तांब्या-पितळेच्या वस्तूंचे जाणते संग्राहक

    14-Dec-2023
Total Views | 219
manoj tilpule
 
तांब्या-पितळेच्या जुन्या वस्तू जतन करण्याच्या, लोकांपुढे आणण्याच्या प्रयत्नांतून पुण्यातील संग्राहक गिरीश पोटफोडे यांनी त्यांचा संग्रह पाहण्यासाठी उपलब्ध केला आहे. त्यांच्याविषयी...
 
तांब्या-पितळेच्या अनेक घाटदार, कलाकुसर असलेल्या वस्तू दैनंदिन वापरातून कशा हळूहळू गायब झाल्या, कळलेही नाही. आता त्या वस्तू पाहायलाही मिळणार नाहीत, असे मनात असतानाच कळते की, पुण्यात या वस्तूंचे एक संग्राहक आहेत, त्यांनी आत्मीयतेने गोळा केलेला संग्रह पाहण्यासाठीदेखील उपलब्ध आहे.
 
पाहण्यासाठी कसबा पेठेत पोहोचलो. गिरीश पोटफोडे यांनी इमारतीच्या तळमजल्यावर संग्रहाचे ’आनंदी संसार’ प्रदर्शन उभे केले आहे. तिथे लहानशा जागेत शेकडो वेगवेगळ्या वस्तू छान झळाळत्या मांडून ठेवलेल्या आहेत. याची सुरुवात कशी झाली, असे विचारताना गिरीशजींनी इतिहासकाळापासून आठवणींचा, माहितीचा एक विस्तृत पटच उभा केला.
पुण्यात ऐतिहासिक काळापासून, धातूच्या पत्र्यापासून भांडी तयार करण्याचे काम कसब्यात चालत आले आहे. गिरीशजी सांगतात की, ”प्रामुख्याने पितळेच्या पत्र्यापासून भांडी तयार केली जात. हे काम फार कष्टाचे असायचे. पुढे काळ बदलत गेला, यंत्रावर धातूकाम सुरू झाले. तांब्या-पितळेच्या भांड्यांना पर्याय आले. इथली मागणी कमी झाली, पुढच्या पिढ्यांनी शिक्षणाची वाट धरली आणि आज अनेक क्षेत्रांत ते करिअर करीत आहेत.”
 
गिरीश पोटफोडे यांचे शिक्षण ‘नुमवि’त झाले. त्यांचे वडील शिक्षणाबाबत खूप आग्रही होते. गिरीशजी कबड्डी आणि खो-खोमध्ये विद्यापीठ स्तरीय खेळाडू होते. शिक्षणानंतर ते ’टेल्को’त ते रुजू झाले. गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ ते समाजकार्यात सक्रिय आहेत. विशेषतः शिक्षण, संस्कार यांच्याशी संबंधित विषयात ते कार्यरत आहेत. ’त्वष्टा कासार समाज संस्थे’शी ते निगडित आहेत. वाचनालयाशी संबंधित त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. दरवर्षी मुलांचे शिबीर भरवण्यातही ते पुढाकार घेतात.
ते सांगतात की, “संस्थेच्या शताब्दी वर्षात तांब्या-पितळेच्या वस्तूंचे एक प्रदर्शन भरवण्यात आले होते. तसेच २०१७ मध्ये सव्वाशेव्या वर्षीही एक प्रदर्शन भरवले. तिथे विक्रीचीही सोय केली होती. मात्र, २५ वर्षांनी होणारी ही प्रदर्शने काही दिवसांसाठीच होती. त्याचवेळी कायमस्वरुपी प्रदर्शने भरवावीत, अशी मागणी होती; मात्र जागेची अडचण होती.”
 
त्यानंतर गिरीशजी निवृत्त झाले. पुढे ’कोविड’ची साथ आली. त्यावेळी संचारबंदीच्या काळात घरात असताना, त्यांनी प्रदर्शनकामी स्वतः पुढाकार घेण्याचे ठरवले. ’कोविड’नंतर तांब्या-पितळेच्या भांड्यांचे महत्त्व पुन्हा एकदा लोकांच्या लक्षात येत होते. त्यांच्या आजींना या भांड्यांची फार आवड. संसारात घंगाळे, घागरी आणि पाणी तापवण्याच्या बंबापासून खूप वस्तू त्यांनी हौसेने जमवल्या होत्या. त्या गिरीशजींकडे होत्याच. तळमजल्यावरची मुलांच्या अभ्यासासाठी घेतलेली जागा रिकामी होती. तिथेच या संग्रहाचे प्रदर्शन मांडण्याची कल्पना उभयतांनी प्रत्यक्षात आणली. आनंदी हे त्यांच्या आजीचे नाव. तेच त्याला दिले आणि ‘आनंदी संसार’ आकाराला आला.
 
सगळी आवश्यक रचना करून त्यांनी वस्तूंची व्यवस्थित मांडणी केली. प्रकाशयोजनाही अगदी साजेशी. तांब्या-पितळेच्या भांड्यांना सगळ्यात मोठी अडचण असते, ती काळी पडण्याची. प्रदर्शनात काळी भांडी कशी रुचतील? तेव्हा ती चकचकीत करून घेतली. ती वारंवार काळी पडू नयेत, यासाठी भांड्याना एक खास प्रकारची (कल्हई) कोटिंग करून घेतले.
आज येथे विविध प्रकारचे पाण्याचे जग, फिरकीचा तांब्या, पानसुपारीचे डबे, दिवे, स्वयंपाकाची आणि जेवणाची सर्व प्रकारची भांडी, घंगाळे, पाण्याच बंब, कीचेन, शोभेच्या वस्तू, अगदी पितळेची पर्सही आहे. महाराष्ट्रातली वेगवेगळ्या घाटांची भांडी, कळशा त्यांच्याकडे आहेत. मोठी भांडी आहेत आणि अगदी भातुकलीची भांडीही आहेत. तांबे, पितळ आणि चांदीच्या अनेक वस्तू आहेत. लहानशा जागेत उभा केलेला, हा वस्तूंचा ’संसार’ पाहून थक्क व्हायला होते.
 
या संग्रहात पाहणार्‍यांकडून ही भर पडत गेली. अनेकांनी गिरीशजींना त्यांच्याकडील काही खास पितळी वस्तू दिल्या आहेत. सामाजिक कार्यामुळे त्यांचा परिचय सर्वत्र आहे. त्यामुळे अगदी मोडीतली भांडी ज्यांच्याकडे येतात, त्यांच्यापासून अनेकांची वस्तू गोळा करण्यासाठी मदत होते. गिरीशजी केवळ प्रदर्शन उभे करून थांबले नाहीत. या संग्रहात असलेल्यांपैकी अनेक वस्तू आजही उत्पादक तयार करतात. त्या तयार करणार्‍यांचे संपर्क क्रमांकही त्यांनी तिथेच उपलब्ध केले आहेत. हेतू हा की, कुणाला ती हवी असतील, तर त्यांनी निर्मात्याशी थेट संपर्क साधून विकत घ्यावीत. त्यामुळे वस्तूंच्या निर्मात्यांनाही लाभ होतो, असे ते सांगतात. हा सकारात्मक दृष्टिकोन सुखावून जातो.
 
गिरीशजी सामाजिक कार्याला भरपूर वेळ देतात. त्यांनी स्वखर्चाने हे प्रदर्शन उभे केले. अनेक जण संग्रहाला भेटी देतात, त्यात डिझायनर असतात, इंटेरिअरशी संबंधित मंडळी असतात. अनेक कुटुंबे या प्रदर्शनाला भेट देतात. त्यात प्रौढ गृहिणीही असतात. भांडी पाहून त्यांच्यापैकी काहींच्या जुन्या आठवणीही जाग्या होतात. अशा सर्वांना हा संग्रह पाहून जो आनंद मिळतो, त्याचे समाधान खूप मोठे आहे, असे गिरीशजी सांगतात.
 
पुढील योजनांविषयी विचारले असता, त्यांनी सांगितले की, ” ‘त्वष्टा कासार समाज संस्थे’तर्फे अधिक मोठ्या जागेत, इतरांचा सहभाग घेऊन, त्यांच्याही वस्तूंना जागा देऊन एक कायमस्वरुपी प्रदर्शन उभारण्याची योजना विचाराधीन आहे. ते झाल्यावर देश-परदेशातून येणारे पर्यटक वस्तू पाहू शकतील.
या वस्तूंना मागणी आली, तर निर्मात्यांचाही लाभ होईल. पुढच्या पिढ्या शिकलेल्या आहेत. त्यांच्यापैकी काहींचा याकडे कल दिसतो. या वस्तूंना पुन्हा मागणीही वाढू लागली आहे, त्यामुळे या वस्तूंचे, कलाकुसरीचे काम उत्तम प्रकारे पुढे होत राहील, असा विश्वास वाटतो.
मनोज तुळपुळे
(अधिक माहितीसाठी संपर्क - ९९७५५०७२८३)
अग्रलेख
जरुर वाचा
मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121