एका अढळ ‘उल्के’ची गोष्ट

    31-Dec-2023   
Total Views |
Article on Ulka Vartak

विद्यादान हा आपला धर्म! त्यावर नियतीचीही टाच येऊ नये, यासाठी सदैव जागरूक असलेल्या, उल्का वर्तक यांच्या कार्याविषयी...

ती अचानक घाबरली. तिच्या पुढ्यात एक मध्यमवयीन, स्थूल माणूस येऊन बसला आणि म्हणाला की खेळ. तो पुरूष अनोळखी असता, तर कदाचित ती भ्यायली नसती; पण ते होते-ती शिकत असलेल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य. महाविद्यालयामधून बुद्धीबळ खेळणारा प्रतिनिधी निवडायचा होता आणि तिच्या समोरच्या खुर्च्या पटापट रिकामी होत होत्या. याही डावात तिनेच बाजी मारली आणि जिंकलो म्हणून रडू लागली. आपण पुरुषासोबत खेळलो, हेच मामाला कळले, तर तो आपल्याला खूप रागावेल या भीतीने. पाच वर्षांची असताना तिचे वडील वारले. आईने फुलांचे गजरे, हार करून बाजारात जाऊन विकून, त्या पैशावर दोन मुलींना मोठं केलं. मामाने त्यांना राहायला घरात आश्रय दिला. तेव्हापासून मामाची आदरयुक्त भीती.

मामाने मात्र आपला खंबीर हात दोघींच्याही पाठीवर ठेवला. आणि मग तिला आभाळाचेच पंख लाभले. नाटकात कुणालाही न जमणार्‍या भूमिका तिला सहज जमायच्या. शुद्ध प्रमाणभाषेत बोलणार्‍या कुटुंबातली मुलगी वनवासींची भाषा अस्खलित बोलत होती. नाटकाला आणि त्यानिमित्ताने महाविद्यालयासोबतच मुंबई विद्यापीठाचं नाव नॅशनलपर्यंत नेणारी, ही मुलगी नाटकाच्या ग्रुपमध्ये असावी, म्हणून सगळे तिच्या वेळासुद्धा सांभाळून घेत. घरातली सगळी कामं आवरून महाविद्यालयात जाणं, त्यानंतर शिकवणी घेऊन झाल्यावर, आईला गजरे करायला मदत करून मिळेल, त्या वेळात नाटकाचा सराव आणि खो-खो.

खो-खोचं मैदान म्हणजे उल्काचा जीव की प्राण. नऊ मिनिट पूर्ण होऊन सामना संपला, तरीही तिला बाद करता येत नसे. इतकी चुणचुणीत, चपळ. या सगळ्या गुणांसोबत सौंदर्यसुद्धा होतंच. मग अहंकार कसा मागे राहील? कमालीचा हट्टी स्वभाव आणि आपलं तेच खरं मानण्याची वृत्ती. एवढं असून महत्त्वाकांक्षा मात्र दृष्टिपथातल्याच होत्या. तिला शिक्षिका व्हायचं होतं. बस्स! तेवढंच. शिक्षिका होऊन महिन्याचे नियमित पैसे मिळवायचे आणि आपल्या पायावर उभं राहायचं. एका शाळेत नोकरी लागली आणि आज २५ वर्षं तेच आपलं कर्तव्य समजून मुलांसाठी झटते आहे.
 
या वाटेवरही अडचणी होत्या. चांगले वरिष्ठ मिळायला, नशीबच लागतं कदाचित. तिच्या मुख्याध्यापकांनी जगणं नको, इतका त्रास दिला. नोकरी सोडायचा विचारही करता येत नव्हताच. सासू, नवरा, मुलगी या तिघांसोबत घराची संपूर्ण जबाबदारी तिच्यावरच होती. सोबतच बाबा आणि भाऊ नसल्याने आईकडेही पाहावं लागत होतंच. तसा बहिणीचा आधार होता. परंतु, तिची स्फूर्ती म्हणजे तिचे ढ विद्यार्थी. त्यांनीच तिला बळ दिलं. आशा विझू दिल्या नाहीत. ’एमए’ पहिल्या वर्गातून पास होऊन, विशेष सन्मान मिळवणारी, उल्का दहावीच्या मुलांना अ, आ, इ, ई लिहायला शिकवत होती!

कांदिवलीच्या चारकोपजवळ डहाणूकर वाडीत तिची शाळा. श्री ज्ञानेश्वर विद्या मंदिर. आजूबाजूला चाळी आणि झोपडपट्टी. मराठी माध्यमाची खासगी शाळा, शुल्क मात्र अत्यल्प. तेव्हा आजूबाजूच्या झोपडपट्टी चाळीतले सर्व विद्यार्थी या शाळेत येत. त्यांच्या घरात आया चार घरची धुणी भांडी करत, बाबा रिक्षा चालवत, काही आया दुसर्‍या पुरुषांचा हात धरून पळून गेलेल्या. चिल्ली पिल्ली वार्‍यावर, कधी नातेवाईकांच्या वळचणीला असलेली. मग अशा मुलांना अभ्यासाची गोडी कशी लागणार? त्यांचे शाळेत लक्ष नसतेच. बरीच मुलं पाचवीपासूनच वाया गेलेली असत. नववीत येईपर्यंत त्यांना वाचतासुद्धा येत नाही. मुलं हुशार पण पालकांनी आणि शिक्षकांनी मेहनत घेतली नसते, अशा मुलांना शिकवायचं कार्य वरच्या वर्गातले शिक्षक करतात.

शाळेचा दरवर्षी निकाल मात्र 100 टक्के लागतो. आणि तो लागावा म्हणून मुलांना तयार करणं, केवळ लिहायला-वाचायला शिकवणं एवढंच नाही, तर त्यांना विचार करायला लावणं, दृष्टिकोन देणं, त्यांच्यावर संस्कार करणं, इतरांशी कसं वागावं हेच शिकवणं, मूल्यांची-नीतीची रुजवण करणं हेच तिचं काम. त्या सर्व विद्यार्थ्यांचे पालक आपणच ही उल्काची भूमिका. जे आईवडील आपल्या मुलांना बाहेरच्या जगात पाठवताना, त्यांच्या सर्वांगीण विकासाची जबादारी अशिक्षितपणामुळे किंवा गरिबीमुळे घेऊ शकत नाहीत, त्यांच्या पाल्ल्यांना संस्कारांचे डोळे देण्याचं, काम उल्काने आपण होऊन आपल्याकडे घेतले. यात खंड पडू दिला नाही. प्रसंगी स्वतःच्या लेकीकडे लक्ष दिले नाही. परंतु, एका मुलीपेक्षा शाळेतल्या मुलांची जबाबदारी तिला मोठी आणि महत्त्वाची वाटली.

मधल्या काळात अपघात झाले. तीन वेळा पायाची शस्त्रक्रिया करावी लागली. पायांमध्ये स्टीलचे रॉड्स आहेत. शेवटच्या अपघातात पायाची स्थिती इतकी वाईट की, आधी घातलेला रॉड बाहेर डोकावून पाहू लागला. आता ती चालूही शकणार नाही, पायही कापावा लागेल अशी स्थिती; परंतु अदम्य इच्छाशक्ती! आपली नोकरी बंद झाली, तर आपल्या हूड असलेल्या एकूलत्या एका लेकीचे भविष्य सुरुवात होण्याआधी संपून जाईल, आपल्या लेकीला आवश्यक वाटेपर्यंत आधार द्यायचा, या प्रेरणेने ती पुन्हा उठून उभी राहिली. चालता येऊ लागलं. ट्रेनचा प्रवास पुन्हा सुरुवात झाला आणि डोळ्यावरची झापड बाजूला सरून पुन्हा उजेड यावा, तसेही तिला तिची मुलं, तिचे विद्यार्थी लख्ख दिसू लागले. तिने पुन्हा शाळेत जायला सुरुवात केली. आज सर्व स्थिरस्थावार झाल्यावरही स्वेच्छानिवृत्ती न घेता, सेवानिवृत्ती येईपर्यंत मुलांसाठी झटणार्‍या, कुटुंबासोबतच परंपरागत वाडी-बागेची, त्यात तिने लागवड केलेल्या तिच्या झाडांची, तिच्या माडांची काळजी घेणार्‍या, उल्काला तिच्या अढळपणाबद्दल अभिनंदन. अनेक अडचणींवर मात करूनही, रोजचा तीन तासांचा प्रवास करून, अखंड विद्यादानाचं व्रत घेतलेल्या उल्काबाईंना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.