांनी जीव गमावला!
15-Apr-2023
Total Views | 92
खोपोली : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात शिंग्रोबा मंदिराच्या वरच्या खिंडीमध्ये मुंबईचे ढोल ताशा पथक घेऊन जाणारी खाजगी बस २०० फूट दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये चालकासह १३ जण ठार झाले आहेत तर २८ जण जखमी झाले आहेत. अपघात आज पहाटे साडेतीनच्या सुमारास घडला. सर्व जखमींना खोपोली नगर परिषदेच्या रुग्णालयात प्रथमोपचारा नंतर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
गोरेगाव, मुंबई येथील बाजीप्रभू ढोल ताशा पथकातील कार्यकर्ते पिंपरी चिंचवड येथील सुदर्शन चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त असलेल्या कार्यक्रमात वादन झाल्यानंतर रात्री दोन वाजता परतीच्या प्रवासाला लागले. मुंबईला जाताना ते द्रुतगती मार्गाने किंवा राष्ट्रीय महामार्गाने खोपोली शिळफाट्यावरून पुढे जाऊ शकत होते. परंतु चालकाने शॉर्टकटचा मार्ग निवडला आणि शिंग्रोबाच्या वरील अरुंद खिंडीतून चालकाला अंदाज न आल्यामुळे बस दोनशे फूट दरीत पडली. या पथकामध्ये खोपोलीतील दोन जणांचा समावेश होता त्यांना सोडण्यासाठी म्हणून देखील चालकाने हा मार्ग निवडला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.
मृतांमध्ये,
१) जुई दिपक सावंत (१८) दिंडोशी, गोरेगाव, मुबई
२) यश सुभाष यादव(१७) रा. गोरेगाव
३) कुमार वीर कमलेश मांडवकर (१२) गोरेगाव
४) वैभवी सुनील साबळे (२०) गोरेगाव
५) स्वप्नील श्रीधर धुमाळ (१६ )
६) सतिश श्रीधर धुमाळ (२३)
७) मनीष राठोड( २४)
८) कृतिक संजय लोहित, वय १६ वर्ष, गोरेगाव, मुंबई
९) राहुल गोठण, वय १७ वर्ष, गोरेगाव मुंबई.
१०) हर्षदा भरत परदेशी (१९) माहीम,मुंबई.
११) अभय विजय साबळे (१९) रा.मालाड,मुंबई.
१२) हरीरतन सोपान यादव (४०) चालक - रा. जोगेश्वरी, मुंबई
१३) अनिकेत संजय जगताप (२६) रा.गोरेगाव
अपघाताचे वृत्त समजतात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते,शिवदुर्ग रेस्कु टीम,यशवंती हायकर्स,खोपोली पोलीस,खालापूर पोलीस,खोपोली नगर पालिका प्रशासन,महामार्ग वाहतुक, रायगड, आय आर बी ची यंत्रणा यांनी तातडीने घटनास्थळी भाग घेऊन जखमींना बाहेर काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आठ ते नऊ तास हे काम सुरू होते जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी खोपोली नगरपरिषद रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी दीडच्या सुमारास बोरघाटातील अपघात झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मदत जाहीर केली तसेच जखमींचा सर्व खर्च करण्यात येणार असल्याचे सांगितले.