पुणे : रा. स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त येथील ‘सेवा भवन’ या सेवा प्रकल्पाचे उद्घाटन शनिवार,दि. ४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
कोथरूडमधील गांधी लॉन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कोथरूड-पटवर्धनबाग परिसरात हा सेवा प्रकल्प साकारला असून रा. स्व. संघ जनकल्याण समिती, जनकल्याण सेवा फाऊंडेशन आणि डॉ. हेडगेवार स्मारक सेवा निधी या तीन संस्थांनी मिळून सेवा भवनची निर्मिती केली आहे. ही वास्तू सात मजली असून एकूण बांधकाम २७ हजार चौरसफुटांचे आहे.
सेवा भवन या प्रकल्पामध्ये एका मजल्यावर अत्यल्प शुल्कातील ‘डायलिसिस सेंटर’ चालवले जाणार आहे. अन्य तीन मजल्यांवर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अत्यल्प शुल्कातील उत्तम निवासव्यवस्था तसेच, भोजनव्यवस्था उपलब्ध होणार आहे. एका मजल्यावर रुग्ण आणि नातेवाईकांसाठी मार्गदर्शन तसेच माहिती केंद्र असणार आहे. इमारतीच्या तळमजल्यावर जनकल्याण समितीतर्फे कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण केंद्र चालवले जाणार आहे. जनकल्याण समितीच्या तसेच महाराष्ट्रातील अन्य सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी येथे अद्ययावत सभागृह तयार करण्यात आले आहे