खटकलेली टिकली

    05-Aug-2025
Total Views |

जगाला धर्मनिरपेक्षता, मानवाधिकार आणि व्यक्तिस्वातंत्र्याचे धडे देण्यातच आयुष्याचे सार्थक मानणार्‍या अमेरिका नावाच्या तथाकथित महासत्तेच्या मुखवट्याआडचा असहिष्णु आणि सांस्कृतिकदृष्ट्या दीन चेहरा, पुन्हा एकदा समोर आला. अमेरिकेतील ओहियो या राज्याच्या सॉलिसिटर जनरलपदी नियुक्ती झालेल्या भारतीय वंशाच्या मथुरा श्रीधरन यांना केवळ टिकली लावल्यामुळे समाजमाध्यमांवरून द्वेषपूर्ण टीकेचा सामना करावा लागला.

मथुरा श्रीधरन यांची राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ओहियो राज्याच्या १२व्या सॉलिसिटर जनरलपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली. त्यानंतर अल्पावधीतच अमेरिकेतील नागरिकांनी श्रीधरन यांच्यावर टिकली, धर्म, वंश यावरून टीका करण्यास सुरुवात केली. ही घटना म्हणजे, फक्त श्रीधरन यांच्या धर्म, परंपरा किंवा वैयक्तिक श्रद्धेवरचा हल्ला नसून, तो ‘वोकिझम’ नावाच्या वाढत्या राक्षसी प्रवृत्तीचाही आरसा ठरतो. जिथे स्वतःला काय आवडत नाही, यावरून दुसर्‍याच्या आयुष्याचे नियम आखले जातात.

भारतातील धार्मिक अल्पसंख्याकांबाबत सातत्याने चिंता व्यक्त करताना अमेरिकेने कायमच विविध संस्थांच्या खांद्यावर बंदुका ठेवून किंवा विविध आंतरराष्ट्रीय मंचांवरून भारताला सहिष्णूता जोपासण्याचे धडे दिले आहेत. आज मात्र आपल्याच घरात वाढणार्‍या असहिष्णुतेकडे तो ठामपणे दुर्लक्ष करतो. त्यामुळे ‘माय कल्चर इज नॉट युअर कॉस्ट्युम’ म्हणणार्‍या अमेरिकेला, ‘माय कल्चर इज नॉट युअर डिसकम्फर्ट’ हा आरसा कोण दाखवणार?
टिकलीचे धार्मिक किंवा सौंदर्यदृष्ट्या कितीही महत्त्व असले, तरी त्यामुळे कोणाच्यातरी भावना दुखावल्याचा आरोप करणार्‍या अमेरिकन नागरिकांनी आधी स्वतःला विचारलं पाहिजे की, आपल्याला कोणाच्या संस्कृतीवर बोलण्याचा अधिकार आहे? कारण, अमेरिका देश हा स्वतःची अशी संस्कृती नसलेला देश आहे. इतर देशांतून आलेल्या लोकांच्या अस्तित्वावर उभा राहिलेला हा समाज, आज भारतासारख्या देशाला संस्कृतीवरून अक्कल शिकवण्याची चेष्टा करतो, तेव्हा हे हास्यास्पदच ठरते. ‘कशाविषयी काहीच न वाटणे’ हेच ज्यांचे सांस्कृतिक मूल्य आहे, त्या समाजाला इतर देशातील सांस्कृतिक मूल्यांचे महत्त्व कसे कळणार?

त्यातच ‘वोकिजम’ नामक संस्कृती आज अमेरिकच्या समाजात मुख्य प्रवाह बनू लागली आहे. तुम्ही काय खाता, घालता, विचार करता, हे जर त्यांना पटले नाही, तर ‘वोकिझम’चा शिकार झालेली माणसे तुमच्यावर टीका करतील आणि दुसरीकडे हेच लोक मुक्त विचारांचा उद्घोष करत जगाला त्याचे ज्ञानामृत पाजताना दिसतील. मथुरा श्रीधरन प्रकरण हे त्याच मानसिकतेचे निदर्शक ठरते.

ही टीका केवळ एका महिलेवर झालेली नसून, तर संपूर्ण भारतीय संस्कृतीवर केलेली टीका आहे. मथुरा श्रीधरन यांच्या टिकलीमुळे कधीही त्यांच्या कर्तव्य आणि कर्तृत्वावर बाधा आणली नाही. एवढ्या मोठ्या पदावर त्यांची नियुक्ती होणे, हेच त्याचे सर्वांत बोलके उदाहरण ठरावे. पण, अमेरिकेतील नागरिकांना खटकलेली सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे त्यांची नियुक्ती! एक भारतीय या पदावर पोहोचू कसा शकतो, हीच कोती मानसिकता मथुरा यांच्यावरील टीकेचे मूळ आहे. पण, भारतीयांच्या जगभरातील प्रगतीवर थेट बोलण्याची हिंमत नसल्याने, असे आडून वार करणे यापुढेही सुरूच राहणार, हे निश्चित! सश्रद्ध असणे पाप नसून, आपल्या श्रद्धांना जपणे म्हणजे कोणावर प्रभुत्व गाजवणे ठरत नाही, हे कोणीतरी अमेरिकेसारख्या संस्कृतीबाबतचे कमी आकलन असलेल्या देशाला सांगणे ही काळाची गरज आहे. पण, अमेरिकन माध्यमे आणि समाजातील तथाकथित उदारमतवादी गट जे स्वतःला ‘विविधतेचे पुरस्कर्ते’ म्हणवतात, त्यांच्याच मनात पारंपरिक भारतीय प्रतीकांबद्दल एक विखारी पूर्वग्रह आहे. हेच वास्तव अमेरिकेसारख्या देशाचे खरे स्वरूप उघड करते.

श्रीधरन यांना सहन करावी लागलेली टीका हा केवळ सांस्कृतिक मतभेदाचा विषय नाही, तर तो प्रश्न आहे जगाला शिकवणार्‍या महासत्तेला शोभेल अशा समावेशक दृष्टिकोनाच्या अभावाचा! जेव्हा अमेरिका इतरांना धर्मनिरपेक्षतेचे धडे शिकवते, तेव्हा तिला स्वतःकडे पाहण्याची नितांत गरज आहे. कारण, जगाला ज्ञान शिकवायचे असेल, तर आधी स्वतः शिकले पाहिजे!

कौस्तुभ वीरकर