नवी दिल्ली : मणिपूर पोलिसांनी शुक्रवारची सुट्टी बेकायदेशीरपणे घोषित केल्याप्रकरणी एका विद्यार्थी संघटनेविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. जॉइंट स्टुडंट्स बॉडी ऑफ मणिपूर नावाच्या विद्यार्थी संघटनेने दि. २६ ऑक्टोबर २०२३ रोजी सांगितले होते की आता राज्यात शुक्रवारी सुट्टी असेल.
मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यातील या विद्यार्थी संघटनेने २६ ऑक्टोबरला यासंदर्भात एक पत्र प्रसारित केले होते. या पत्रात म्हटले आहे की, विद्यार्थी संघटनांनी मणिपूरमधील सर्व सरकारी कार्यालये आणि शाळांना शुक्रवारी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.या पत्रात केवळ शैक्षणिक संस्थांमध्येच नव्हे तर सर्व जिल्हादंडाधिकारी, पोलिस अधीक्षक, विभागीय शिक्षणाधिकारी आणि अतिरिक्त उपायुक्त कार्यालयांमध्येही शुक्रवारी सुट्टी साजरी करण्याची चर्चा होती. याशिवाय सरकारी संस्थांची नावेही या पत्रात बदलण्यात आली होती.
हे पत्र समोर आल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव विनीत जोशी म्हणाले होते की, हे कृत्य पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि मणिपूरमधील सामुदायिक सलोखा बिघडू शकते. संस्थांची नावे बदलण्याच्या या संघटनेच्या प्रयत्नावरही त्यांनी चिंता व्यक्त केली.आता मणिपूर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. मणिपूर पोलिसांनी या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणे आणि सरकारी कर्मचाऱ्यांना इजा पोहोचवणे यासह अन्य कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे.
दुसरीकडे, मणिपूरमध्ये मे महिन्यापासून सुरू झालेला हिंसाचार काही दिवस शांत राहिल्यानंतर आता पुन्हा हिंसक प्रवृत्ती समोर आल्या आहेत. दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी भारत-म्यानमार आंतरराष्ट्रीय सीमेजवळील मोरेह येथे एका पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
चिंगाथम आनंद कुमार असे मृत झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. तो या भागातील शाळेच्या मैदानाच्या साफसफाईची देखरेख करत असताना कुकी दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार केला, परिणामी त्याचा मृत्यू झाला.मणिपूर सरकारने मृतांच्या कुटुंबाला ५० लाखांची भरपाई आणि एका आश्रिताला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे. या हल्ल्यात आणखी दोन पोलीस जखमी झाले आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.