दर्शन सोळंकीची आत्महत्या आणि प्रश्न...

    01-Apr-2023   
Total Views |
Darshan Solanki's suicide

मूळचा गुजरात येथील दर्शन सोळंकी या ‘पवई आयआयटी’च्या विद्यार्थ्याने दि. १२ फेब्रुवारी रोजी ‘आयआयटी’ वसतिगृहाच्या परिसरातच आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येने समाज ढवळून निघाला. काही संघटनांनी ठामपणे सांगितले की, दर्शन मागासवर्गीय होता म्हणून त्याच्याशी जातीभेद केला गेला. या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. यावर ‘पवई आयआयटी’ने अंतर्गत अहवाल सादर केला. महाराष्ट्र सरकारने दर्शनच्या मृत्यूसंदर्भात विशेष तपास पथक नियुक्त केले. दर्शनच्या मृत्यूनंतर झालेले आरोप-प्रत्यारोप आणि घटना यांचा मागोवा घेणारा हा लेख...

१२ फेब्रुवारी रोजी दुपारी ‘पवई आयआयटी’चा विद्यार्थी दर्शन सोळंकीने आत्महत्या केली. दर्शनच्या मृत्यूनंतर त्याचे पिता रमेश गुजरातहून ‘पवई आयआयटी’ला पोहोचण्याआधीच दर्शनचे पोस्टमार्टम करण्यात आले, हा त्यांचा आक्षेप. यात कायदेशीर आणि भावनिकही मुद्दे आहेतच. त्यानंतर ‘पवई आयआयटी’ने दर्शनच्या मृत्यूची कारणे तपासण्यासाठी एक अंतर्गत समिती बनवली. या समितीमध्ये एससी, एसटी सेलचे संबंधितही सहभागी होते. यामध्ये समितीने ११ विंगमेट, सात स्थानिक प्राध्यापक, नऊ शिक्षक, दोन मेंटर ११ कौटुंबिक मित्र, १३ सुरक्षारक्षक अशा एकूण ७९ लोकांशी संपर्क केला, तपासणी केली. त्यानंतर समितीने अंतर्गत अहवाल बनवला. या समितीने अहवाल जाहीर केला. अहवालानुसार, दर्शनची शैक्षणिक कामगिरी खालावली होती. त्याला संगणक आणि इंग्रजीसंदर्भात अडचणी यायच्या. तसेच गणित विषय इंग्रजीऐवजी हिंदीतून शिकता येईल का, असेही त्याने विचारले. तसेच समितीच्या अहवालानुसार त्याच्याशी भेदभाव होतो म्हणून त्याने कुणाशीही वैयक्तिक नाव घेऊन बोलणे केले किंवा तक्रार केली, असे निदर्शनास आले नाही.

‘पवई आयआयटी’मध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातीभेदविषयक त्रासाला सामोरे जाऊ लागू नये, म्हणून २०१७ सालापासून ‘एसएसटी सेल’ निर्माण केला. तिथेही त्याने तक्रार केली नाही की, ‘पवई आयआयटी’च्या विशेष ईमेलवरही तक्रार किंवा साधे म्हणणेही नोंदवले नाही. तो कुणासोबतही मिसळत नसे. दर्शन परीक्षेतील खालावलेल्या गुणांमुळे दु:खी होता. कदाचित त्याच तणावात तो असावा. तेच त्याच्या आत्महत्येचे एक संभाव्य कारण असू शकते. अर्थात, कोणतीही संस्था आपली प्रतिमा स्वच्छ आहे, हेच दर्शवण्याचा प्रयत्न करू शकते. कदाचित ‘पवई आयआयटी’च्या अंतर्गत समितीच्या अहवालामध्येही हेच घडले का? हा अहवाल दर्शनच्या पित्याने धुडकावून लावला. दर्शनने जातीभेदाच्या छळाला त्रासून आत्महत्या केली नव्हे, ही एक हत्याच आहे असे ते म्हणाले.गुजरातमधून स्वप्न घेऊन मुंबई महानगरात तीन महिन्यांपूर्वी आलेला दर्शन. वय वर्षे १८. सगळेच नवीन. भाषा, राहणीमान भौतिक पर्यावरण अगदी सगळेच नवीन. माणसाचा बुद्ध्यांक आणि भावनांक हा एकच असू शकतो का?

‘आयआयटी’मध्ये ‘बीटेक’च्या प्रथम वर्षाला प्रवेश मिळणारा दर्शन हा नक्कीच हुशार बुद्धिमान होता. पण, त्याची भावनिकता? त्याच्या मृत्यूनंतर त्याच्याबद्दल जे काही सांगितले जाते, त्यावरून जे समजते की तो भावनाशील होता, लोकांनी त्याच्याशी केलेला व्यव्हार त्याच्यावर परिणाम करत होते. आपल्याला इंग्रजी भाषा व्यवस्थित येत नाही किंवा इथल्या वातावरणाशी आपल्याला जुळवता येत नाही, असे त्याला वाटे. काही विद्यार्थ्यांनी सांगितले की, तो म्हणत असे की त्याच्या घरी तो सगळ्यांचा लाडका आहे, पण इथे त्याला कोणी पसंत करत नाही. दर्शनच्या मनात हे असे विचार येत होते. डार्विनचा नियम ‘सशक्तच जगणार’ हा मानवी जीवनाचा सिद्धांत होऊच शकत नाही. ‘आयआयटी’च्या म्हणण्यानुसार, अभ्यासात समस्या उद्भवल्या तर त्या निवारण्यासाठी प्रत्येकाला एक ‘मेंटॉर’ दिला जातो. विशेष सहकार्यही केले जाते. मग दर्शनला हे सहकार्य मिळाले का? मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी ‘एसएसी’, ‘एसएसटी सेल’ ‘आयआयटी’मध्ये आहे, तर मग या ‘सेल’ची भूमिका दर्शनसारख्या मनाने खचणार्‍या विद्यार्थ्यांसाठी काय असते? शैक्षणिक पात्रता खालवलेल्या विद्यार्थ्यांची मानसिक आणि शैक्षणिक उभारणी करण्यासाठी ‘आयआयटी’ची व्यवस्था काही करते का? यावर ‘पवई आयआयटी’तील काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांचे म्हणणे, हो, अशी व्यवस्था असते. मग तरीही दर्शनचे असे का व्हावे, हा एक प्रश्नच आहे.

दर्शनच्या मृत्यूनंतर ‘आंबेडकर पेरियार फुले स्टुडंट सर्कल’चे म्हणणे होते की, दर्शनसोबत जातीनुसार भेदभाव झाला. त्याचा छळ झाला म्हणून त्याने आत्महत्या केली असावी. दर्शन सोळंकीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर ‘पवई आयआयटी’ कॅम्पसमध्ये निदर्शने केली गेली. ‘महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन’, ‘डीवायएफआय’, ‘आरपीआय’, ‘भीम आर्मी’, ‘सीआयटीयू’, ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’, ‘जाती अंत संघर्ष समिती’, ‘जनवादी महिला संघटना’, ‘सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संघटनां’चे कार्यकर्त्यांचा यात सहभाग होता. दर्शनच्या शोकसभेत काय मुद्दे मांडले गेले, तर ”जय श्रीराम हा शब्द जातीवाचक आहे. मनूवाद्यांनी दर्शनला मारले, रोहित वेमुला, सचिन अंभोर, पायल तडवी आणि आता दर्शन सोळंकी, एकलव्याचा अंगठा कापणार्‍यांना दलितांची पोर मोठी झालेली आवडत नाहीत म्हणून ते निवडून निवडून त्यांना संपवतात.” पण, हे सगळे लोक दर्शन जीवंत असताना कुठे होते? या कुणाशीही दर्शनचे कधीच बोलणे झाले नाही. याचाच अर्थ मागासवर्गीयांच्या हक्कासाठी काम करतो, न्यायासाठी काम करतो हे सांगणार्‍या या संघटनाची दर्शनशी संपर्क-संवाद नव्हताच. दुसरीकडे राज्यसभेचे माजी खा. भालचंद्र मुणगेकर आणि गुजरात आमदार जिग्नेश मेवानी यांनी दर्शनच्या मृत्यूबद्दल विशेष तपास पथक नियुक्त करण्याची मागणी केली. तीच मागणी काही संघटनांनीही केली. महाराष्ट्र सरकारने त्यानुसार विशेष तपास पथक नियुक्त केले.

 जॉईंट कमिश्नर क्राईम लखमी गौतम यांनी या पथकाचे प्रमुख म्हणून तपास केला. विशेष तपास पथकाला मृत दर्शन सोळंकीच्या रूममधील स्टडी टेबलाखाली चिठ्ठी सापडली. त्यावर लिहिले होते, ‘अरमान हॅज किल्ड मी.’ दर्शनच्या घरातल्यांनीही ‘अरमान हॅज किल्ड मी’ हे शब्द दर्शनच्या हस्ताक्षरातलेच आहेत, याचा स्वीकार केला. विशेष तपास पथकांनी केलेल्या तपासणीनुसार, अरमान म्हणजे अरमान खत्री हा दर्शनचा ‘विंग मेट’ म्हणजे एकाच माळ्यावर राहणारा विद्यार्थी आहे. गेल्या एक आठवड्यापासून दर्शनचे आणि त्याचे वाद सुरू होते. दर्शनचे व्हॉटसअ‍ॅप चॅटही विशेष तपास पथक तपास करत आहेत. चिठ्ठीमध्ये अरमान खत्री नाव सापडल्यावर ‘विशेष तपास पथक नियुक्त करा’ म्हणणार्‍यांची प्रतिक्रिया काय? यावर ‘आयआयटी’च्या काही विद्यार्थ्यांचे म्हणणे की, ‘आंबेडकर पेरियार फुले स्टुडंट सर्कल’चे फेसबुक पेज पाहा, सगळे कळेल. सर्कलचे फेसबुक दलित-मुस्लीम एकतेसाठी वाहिलेले आहे. अर्थात, दोन समाजात एकी वाढणे केव्हाही चांगलेच. ‘दलित-मुस्लीम एकता का अब बस यही नारा देंगे रोहित के खून का जवाब अपने वोटो से युपी चुनाव मे, दलित मुस्लीम एकता जिंदाबाद’ तसेच ‘गोमांस खाणे आमचा मूलभूत अधिकार आहे’, ‘पवित्र गायीचे अपवित्र राजकारण’ वगैरे वगैरे विधानांनी हे फेसबुक रंगले आहे.

इतकेच काय तर दलित-मुस्लीम एकतेचे खरे प्रतीक कुणी गांधी नाहीत, तर दलित-मुस्लीम ऐक्याचे खरे प्रतीक रोहित वेमुला आहेत, अशा आशयाचा मजकूर असलेले हे फेसबुक पेज. त्यामुळे जिथे ‘मागासवर्गीय विरूद्ध मुस्लीम’ अशी संघर्षाची शक्यता असेल, तिथे हे आवाज उठवणार नाहीतच, असे काही लोकांचे म्हणणे. हे सगळे पाहून वाटते की, रोहित वेमुला असो की दर्शन सोळंकी, स्वप्न पाहणार्‍या कुणाही व्यक्तीचा विद्यार्थ्यांचा अवेळीच मृत्यू झाला, तर ते दुःखदआहे. पण, सगळ्यात जास्त दुःखद आणि संतापजनक आहे ते या तरुणांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍यांची निर्लज्जता! गेली अनेक वर्षं मी सामाजिक कार्यात सक्रिय असल्यामुळे या संघटनांच्या अविचारी कार्याशी परिचित आहे. दर्शनच्या मृत्यूचे भांडवल करून काही संघटनांना एका दगडातून अनेक पक्षी मारायचे होते. त्यामध्ये सगळ्यात मोठे लक्ष्य होते - अयोध्या राममंदिराच्या मुद्द्यावर हिंंदू समाजातील जातीपाती विसरून सगळ्यांनी एक व्हा म्हणत, श्रीरामाच्या नावाने एक झालेला हिंदू समाज! या समाजामध्ये दुही माजवण्यासाठी हा मुद्दा चालणार होता की तुम्ही म्हणता हिंदूंमध्ये कुणी उच्च नाही कुणी नीच नाही. पण, मुंबईसारख्या महानगरात तेही विद्वतेच्या प्रतीक असलेल्या ‘पवई आयआयटी’मध्ये जातीभेद केला जातो. दर्शन सोळंकी मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांशी सर्वण हिंदू तेही उच्चशिक्षण घेणारे हिंदू इतके वाईट वागले की, दर्शनने बिचार्‍याने आत्महत्या केली.

एकदा का हा सिद्धांत समाजात पसरवला नव्हे, पेटवला की, इतर मागासवर्गीय, मागासवर्गीय आणि भटके-विमुक्त गट या गटांना भडकवता येईल की, ‘तुम्ही हिंदू म्हणून एक आहात, असे तुम्हाला वाटते. पण, त्यांना म्हणजे उच्चवर्णीयांना वाटत नाही.’ तसेच, या संघटनांचा एक तर्कही असावा की, एकदा का हा विषय ‘पवई आयआयटी’तील ५० टक्के ओबीसी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पटला, तर ‘पवई आयआयटी’ला ताब्यात घ्यायला किती वेळ लागेल? सगळेच विद्यार्थी सोबत येणार नाहीत. पण, या ५० टक्क्यांपैकी पाच टक्के विद्यार्थी जरी सोबत आले तरी ‘पवई आयआयटी’चे ‘जेएनयु’ व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. मग दिल्लीच्या जेनयुमध्ये जे करतो ते मुंबईत करायला मोकळे! मुंबईत ‘ब्रेकिंग इंडिया’वाल्यांचे बस्तान बसत नाही. निदान या माध्यमातून तरी बसेल, असे यांना वाटत असेल. आता कुणी म्हणेल की, एक तरुण मुलगा अकाली मृत्यू पावला आणि हे तर्कवितर्क करताना लाज कशी वाटत नाही? लाज वाटतेच, पण रोहित वेमुला असो की दर्शन सोळंकी, या तरुणांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूचा बाजार बनवून त्यावर नेतृत्वाची पोळी भाजत समाजाला दुभंगणार्‍यांना उघडे पाडलेच पाहिजे. दर्शनच्या मृत्यूबद्दल अतीव संवेदना आहे. पण, म्हणून दर्शनच्या मृत्यूचे भांडवल करून एका अख्ख्या समाजाला गुन्हेगार ठरवणार्‍यांना दुर्लक्षित करायचे का? दर्शनच्या वडिलांनी नुकतेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले की, दर्शनच्या मृत्यूची तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस आणि विशेष तपास पथकाने त्रास दिला. दर्शनच्या मृत्यूची प्राथमिक तक्रार त्यांच्या म्हणण्यानुसारच घ्यावी, अशी दर्शनच्या पालकांची मागणी होती. त्यांच्या म्हणण्यानुसारच तक्रार नोंदवली गेली. दर्शनच्या मृत्यूचे भांडवल करून समाजात तेढ माजवणार्‍यांना समाज योग्य समज देईल, दर्शनच्या गुन्हेगारांना शासन होईल आणि दर्शनला न्याय मिळेल व पुन्हा कुठेही अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, हीच मनापासून इच्छा!

लोकसभेमध्ये केंद्र सरकारतर्फे एका प्रश्नावर उत्तर दिले गेले की, देशातील ‘आयआयटी’ आणि ‘आयआयएम’ संस्थांमध्ये वर्ष २०१४ ते २०२१ दरम्यान १२२ आत्महत्येच्या प्रकरणांची माहिती समोर आली आहे. यामध्ये २४ अनुसूचित जाती आणि ४१ ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय तीन अनुसूचित जनजातीचे विद्यार्थी होते. याचाच अर्थ ५४ विद्यार्थी खुल्या वर्गातील होते. ही अशी जातीवाचक आकडेवारी करणे वाईटच आहे. पण, या आरक्षित वर्गातील किंवा खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी का आत्महत्या केल्या? विद्यार्थी कोणत्याही जातीचा असो, त्याच्या मृत्यूमागचे खरे कारण समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. कारण, सात वर्षांत १२२ जणांनी आत्महत्या केली, ही संख्या आकडेवारीच्या खेळात कमी असली तरीसुद्धा आत्महत्या करणारा प्रत्येक जण त्यांच्या कुटुंबाचे विश्व होता.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.