‘या’ महिलांची चूक काय?

    01-Mar-2023   
Total Views |
Munich Security Conference: Female foreign ministers seek removal of bans on Afghan women
 
"आम्ही महिलांचा अधिकार आणि हक्कांचे अजिबात हनन केलेले नाही. या विषयाचा गैरवापर करून संयुक्त राष्ट्र संघाने आणि इतरांनीही अफगाणिस्तानच्या विद्यमान सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये,” असे मत तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने व्यक्त केले. कारण, नुकतेच म्युनिक सुरक्षा संमेलन पार पडले. त्यामध्ये सहभागी झालेल्या विदेशमंत्री, त्यातही दहा महिला विदेशमंत्र्यांनी अफगाणिस्तानमध्ये महिलांवर लादल्या गेलेल्या नियमांची निंदा केली होती. दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये स्त्रियांवर अमानुष नियम लादले गेले तसेच त्यांचे मूलभूत अधिकार नाकारले म्हणून काबुलमध्ये एका महिलांच्या गटाने या सगळ्या विरोधात क्रांती करण्याचे ठरवले आहे.

महिलांनाही मूलभूत अधिकार मिळावेत, त्यासाठी आपण संघर्ष करणार असल्याचे या गटाच्या समन्वयकांपैकी एक असलेल्या दोन्या सफी यांनी म्हंटले आहे. महिलांच्या अधिकार हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीमध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची आहे, असेही या क्रांती करू इच्छिणार्‍या गटाचे म्हणणे. आजपर्यंत अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी महिलांवरच काय इतरही नागरिकांवर अमानुष अत्याचार केले. मात्र, कधी ‘शरिया’ तर कधी शस्त्र दाखवून या नागरिकांना, महिलांना गप्प बसवण्यात आले. यावेळी मात्र या सगळ्यांना न जुमानता काबुलमधील महिलांनी थेट क्रांतीचे रणशिंग फुंकले. योगायोग म्हणा, त्याचवेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशविदेशातील महिला नेत्यांनीही तालिबानी राजवटीतील महिलांवर होणार्‍या अत्याचाराविरोधात आवाज उठवला.

अर्थात, तालिबानचे प्रवक्तेही किती जरी कंठशोष करत म्हणाले की, अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या हक्कांचे हनन होत नाही तरीसुद्धा त्यांच्या बोलण्यावर कुणीही विश्वास ठेवूच शकत नाही. महिलांच्या पेहरावावर बंदी, महिलांना कामानिमित्तही एकटीने घराबाहेर पडण्यास बंदी, अगदी स्वतःच्या पतीसोबत उपाहारगृह किंवा उद्यानात जाण्यासही बंदी, इयत्ता सहावीनंतर तर मुलींचे शिक्षणही बंदच. याचाच अर्थ मुलींना उच्च शिक्षणाच्या वाटा बंद. येणार्‍या काळात कोणत्याही अधिकारी किंवा सेवा क्षेत्रातही महिला कार्यरत दिसणारच नाही. कारण, सहावीनंतर तिने शिक्षणच घेतलेले नसणार. बरं, गृहिणी म्हणून राहावं तर त्यातही कैद्यासारखे जगणे. भविष्यातले तर सोडाच, वर्तमानामध्येही तालिबान्यांनी सरकारी क्षेत्रात काम करणार्‍या महिलांना सक्तीची निवृत्ती दिली. आता तर नव्या फतव्यानुसार अफगाणिस्तानमध्ये गैर सरकारी कार्यालय, संघटन आणि कुठेही महिलांना नोकरी करण्यास मज्जाव आहे. याचाच अर्थ आता महिला इतरत्र कुठेही नोकरी करू शकत नाहीत.

तालिबान्यांच्या या नव्या निर्णयामुळे तर अफगाणिस्तानातील महिलांच्या संतापाचा कडेलोट झाला. याआधीही तालिबान्यांनी खूप कायदे केले. त्याविरोधात तुरळक महिलांनी विरोध केला. त्या निर्णयाविरोधात रात्रीच्या वेळी भिंतीवर किंवा रस्त्यावर संदेश लिहिणे यावरच त्यांची विरोधाची भिस्त होती. पण, आता तर महिला क्रांतीची भाषा बोलू लागल्या. सध्या मुस्लीम राष्ट्रांमध्ये काही ना काही घडामोडी घडत आहेत. इराणमध्ये तर ‘हिजाब’ने क्रांती करण्यास सुरुवात केली. सौदी अरेबियाने बदलत्या काळाची पावलं ओळखत महिलांना थोडेसे स्वातंत्र्य देण्यास सुरुवात केली. इतर मुस्लीम राष्ट्रंही याबाबत नाखुशीने का होईना कात टाकत आहेत. अर्थात, हे सगळे होते कारण, मुस्लीम राष्ट्रांना काहीही झाले तरी चालेल, पण सत्ता गमवायची नाही. जनक्षोभ झाला आणि सत्ता गेली तर? या अनुषंगाने अफगाणिस्तानचे तालिबानी सरकारही सावध आहे.

इराणमध्ये महिलांच्या आंदोलनाला तेथील पुरुषांनीही समर्थन दिले. याच इराणमध्ये दोन आठवड्यांपूवी शेकडो मुलींना अचानक विषबाधा झाली. याचा दुर्दैवी घटनेचा मागोवा घेण्यात आला. त्यातून प्राथमिक कारण समजले ते दुष्ट सैतानी मानसिकता उघड करणारे आहे. इराणमध्ये ‘हिजाब’विरोधात आंदोलन तीव्र आहे. मुलींनी शाळेत जाऊन शिकून आंदोलनाला समर्थन देऊ नये, म्हणून त्यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला. काय म्हणावे? इराण काय अफगाणिस्तान काय, या देशातील महिलांची चूक काय तर त्यांनी या अशा देशात जन्म घेतला ही? भारतीय नागरिक भाग्यवान! ना कोणता फतवा ना महिलासंदर्भात कोणता जुलमी कायदा...


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.