नवी दिल्ली : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सरचिटणीस सीताराम येचुरी यांना रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठाणादिनी अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्यांनी अभिषेक समारंभाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. दि. २२ जानेवारीला अयोध्येमध्ये हा सोहळा होणार आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे मात्र ते सुद्धा न येण्याही शक्यता आहे. दरम्यान सीताराम येचुरी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्याचे सांगितले आहे.
सीताराम येचुरी हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) नेते आहेत. सीपीएम हा भारतातील सर्वात मोठा डावा पक्ष आहे. दरम्यान श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांच्या वतीने मान्यवरांना निमंत्रण पत्रे पाठवली जात आहेत. काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खर्गे, माजी काँग्रेस अध्यक्षा आणि लोकसभा खासदार सोनिया गांधी, काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी या महत्त्वाच्या विरोधी नेत्यांनाही राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग आणि एडी देवेगौडा यांनाही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि बसपा प्रमुख मायावती यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. राममंदिर आंदोलनासाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनाही या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे.