मुंबई : गुढीपाडवा नववर्षदिनाचे औचित्य साधून बुधवार, दि. 22 मार्च रोजी राज्यात सर्वत्र स्वागतयात्रांचा जल्लोष दिसून आला. त्यातून संस्कृतीची गुढी उभारण्यात आली.मुंबई उपनगरातील स्वागयात्रांमध्ये सर्वाधिक लक्षवेधी गिरगाव, पार्ले तसेच ठाणे, डोंबिवली यासह राज्यातील अन्य भागांतही जल्लोषात स्वागतयात्रा काढण्यात आल्या. ढोल-ताशा, लेझीम पथक, नऊवारी साडीतील महिला, सांस्कृतिक वेशभूषा केलेली मंडळी आदींचा उत्साह ओसंडून वाहत होता.
गिरगावात संस्कृतीची गुढी
गिरगांव येथे स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्यावतीने यंदा नेहमीप्रमाणे नववर्ष दणक्यात आयोजित केली. यंदाच्या यात्रेचे सर्वाधिक लक्षवेधी दै. ’मुंबई तरुण भारत’चा ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ ड्रग्स जिहाद विरोधातील रथ ठरला. उपसंपादिका योगिता साळवी यांनी या वेळी लव्ह जिहाद संदर्भात जनजागृती केली.
पार्ल्यात जल्लोष
पार्ल्यातील टिळक मंदिर येथे लोकमान्य सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी शताब्दी वर्षानिमित्त जंगी यात्रेचे आयोजन केले होते. पाच दिशांनी पाच वेगवेगळ्या संकल्पना घेऊन ही यात्रा टिळक मंदिर येथे समारोप झाला. यात विविध चित्ररथातून जनजागृतीचे संदेश देण्यात आले. तसेच चित्रफिती खेळ व मल्लखांबाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या शोभायात्रेत लोकमान्य सेवा संघाचा शतकपूर्ती महोत्सवाचा समारोप झाला.
दहिसरमध्ये दीपोत्सव
दहिसर नदीच्या काठी, श्री विठ्ठल रुक्मिणीच्या भव्य प्रतिमा उभारल्या होत्या. दश सहस्त्र दिव्यांनी नदीचा काठ उजळून निघाला होता. नागरिक हा दीपोत्सव साजरा करत असताना सामाजिक संकल्पाचे दीप प्रज्वलित करत आहोत, या भावनेने एकत्र जमले होते. विठुमाऊलीची महा आरती व दक्षिण भारतातील प्रसिद्ध चेंडा मेलाम वादन असे कार्यक्रम या यात्रेच्या निमित्ताने झाले.
ठाण्यात उत्साह संचारला
ठाण्यात श्री कौपिनेश्वर मंदिरातून स्वागतयात्रेस प्रारंभ झाला. पारंपारिक वेशभूषेतील लोक उत्साहान या यात्रेत सहभागी झाले. श्री कौपिनेश्वर आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने या शोभायात्रेचे आयोजन केले होते. वेगवेगळ्या स्पर्धा आणि पारितोषिक वितरण सोहळे यावेळी पार झाले. या शोभायात्रेत छायाचित्र स्पर्धा तसेच ’सेल्फी विथ शोभा’ यात्रा अशाही नव्या पिढीला, तरुणाईला आकर्षून घेणार्या संकल्पना होत्या. ‘वीरगर्जना पथक’ आपले ध्वज फडकावत उल्हासात ढोल व ताशांच्या गजरात नववर्षाचे स्वागत करत होते.
कांजूर, भांडूपला ’लव्ह जिहाद’ विरोधात गर्जना
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, कांजूरमार्ग, भांडूप येथील सकल हिंदू समाजाने स्वागत यात्रा आयोजित केली होती. यावेळी ‘लव्ह जिहाद’ धर्मांतरविरोधी कायदा यावा तसेच ‘लव्ह जिहाद’विषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी खासदार मनोज कोटक, स्थानिक भाजप पदाधिकारी, स्वयंसेवक, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या स्वागतयात्रेत सारिका मंगेश पवार, सुवर्णा करंजे, बाबा कदम, सुरेंद्र बेलवलकर यांच्यासह 90 पेक्षा अधिक पंथ संप्रदाय सामाजिक संस्था मंडळ, सर्व स्तरातील मंडळी उत्साहाने सहभागी झाले होते.