भारतीय रंगभूमीच्या तुलनेत मराठी रंगभूमी अव्वल : प्रमोद पवार

    15-Apr-2023   
Total Views |
 
अभिनय, दिग्दर्शनाबरोबरच मराठी साहित्यिक-सांस्कृतिक क्षेत्रातील ज्येष्ठ रंगकर्मी प्रमोद पवार यांची नुकतीच संगीत नाटक अकादमीच्या नाटक विभागाच्या सल्लागार समितीवर नियुक्ती जाहीर झाली आहे. तसेच ‘संस्कार भारती’च्या कार्यकारिणीत नाटकविधेचे प्रमुख संयोजक हे दायित्व सध्या त्यांच्याकडे आहे. गेली 20 वर्षे संगीत नाटकांची निर्मिती व दिग्दर्शन यासाठी मुंबई मराठी साहित्य संघ, नेहरू सेंटर यांच्या माध्यमातून पवार सातत्याने कार्यरत आहेत. अनेक लोकप्रिय नाटकांमधून त्यांनी केलेल्या भूमिकादेखील तितक्याच संस्मरणीय ठरल्या. तेव्हा, अकादमीच्या सल्लागार समितीवरील नियुक्तीच्या निमित्ताने मराठी रंगभूमी, एकूणात भारतीय रंगभूमीच असलेलं स्थान याविषयी त्यांच्याशी केलेली ही मनमोकळी बातचित...

pramod pawar 
 
संगीत नाटक अकादमीच्या नाटक विभागाच्या सल्लागार समितीवर तुमची नियुक्ती झाल्याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन. या माध्यमातून नेमकी कोणती उद्दिष्टे पूर्ण करण्याचे आपले लक्ष्य असेल?
नाट्यसृष्टीचा प्रश्न हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. संपूर्ण भारतभर नाटकं कुठे कुठे सुरु आहेत, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना पाठबळ कसे द्यावे, हा प्रश्न आहे. सर्वांचे काम पाहून त्या-त्या नाट्यसंस्थांविषयी माहिती गोळा करणे अशी अनेक कामे सुरुवातीला करावी लागतील. त्यानंतर जे प्रयोग विविध रंगमंचांवर होत आहेत, त्यांना ‘प्रमोट’ कसे करावे, याचा विचार करावा लागेल. अध्यक्षांच्या हाताखाली एक समिती स्थापन केली असून सध्या अभिराम भडकमकर त्याचे प्रमुखपद भूषवत आहेत.
 
‘संस्कार भारती’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही तुम्ही नाटक विभागाचे प्रमुख संयोजक म्हणूनही कार्यरत आहात. तेव्हा आता ही नवी जबाबदारी म्हटल्यावर दोन्हीकडे कसा मेळ साधणार आहात? याबाबत तुमचं नियोजन काय?
होय, मला संपूर्ण भारतातील म्हणजे जम्मू-काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि कोलकातापासून ते अगदी गुजरातपर्यंत सर्वच राज्यांतील नाट्यसंस्था माहिती झाल्या आहेत. त्यांच्यासोबत काही प्रयोग सध्या सुरु आहेत. हे चांगलं काम मला करता येतंय आणि याचा उपयोग संगीत नाटक अकादमीसाठी नक्कीच करता येईल. अजून संगीत नाटक अकादमीचं काम सुरू झालेलं नसल्याने मी केवळ नियोजन करून ठेवतो. ‘संस्कार भारती’च्या माध्यमातून जो डेटा मिळवण्याचा प्रयत्न करतोय, त्याच आधारे संगीत नाट्याचे काम सोपे होईल.
 
त्याचबरोबर आता भारतीय नाट्यसृष्टीकडे पाहता, त्यात मराठी रंगभूमी कुठे आहे, असं तुम्हाला वाटतं? मराठी रंगभूमीच्या काही वैशिष्ट्यांविषयी सांगू शकाल का?
आपल्याकडे एकांकिका मोठ्या प्रमाणावर होतात. परंतु, व्यावसायिक रंगभूमीवर जाण्यासाठी जे पाठबळ लागतं, ते पुरेसं नाही. बाकी नाटकांबाबत बोलायचं झालं, तर आपल्यासारखी रंगभूमी इतर कुठेही नाही. आज ‘चारचौघी’सारखं नाटक पुन्हा रंगभूमीवर येतं आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळतो. बरीच जुनी आणि गंभीर विषय असलेली नाटकंही चालतात. हे आपलं यश आहे. ‘देवबाभळी’सारखं नाटक, आजचं असूनही त्याचे प्रयोगावर प्रयोग होत आहेत. असे प्रयोग करणारी संस्था मराठी रंगभूमीकडे असणं, हेच विशेष आहे. इतर राज्यांतील रंगभूमीवरच्या प्रयोगांचा आकडा बहुतेकदा दहापेक्षा कमी असतो. त्यानंतर नाट्यमहोत्सवातून वगैरे त्याचे प्रयोग होतात. त्या तुलनेत आपली रंगभूमी उत्कृष्ट आहे. त्यामुळे बहुतेकदा या महोत्सवानांच डोळ्यांसमोर ठेवून ही नाटके केली जातात. आपल्याकडे एक प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे. त्या वर्गाला डोळ्यांसमोर ठेवून विविध विषय निवडले जातात. ही सकारात्मक बाब म्हणता येईल.
 
आज नाट्यसृष्टीसमोर कोणती आव्हानं आहेत? कोणत्या प्रकारची नाटकं उत्तम चालतात? राजकीय विषयांवर भाष्य करणारी नाटकं तुलनेने कमी दिसतात का?
फक्त प्रशांत दामलेंची आणि काही चांगली नाटकं सोडली, तर सर्वच नाटकांना प्रेक्षकांची गर्दी होत नाही. नाटकांबद्दल लिहायला हवं, बोलायला हवं. माध्यमं याबाबतीत दुर्लक्ष करतात. परत लोकांना काय आवडेल, आपल्याला सांगता येत नाही. ‘देवबाभळी’ बघ किंवा मागे मीच ‘अनन्या’ नाटक केलं होतं, त्यात मनोरंजनात्मक मूल्यं नव्हती. तरी त्या नाटकांना उत्तम प्रतिसाद मिळाला. आज 40 वर्षांनंतरही लोकांना ‘चारचौघी’ आजचं वाटतंय, आवडतंय. पूर्वी तीन अंकी नाटकं व्हायची. त्यानंतर त्याचा कालावधी कमी झाला आणि मधल्या मध्यंतरासहित नाटक दोन तासांचं झालं. आता तो वेळ अजून कमी होऊन एक तासांचा झालाय. नाट्यानुभव दिला जातोय. लोकांकडे तीन तास बसायला वेळ नाहीये. तू म्हणतेस तसं राजकीय विषयांवर भाष्य करणारीही नाटकं व्हायला हवीत. त्याशिवाय समाज बदलणार नाही. आज ‘सिंहासन’सारखा चित्रपट अरुण साधूंची किती जुनी कादंबरी. राजकारण आहे तिथेच आहे, त्याचा पॅटर्न फक्त बदलला आहे. नाटकांच्या माध्यमातून त्याला वेगळा आयाम आपणच दिला पाहिजे. त्यासाठी विशेष नाटकांची निर्मिती व्हायला हवी.
 
सोबतच तुमच्या अभिनय क्षेत्रातील योगदानाविषयी मला जाणून घ्यायला आवडेल. सध्या कोणत्या नाटकावर आणि अन्य प्रकल्पांवर काम सुरु आहे?
मी साहित्य संघाचं एक नवीन नाटक आता दिग्दर्शित केलंय. ’माऊली’, ‘ज्ञानेश्वर’, ‘सोपान’, ‘मुक्ताई’ या चार भावंडांच्या कौटुंबिक आयुष्याबद्दल हे नाटक आहे. तत्कालीन समाजाने त्यांना आत्महत्येस कसं प्रवृत्त केलं. चार भावंडांपेक्षाही केवळ आई-वडील आणि समाज असं चित्रण या नाटकातून पाहायला मिळेल. साहित्य संघात त्याचा एक प्रयोग झाला आहे. पण, अजून काही बदल करून पुढच्या महिन्यापर्यंत ते पुन्हा एकदा रंगभूमीवर आणून त्याचे नियमित प्रयोग सुरू करायचा विचार आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.