सजीव आणि संघर्ष हे समीकरण तसे सर्वश्रुतच. त्यातही मानवाच्या रक्तातच संघर्षाची बीजे रुजली आहेत की काय; त्यामुळे तो नेहमीच युद्धाच्या पवित्र्यात असतो. त्यातूनच युद्धाची नवनवीन साधने विकसित होत गेली. कधीकाळी जमिनीवर होणारे युद्ध, पाण्यात, त्यानंतर हवेतही होऊ लागले. अलीकडच्या काळात भुदल, नौदल आणि हवाईदलाच्या दिमतीला सोशल आर्मीदेखील दिवसेंदिवस अधिक सक्रिय होत असून त्यांचेही युद्धात मोठे योगदान दिसून येते. दुसर्या महायुद्धात गोबेल्स नीतीमुळे रशियाची एक बटालियन जर्मनीने एकही गोळी न झाडता नष्ट केली होती. नभोवाणीच्या अविष्कारामुळे हे घडले होते.
आजघडीला त्याच माध्यमाची अनेक अंगे विकसित झाली आहेत. त्यात ट्विटर म्हणजेच एक्स, इन्स्टाग्राम, फेसबुक या सोशल माध्यमांवर प्रत्यक्ष रक्तपात होत नसला, तरी जे कुणी व्यक्त होतात, त्यामुळे संघर्षाला धार चढते. ‘हमास’ने इस्रायलवर हल्ला करताच सोशल मीडियावर समर्थक आणि विरोधकांचे जोरदार युद्ध सुरू झाले. त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच उमटतात. विशेष करून एखादा सेलिब्रिटी जर व्यक्त होत असेल, तर त्याची निष्ठा नक्की कुणासोबत आहे, हेही यानिमित्त स्पष्ट होते. पूर्वाश्रमीची पॉर्नस्टार मिया खलिफाने नुकतीच पॅलेस्टाईनचे समर्थन करत इस्रायलवर जोरदार टीका केली. सोशल मीडियावर आपली भूमिका मांडल्यामुळे मिया खलिफाचे मोठे नुकसान झाले. तिला आर्थिक आणि मानसिकही फटका बसला. ज्या-ज्या कंपन्यांशी तिने करार-मदार केले होते, त्यांनी ते रद्द केले.
तसेच, अवघ्या काही तासांत तिच्या फॉलोअर्सची संख्या निम्म्यावर आली. कॅलिफोर्निया विद्यापीठातील एका प्राध्यापकाने केलेल्या ट्विटमध्ये ‘हमास’चे थेट समर्थन केले. त्या प्राध्यापकालाही अवघ्या २४ तासांत अमेरिका सोडावी लागली. सोशल मीडियाच्या माध्यमातून अमेरिकेत झालेल्या प्रचारातून गेल्याच आठवड्यात इस्रायलचा निषेध करत व्हाईट हाऊसला घेराव घालण्यात आला. यावेळी अमेरिकेसह राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड आदी युरोपीय देशातही सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ‘हमास’ समर्थक एकत्र आले आणि त्यांनी संयुक्त राष्ट्रासह त्या-त्या देशांवर दबाव टाकत इस्रायलला कुणीही मदत करू नये, अशी मागणी केली. यानिमित्त कट्टरपंथीयांनी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केले.
इस्लामधर्मीयांचा इस्रायलींना तीव्र विरोध आहे. त्यातूनच गेल्या सात दशकांपासून सुरू असलेला हा संघर्ष आता दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. त्यातही सोशल मीडियावर व्यक्त होणार्यांचे पेव अजूनही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. अशातच ‘अॅपल’ कंपनीत उच्चपदस्थ असलेल्या नताशा डाक या जर्मन महिलेने आपला ज्यूविरोध व्यक्त करताना, आक्षेपार्ह विधाने ‘एक्स’वर पोस्ट केली. त्यात तिने ज्यू लोकांना ‘खुनी आणि दरोडेखोर’ संबोधले. ‘अॅपल’ने तत्काळ तिची उचलबांगडी केली. एकीकडे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक चिघळत असून, दुसरीकडे समर्थक आणि विरोधक अंतिम तसेच मोठ्या युद्धासाठी सज्ज होत आहेत. त्यातही भुदल, नौदल आणि हवाईदलाला अत्याधुनिक आयुधांनी सज्ज करण्यात येत आहे. दुसरीकडे इस्रायलचे समर्थक आणि विरोधक सोशल मीडियावर व्यक्त होताना एकमेकांप्रती सहानुभूती आणि प्रखर विरोध निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्याचा परिणाम नक्कीच होताना दिसत आहे.
कारण, आजघडीला जगातील बहुतांश लोक प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष समाजमाध्यमांवरील घडामोडींना प्रतिसाद देतात. त्यामुळे एखाद्या प्रती चीड निर्माण होणे किंवा सहानुभूती वाढण्यास त्यामुळे नक्कीच मदत होत असते. पूर्वी प्रत्यक्ष लढणारे सैनिक आज घराघरात तयार झाले आहेत. ते वेळोवेळी व्यक्त होत आहेत. त्यातूनच इस्रायलने गाझा पट्टीत मोठ्या प्रमाणात जीवितहानी केल्याचा आरोप केला जात आहे. इस्रायलने तब्बल ३ हजार, ९०० लहान बालकांची हत्याच केली, अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाली आहे. त्यातून केवळ गाझाच्या प्रती आंतरराष्ट्रीय सहानुभूती निर्माण करण्याचा डाव आहे. प्रत्यक्ष युद्धात सहभागी न होता, युद्धस्य कथांमध्ये रममाण होणारी ही मंडळी ‘सोशल मीडिया आर्मी’ असून ती अधिक धोकादायक आणि विनाशकारी ठरत आहे, हेच खरे!
मदन बडगुजर