बेस्ट बसचा प्रति किलोमीटरमागे खर्च तब्बल १९३ रुपये; मासिक खर्च २४० कोटी, तर उत्पन्न केवळ ६० कोटी
13-Dec-2023
Total Views | 28
नागपूर : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसचा प्रति किलोमीटरमागे खर्च तब्बल १९३ रुपये असल्याची लेखी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका लक्षवेधीवरील उत्तरात दिली आहे. तसेच बेस्ट उपक्रमाचे मासिक उत्पन्न ६० कोटी, तर खर्च २४० कोटी इतका असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
खासगी बस ताफ्यात दाखल करूनही बेस्ट उपक्रमाचे उत्पन्न वाढण्याऐवजी सातत्याने तोटा सहन करावा लागत असल्याचा मुद्दा विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित करण्यात आला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर सादर केले आहे. बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या बसचा खर्च प्रति कि.मी. १९३.६४ रुपये तर भाडेतत्वावरील बसेसचा खर्च प्रति कि.मी. १२० रुपये इतका असल्यामुळे स्वमालकीपेक्षा भाड्याच्या गाड्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.
जास्तीत जास्त प्रवाशांनी सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा अवलंब केल्यास प्रदुषण पातळी कमी करण्यास मदत होईल, या हेतूने ९ जुलै २०१९ पासून बेस्टच्या प्रवासभाड्याचे सुसूत्रिकरण करण्यात आले. त्यानुसार कमीत कमी प्रवासभाडे ८ रुपयांवरून ५, तर वातानुकूलित बससाठी कमीत कमी प्रवासभाडे २० वरून ६ रुपये इतके कमी करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत बेस्ट उपक्रमाचे मासिक उत्पन्न ६० कोटी असून, मासिक खर्च २४० कोटी इतका आहे. १८० कोटी इतकी मासिक तोट्याची रक्कम मुंबई पालिकेकडून अनुदान स्वरुपात प्राप्त होत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी उत्तरात म्हटले आहे.
२०२७ पर्यंत संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक
प्रदुषण कमी करण्याच्या उद्देशाने २०२७ पर्यंत बेस्टचा संपूर्ण बसताफा इलेक्ट्रिक बसगाड्यांचा करण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्यानुसार २ हजार १०० एकमजली व ९०० दुमजली इलेक्ट्रिक, तसेच २०० एकमजली सीएनजी अशा एकूण ३ हजार २०० बसगाड्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. सद्यःस्थितीत ३५ दुमजली व ४५ एकमजली अशा एकूण ८० गाड्या बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट झाल्या आहेत. कामगार संघटना आणि पालिका प्रशासनात झालेल्या सामंजस्य करारानुसार बेस्ट उपक्रमाचा स्वमालकीचा बसताफा ३ हजार ३३७ इतका कायम ठेवला जाणार आहे. २०१८-१९ मध्ये प्रतिदिन २२ लाख इतकी असलेली प्रवासी संख्या सद्य:स्थितीत ३३ लाखापर्यंत पोहोचली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.