मुंबई : ठाण्यातल्या एका गुंडाला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी श्रीकांत शिंदेंनी दिल्याचा आरोप संजय राऊतांनी केला, त्यास शिंदे गटाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. “संजय राऊत यांचे डोके फिरले आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना उपचारांची गरज आहे. आमच्या ठाण्यातल्या मानसिक रुग्णालयात त्यांचा उपचार आम्ही करू. फक्त एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध टीका करायची आणि प्रसिद्धीच्या झोतात राहायचे, असे त्यांचे धोरण आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) उरलेल्या मंडळींबद्दल सहानुभूतीचे वातावरण तयार करायचे, यासाठी ते असे उद्योग करत आहेत, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
‘मांडवली बादशाह’ हीच ओळख
संजय राऊत सकाळी एक बोलतात, दुपारी एक बोलतात आणि संध्याकाळी एक बोलतात. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची अशी दशा होण्यामागे संजय राऊत आहेत, अशी चर्चा उरलेल्या सैनिकांमध्ये दबक्या आवाजात आहे. त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ते अशी वक्तव्य करत आहेत. संजय राऊत, सुनील राऊत कायम गुंड टोळ्यांच्या संपर्कात असतात. ‘मांडवली बादशाह’ असे त्यांच्या कुटुंबीयांबद्दल बोलले जाते, असेही नरेश म्हस्के म्हणाले.