जावेद अख्तर यांनी लाहोरच्या कार्यक्रमात ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्यावरुन पाकिस्तानचे कान टोचले, ते ‘काबिल-ए-तारीफ’च! पण, मायदेशी जसा अल्पसंख्याकांवरील तथाकथित अत्याचारांवरुन जावेदमियाँना पाझर फुटतो, तसा तो पाकिस्तानात का बरं फुटला नाही? तेथील हिंदूंसह इतर अल्पसंख्याकांवरील अत्याचाराविषयी जावेदमियाँनी थोडे तव्वजू केले असते, तर त्यांच्या सेक्युलॅरिझमला चार चाँदच लागले असते!
भारतातील सुप्रसिद्ध कवी, पटकथालेखक जावेद अख्तर यांनी गेल्याच आठवड्यात लाहोरला तशरीफ ठेवली. उर्दू कवी फैझ अहमद फैझ यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात जावेदमियाँनी शेरोशायरी, त्यांची लेखनप्रेरणा, लेखनशैली वगैरे साहित्यिक प्रश्नांवर अगदी चपखलपणे पाकिस्तानींच्या प्रश्नांवर भाष्य केले. जावेदमियाँनी दिलेल्या उत्तरांवर पाकिस्तानच्या दर्दी रसिकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कार्यक्रमाचा मंच आणि औचित्य जरी साहित्यिक कक्षेतील असले तरी शेवटी भारतातील मान्यवर व्यक्ती पाकमध्ये गेल्यावर इतर विषयांवरील चर्चा ही ओघाने आलीच. यावेळी जावेदमियाँनी दिलेल्या दोन उत्तरांवर त्यांच्यावर सध्या कौतुकवर्षाव माध्यमजगतात सुरू आहे.
अनेक ज्येष्ठ पाकिस्तानी कलाकारांचे संगीत कार्यक्रम वगैरे भारतात झाले. कित्येक पाकिस्तानी गायकांना तर भारतीय चित्रपटसृष्टीने ओळख मिळवून दिली. पण, गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना पाकिस्तानकडून कधी कुठल्याही संगीत कार्यक्रमाचे साधे निमंत्रणही का आले नाही, असा एक सवाल जावेदमियाँनी उपस्थित केला. जावेदमियाँचा प्रश्न म्हणा अगदी रास्तच. कारण, भारतात येऊन कित्येक पाकिस्तानी कलाकारांनी त्यांच्या देशातही कमावली नसेल एवढी प्रसिद्धी अन् पैसा भारतभूमीत पदरात पाडला. पण, याउलट पाकिस्तानने मात्र भारतीय कलाकार आणि विशेषत्वाने हिंदू कलाकारांविषयी कायमच द्वेषपूर्ण भूमिका घेतली. भारतीय मालिका, चित्रपट अशा सगळ्याच बाबी पाकिस्तानातून हद्दपार केल्या. त्यावर एक ज्येष्ठ भारतीय कलाकार म्हणून जावेदमियाँनी व्यक्त केलेली जाहीर नाराजी स्वागतार्हच. पण, हे सगळे असे का, याचे उत्तर खरंतर जावेदमियाँच्या प्रश्नातच दडले आहे, ते त्यांनाही पुरते ठावूक आणि राहता राहिला प्रश्न लतादीदींचा तर, असे निमंत्रण यदाकदाचित पाकिस्तानातून आलेही असते, तरी भारतीय सैनिकांचे रक्त सांडणार्या देशाच्या पायाची धूळही राष्ट्राभिमानी दीदींनी त्यांच्या वहाणेला लागू दिली नसती.
‘ए मेरे वतन के लोगो’तून समस्त भारतीयांना शूर सैनिकांच्या हौतात्म्याचे वीरस्मरण करून देणार्या लतादीदी... त्यांनी कधीही ‘कलेला देशाच्या सीमा नसतात’ वगैरे या पुरोगाम्यांच्या थोतांडाला थारा दिला नसता, हे वेगळे सांगायला नकोच. त्यामुळे वेळोवेळी हिंदूंनी राजकीय असेल किंवा कलाक्षेत्र असेल, पाकिस्तानप्रती मैत्रीचा हातच पुढे केला. परंतु, पाकिस्तानने कायमच ‘मजहब’ वरून ‘गहजब’च माजवला, याला इतिहास साक्षीदार आहे. दुसरा मुद्दा दहशतवादाचा. “ ‘२६/११’चे दहशतवादी हल्लेखोर नॉर्वे किंवा इजिप्तमधून मुंबईत आले नव्हते. ते अजूनही तुमच्यातच वावरत आहेत,” असे म्हणत जावेदमियाँनी पाकड्यांना फटकारले, तेही सर्वस्वी योग्यच. त्यामुळे इस्लामिक पाकिस्तान हाच दहशतवाद्यांसाठी जन्नत आहे, याची जावेदमियाँनी दिलेली ही कबुलीही तितकीच महत्त्वाची! जावेद अख्तरांनी त्यांच्या उत्तरांतून पाकिस्तानला खडे बोल सुनावले हे खरेच; पण पाकड्यांना आरसा दाखवताना मात्र जावेदमियाँनी तो अर्धवट आणि त्यांना जो सोयीस्कर वाटला तसाच दाखवला, याकडे कदापि दुर्लक्ष करुन चालणार नाही!
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून बिथरलेल्या टोळीतील पुरोगामी सदस्यांपैकी एक म्हणजे जावेदमियाँ. त्यांना मोदी ‘फॅसिस्ट’ भासतात आणि हिंदुत्ववादी तालिबानी! मुस्लीमद्वेष ही भाजपची लाईफलाईन आहे, असे जावेदमियाँचे उदात्त विचार. म्हणूनच ‘सीएए’, ‘एनआरसी’ला विरोध करणार्या कंपूमध्ये वयाची ७५ वर्षे उलटली तरी जावेदमियाँ आघाडीवर होतेच. मोदींच्या पंजाबमधील सुरक्षेची चूक ज्यांना कपोलकल्पित वाटली, तेच हे जावेदमियाँ. दिवाळीची जाहिरात ‘जश्न-ए-रिवाझ’ अशी केली म्हणून ज्यांनी विरोध केला, त्यांना फटकारणारे सेक्युलरवादी जावेदमियाँ. बुरख्यावर बंदी घातली, तर घुंगटवरही घाला, म्हणून आग्रही असलेले जावेदमियाँ. भारतातील अल्पसंख्याक आणि त्यातही केवळ मुसलमानांचे मोदी सरकार सत्तेत आल्यापासून दमन होतेय, असा पूर्वग्रह दूषित असणारे असे हे जावेदमियाँ. अशी ही त्यांची पुरोगामी ओळख. आपल्याच देशातील ख्रिश्चन, पारशी या अल्पसंख्याकांविषयी मात्र हे जावेदमियाँ कधीही तळमळीने बोलल्याचे आठवत नाही. त्यातच भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारले पाहिजेत, असाही त्यांचा एक सूर. सेक्युलॅरिझमचे ते अगदी खंदे समर्थक.
नुकतेच ते लाहोरला, म्हणजे मुस्लीमबहुल पाकिस्तानात जाऊन आले. पण, भारतात अल्पसंख्याकांवरील अत्याचारांचा कळवळा येणार्या जावेदमियाँनी पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या दुर्देशीविषयी तिथे तोंडातून साधा ‘ब्र’ही काढला नाही. म्हणजे, भारतात असले की हे हाडाचे सेक्युलर आणि अल्पसंख्यांकांची काळजी वाहणारे शहजादे. पण, सीमा ओलांडली, इथले अल्पसंख्य ते तिथे बहुसंख्य झाले रे झाले की, मग तिथले अल्पसंख्य तर यांच्या खिसगणतीतही नाहीत. कारण, तसे असते तर जावेदमियाँनी पाकिस्तानातील हिंदूंवरील अत्याचार, हिंदू महिलांचे बळजबरी धर्मांतरण आणि विवाह, अहमदिया, शिया, ख्रिश्चन बांधवांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, त्यांच्यावरील ईशनिंदेचे खटले, मॉब लिचिंग याविषयी पाकिस्तान सरकारचीही कानउघडणी केली असतीच की... पण, जावेदमियाँच्या स्वप्नातही ते येणार नाहीच म्हणा!
म्हणूनच पाकिस्तानात असताना जावेदमियाँनी केवळ दहशतवाद, कलाकारांसाठीच्या सीमारेषा यांसारख्या वरवरच्या टाळ्या मिळतील अशा विषयांनाच हात घातला. पाकिस्तानातील अल्पसंख्यांवरची आपबिती, या इस्लामिक देशातील कायदेकानुन, दिवाळखोरीकडे होणारी वाटचाल यांसारख्या जावेदमियाँनाच गोत्यात आणतील, अशा प्रश्नांवर मात्र त्यांनी भाष्य करायचे कटाक्षाने टाळले. अशा विषयांवर जावेदमियाँनी घेतलेले हे सोयीस्कर मौन म्हणूनच अधिक बोलके ठरावे.तेव्हा, जावेदमियाँ जे बोलले, चर्चा अन् कौतुक त्याचेच झाले. पण, खरंतर जावेद अक्तर पाकिस्तानात जे अजिबात बोलू शकले नाहीत, जे प्रश्न थेटपणे तिथे विचारु शकले नाहीत, त्याबद्दल त्यांना आज प्रश्न विचारणे हे क्रमप्राप्तच! कारण, असा हा सोयीस्कर स्मृतिभ्रंश झालेल्या जावेदमियाँसारख्या ढोंगी पुरोगाम्यांचा दुटप्पीपणा भारतीयांनी समजून घ्यायलाच हवा!