सरत्या वर्षात ८०,५६३ घरांचे नुकसान! अहवालात माहिती उघड
30-Dec-2023
Total Views |
नवी दिल्ली : सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्वरायमेंटने (सीएसई) केलेल्या सर्व्हेक्षणात नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला आहे. यंदा एल-निनोमुळे उशिराने मोसमी पाऊस सक्रीय होणे, अतिवृष्टी, पूर, गारपीट, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. या नैसर्गिक आपत्तींमुळे वर्षभरात देशात २,९२३ जणांचा मृत्यू झाला आहे. पूर, अतिवृष्टीमुळे, पाण्याच्या वेगवान प्रवाहांमुळे देशातील १८.४ हेक्टर सुपीक जमिनीचे आणि पिकांचे नुकसान झाले आहे. पूर, दुष्काळी स्थिती आणि भूस्खलनामुळे ९२, ५१९ जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर देशभरात ८०,५६३ घरांचे नुकसान झाले आहे. अशी माहिती सर्व्हेक्षणातुन उघड झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नैसर्गिक आपत्तींचा सर्वांधिक फटका मध्य प्रदेशला बसला. बिहारमध्ये सर्वांत जास्त जिवितहानी झाली. जून ते सप्टेंबर या काळात बिहारमध्ये ६४२ जणांचा मृत्यू झाला आहे. याच काळात हिमाचल प्रदेशात ३६५ तर उत्तर प्रदेशात ३४१ जणांचा मृत्यू झाला आहे. या नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक फटका गरीब, शेतकरी वर्गाला बसला आहे.
ए ईयर ऑफ क्लाइमेट ब्रेकडाउन, या नावाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, २०२३मध्ये जगाला २० सर्वांत मोठ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, वादळे आणि जंगलांना लागलेल्या आगींचा १४ देशांना सर्वाधिक फटका बसला. त्यात अमेरिकेतील हवाईमधील जंगलांना लागलेली आग, गुआम, वानुअतु, न्यूझीलंडमध्ये आलेली वादळे, न्यूझीलंड, इटली, लिबिया, पेरु, चिली आणि हैती आदी देशात आलेला महापूर आणि स्पेनमधील दुष्काळ आदींचा समावेश आहे.