नुकताच स्पेनच्या जुमिला शहराबाबत तिथल्या प्रशासनाने एक निर्णय घेतला. त्यानुसार जुमिला शहरात मुस्लिमांना त्यांचे उत्सव सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यास कायद्याने मज्जाव करण्यात आला आहे. या निर्णयाचे स्पेनमधील मूळच्या बहुसंख्य असलेल्या ख्रिस्ती समाजाने समर्थन केले. मात्र, इथल्या इस्लामिक सांस्कृतिक वारशाचे काय करणार? असा सवाल स्पेनच्या समाजवादी नेता फ्रान्सिस्को लुकासने विचारला आहे. अर्थात, समाजवादी आणि निधर्मी, पुरोगामी वगैरे असल्याने लुकास हेच प्रश्न विचारणार!
तर लुकासला स्पेनच्या पूर्वापार ख्रिस्ती वारशापेक्षा स्पेनवर आक्रमण करून गुलाम बनवलेल्या इस्लामिक वारशाची चिंता अधिक सतावते. अर्थात, त्याचे कारण या जुमिला शहरामध्ये मुस्लिमांना त्यांचे धार्मिक परंपरा, सण सार्वजनिक ठिकाणी साजरे करू नये, यासाठी तिथल्या प्रशासनाने दिलेले निवेदन. जुमिलाच्या प्रशासनाने म्हटले आहे की, “आमच्या सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख अस्तित्वाव्यतिरिक्त वेगळी सामाजिक, धार्मिक, गतिविधी करणे निषिद्ध आहे. मुस्लीम समाजाला ‘ईद-उल-फितर’ आणि ‘ईद-उल-अजहा’ वगैरे उत्सव नगरपालिका खेळ सुविधा असलेल्या वास्तू जागा, सार्वजनिक ठिकाण येथे साजरा करण्यास परवानगी नाही.” जुमिला शहराबाबत तिथल्या सरकार प्रशासनाने पारित केलेला निर्णय जगभर चर्चेत आहे.
कारण, स्पेनवर इस्लामी आक्रमणकर्त्यांनी जवळ जवळ 800 वर्षे राज्य केले. जुमिला शहराचे त्यांच्या सत्ताकाळात नाव होते युमिला-ला. या शहरामध्ये इस्लाम केंद्र फोफावले. स्पेनमधील मूळच्या ख्रिस्ती लोकांचे धर्मांतरण, त्यांच्या स्त्रियांना दासी बनवणे, त्यांना मुलं जन्माला घालण्याचे यंत्र बनवणे, लैंगिक गुलाम बनवणे हे उद्योग तिथे या आक्रमणकर्त्यांनी तब्बल 800 वर्षे केले. मात्र, इस्लामी राजवट ही परदेशी आहे, तिला उखडून टाकलेच पाहिजे, हा विचार शेकडो वर्षे इथल्या लोकांनी मनात जपला. त्यातूनच दि. 2 जानेवारी 1492 रोजी ग्रेनाडाचा अंतिम मूर शासक राजा बोआब्दिल याला स्पेनच्या ख्रिस्ती सेनेने पराभूत केले. स्पेनला कॅथलिक ख्रिस्ती शासन असलेला देश म्हणून घोषित केले. त्यांनी स्पेनमध्ये नियमच केला की, देशातील सगळ्या मुसलमानांनी कॅथलिक ख्रिस्ती धर्म स्वीकारायचा. ज्यांना ख्रिश्चन व्हायचे नसेल, त्यांनी स्पेन देश सोडून निघून जावे. स्पेनमधली हिंसेने धर्मांतरित केलेली मुस्लीम जनसंख्या पुन्हा ख्रिस्ती व्हावी, यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले. 1502 ते आज 2025 साल सुरू आहे. आज स्पेनमध्ये मुस्लीम अल्पसंख्याक म्हणजे पाच टक्के आहेत.
असो! स्पेनमध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिमांच्या मतभेदास कारणीभूत ठरले ते कोरदोबा चर्च. कोरदोबा ही इस्लामिक कारकिर्दीमध्ये मोठी मशीद होती. पण, स्पेनमध्ये इस्लामिक राजवटीचा शेवट होताच. स्पेनच्या राज्यकर्त्यांनी या मशिदीचे रूपांतर चर्चमध्ये केले. इथले मुस्लीम आताही अगदी रोमच्या पोपना पत्र लिहितात. सातत्याने न्यायालयाचे दरवाजे ठोठावतात की, कोरदोबा हे चर्च नाही, तर आमच्या पूर्वजांची मशीद आहे. तिथे आम्हाला नमाज पढू द्या. पण, त्यावर अर्थातच काही सुनावणी नाही. कारण, स्पेनवासीयांचा दृष्टिकोन आहे की, स्पेनमधले जे काही होते, आहे ते स्पेनमधल्या मूळच्या ख्रिस्ती लोकांचे आहे. बाहेरून येऊन स्पेनला गुलामीत खितपत पाडणार्या लोकांचे नाही.
मात्र, जगभरातील गैर-इस्लामिक देशांमध्ये तिथले काही मुस्लीम जे विचार करतात, तेच विचार स्पेनचेे काही मुस्लीमही करतात. ‘आम्ही स्पेनवर शेकडो वर्षे राज्य केले. आम्ही पुन्हा स्पेनवर राज्य करू,’ हे आजही त्यांचे स्वप्न. त्यामुळेच स्पेनमध्ये जुमिला शहरामध्ये मुस्लिमांच्या सणांना सार्वजनिक ठिकाणी बंदी घातली म्हणून, तिथले कट्टरपंथी मुस्लीम तसेच, तथाकथित पुरोगामी निधर्मी वगैरे चवताळले आहेत. त्यांनी जाहीर केले आहे की, जुमिला शहराच्या प्रशासनाचा निर्णय म्हणजे, ‘स्पेनचे संविधान खतरे में हैं।’ हे सगळे पाहून वाटते की, भारतातला इस्लाम आणि स्पेनमधला इस्लाम यांच्यात साम्य आहे का? नव्हे स्पेन आणि भारत काहीअंशी सम अनुभवातून गेलेला आहे आणि जातही आहे का?
9594969638