सिंधुदुर्गात सापडणारी कोच वनस्पती 'नष्टप्राय' श्रेणीत; महाराष्ट्रातील 3 वनस्पती 'लाल यादीत'!

    23-Dec-2023   
Total Views |
iucn red list plant


मुंबई (अक्षय मांडवकर) -
'इंटरनॅशनल यूनियन फाॅर काॅन्झर्वेशन आॅफ नेचर'च्या (आययूसीएन) (iucn red list plant) लाल यादीत महाराष्ट्रात आढळणाऱ्या वनस्पतीच्या तीन प्रजातींना धोकाग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. निसुर्डीच्या कुळातील दोन प्रजातींना 'संकटग्रस्त' (एनडेंजर्ड) आणि कोच कुळातील एका प्रजातीला 'नष्टप्राय' (क्रिट्रीकली एनडेंजर्ड) श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. (iucn red list plant) यामुळे सह्याद्रीत अगदी मोजक्याच ठिकाणी सापडणाऱ्या या प्रजातींच्या संवर्धनाची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. (iucn red list plant)
 
 
'आययूसीएन'च्या लाल यादीसाठी लागणारी प्रजातींबद्दलची माहिती 'स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशन'कडून (एसएससी गट) पुरवली जाते. म्हणजे या प्रजाती कुठे आणि कशा स्थितीत आहेत, त्यांना धोके कुठले आहेत आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी काय उपाय करायला लागतील ही माहिती 'एसएससी' गट पुरवतात. 'वेस्टर्न घाट प्लान्ट स्पेशलिस्ट गुप्र' (डब्लूजीपीएसजी) हा 'आययूसीएन'च्या लाल यादीसाठी पश्चिम घाटातील वनस्पतीच्या प्रजातींचे मूल्यांकन करणारा 'एसएससी' गट आहे. या गटामध्ये वनस्पतीशास्त्रात काम करणारे अनेक शास्त्रज्ञांचा सहभाग आहे. या गटाने महाराष्ट्रातील 'लेपिडागॅथीस क्लॅवटा', 'अॅडेलोकेरियम मलबॅरिकम' (काळी निसुर्डी) आणि 'अॅडेलोकेरियम लॅम्बर्टियनम' (हिरवी निसुर्डी) या तीन प्रजातींची 'आययूसीएन''च्या लाल यादीत धोकाग्रस्त प्रजातींच्या श्रेणींमध्ये नोंद केली आहे. 'लेपिडागॅथीस क्लॅवटा' या प्रजातीला 'नष्टप्राय' आणि काळी व हिरव्या निसुर्डीला 'संकटग्रस्त' प्रजातींच्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे.
 
 
कोच कुळातील 'लेपिडागॅथीस क्लॅवटा' ही प्रजात पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ आहे. म्हणजेच जगात ती केवळ पश्चिम घाटात सापडते. सध्या ही प्रजात केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुल गावातील सडा आणि कर्नाटकातील चोरला घाटामधील सड्यावर सापडते. २०१६ साली १६६ वर्षांनी या प्रजातीचा पुनर्शोध लावण्यात आला होता. या प्रजातीला नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यादरम्यान फूल येतात. हिरवी निसुर्डी ही प्रजात महाराष्ट्रासाठी प्रदेशनिष्ठ असून तिला सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात पांढरट निळ्या रंगाची फूल येतात, तर काळी निसुर्डी ही महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये आढळत असून तिला आॅगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान निळ्या रंगाची फुल येतात. या तिन्ही प्रजाती सह्याद्रीमधील उंच पठारांवर आढळतात. आढळक्षेत्राची मोजकीच ठिकाणे आणि अधिवास नष्टता यामुळे या प्रजातींना 'आययूसीएन'च्या लाल यादीत स्थान देण्यात आले आहे.
 
 
 
अधिवासाचे संवर्धन महत्त्वाचे
'नष्टप्राय' आणि 'संकटग्रस्त' या वर्गात समाविष्ट झालेल्या या तिन्ही प्रजाती महाबळेश्वर आणि आंबोली मधील पठारे आणि कडे या अधिवासातील आहेत. या प्रजाती जंगलात वाढणाऱ्या नसून त्या नैसर्गिक मोकळ्या जागेवरच वाढू शकतात. त्या फार पसरू शकत नाहीत. त्यामुळे त्यांची संख्या मुळातच मर्यादित होती. आज सह्याद्रीतील वाढते शहरीकरण, रस्ते, पर्यटनाचा विकास यामुळे या वनस्पतींच्या खुल्या अधिवासांचा नाश होत आहे. जंगल संरक्षणाकडे जितके लक्ष दिले जाते तितके दुर्दैवाने खुल्या अधिवासांकडे दिले जात नाही. पण महाराष्ट्रातील अनेक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या संरक्षणासाठी या खुल्या अधिवासांचे सुयोग्य नियोजन अत्यावश्यक आहे. - डाॅ. अपर्णा वाटवे, समन्वयक, वेस्टर्न घाट प्लान्ट स्पेशलिस्ट गुप्र
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.