श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी शाही ईदगाद मशिदीचे होणार न्यायालयीन सर्वेक्षण
14-Dec-2023
Total Views | 67
नवी दिल्ली : कृष्ण जन्मभूमी-शाही इदगाह मशीद वादाच्या संदर्भात शाही-इदगाह मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी न्यायालयीन आयुक्त नेमण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी स्वीकारली आहे.न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांनी हिंदू देवता भगवान श्रीकृष्ण विराजमान आणि इतर सात हिंदू पक्षांच्या वतीने दाखल केलेल्या अर्जावर हे निर्देश दिले आहेत. हा अर्ज उच्च न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या मूळ खटल्याचा भाग म्हणून दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये फिर्यादीने (हिंदू पक्ष) दावा केला आहे की मथुरा शाही ईदगाह मशीद कृष्ण जन्मभूमी जमिनीवर बांधण्यात आली होती.
अर्जदारांनी आरोप केला की शाही इदगाह मशीद ही हिंदू मंदिर आहे. या दाव्याचे समर्थन देण्यासाठी विविध संकेत अस्तित्वात आहेत. त्यामुळे या जागेची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्याची विनंती अर्जदारांनी न्यायालयाकडे केली होती. हा अर्ज हरी शंकर जैन, विष्णू शंकर जैन, प्रभा पांडे आणि देवकी नंदन या वकिलांच्या माध्यमातून दाखल करण्यात आला होता. मथुरा शाही इदगाह मशीद कृष्णजन्मभूमीवर बांधली गेल्याच्या कारणावरून ती हटवण्याची मागणी मुख्य दाव्यात आहे.
न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक – विष्णु शंकर जैन
अलाहाबाद उच्च न्यायालयाने आमचा अर्ज स्वीकारला आहे, ज्यामध्ये आम्ही (शाही इदगाह मशिदीचे) अधिवक्ता आयुक्तांकडून सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. 18 डिसेंबर रोजी सर्वेक्षणाची रूपरेषा ठरविली जाईल. न्यायालयाने शाही इदगाह मशिदीचा युक्तिवाद फेटाळला असून न्यायालयाचा हा ऐतिहासिक निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया हिंदू पक्षाचे वकील विष्णु शंकर जैन यांनी दिली आहे.