मुंबई : पाकिस्तानमधील लष्करावर पुन्हा एकदा हल्ला झाल्याची माहिती पुढे आली आहे. पंजाबमधील मियांवली येथील पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शनिवार ४ नोव्हेंबर रोजी पहाटे हा हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर जोरदार गोळीबार आणि बॉम्बस्फोट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तहरीक-ए-जिहाद पाकिस्तानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे.
याआधीही बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्करावर मोठा हल्ला झाला असून यात १४ जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा शनिवारी हल्ला करण्यात आला आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि पाकिस्तान सरकार यांच्यातील युद्धविराम करार नोव्हेंबर २०२२ मध्ये संपला आहे. त्यानंतर आता पाकिस्तानी लष्करावरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.