उम्माची उबळ...

    09-Oct-2023
Total Views | 127
Editorial On AMU students for taking out march supporting Palestine

इस्रायलवरील ‘हमास’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर काही मुस्लीम राष्ट्रांत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला गेला, तर इकडे उत्तर प्रदेशातील अलीगढ मुस्लीम विद्यापीठात इस्रायलविरोधी घोषणाबाजी करुन ‘हमास’च्या समर्थनाचे नारे लागले. ‘हमास’च्या क्रूर हिंसाचारानंतर देशविदेशातील मुस्लीम उम्माला आलेली ही उबळ ही समस्त जगासाठीएक धोक्याची घंटाच म्हणावी लागेल.

इस्रायलवर ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या दहशतवादी हल्ल्याचे अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी समर्थन केले असून, इस्रायलचा ध्वजही जाळण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. एकीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध नोंदवत भारत इस्रायलच्या सोबत आहे, याची ग्वाही देत असतानाच, देशातील एका मुस्लीम विद्यापीठातून ‘हमास’सारख्या दहशतवादी संघटनेचे समर्थन घेत देशाविरोधात भूमिका घेतली जावी, ही नक्कीच निंदनीय बाब.

१९२० मध्ये स्थापना झालेल्या उत्तर प्रदेशातील या विद्यापीठात ३० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील दुर्दैवी बाब म्हणजे पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ नारेबाजी करतानाच इस्रायलच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. भारतातील प्रमुख मुस्लीम विद्यापीठ अशी ओळख असलेल्या, या मुस्लीम संस्थेत पॅलेस्टिनींबाबत सहानभुती आहे. संपूर्ण जगात इस्रायलविरोधातील या हल्ल्यांचा निषेध नोंदवला जात असताना, भारतातील एका शैक्षणिक संस्थेत त्याचे समर्थन व्हावे, ही बाब मुस्लीम विद्यापीठे देशद्रोही शक्तींचे आश्रयस्थान झाले आहे का, हा प्रश्न उपस्थित करणारी ठरते. जेएनयूमध्येही भारताविरोधात नारेबाजी झाली होती, भारताचे तुकडे-तुकडे करण्याची कारस्थाने तेथे रचली गेली होती, याचे स्मरण यानिमित्ताने झाले.

देशातील समस्त पुरोगाम्यांनी अर्थातच पॅलेस्टिनींची बाजू घेत, इस्रायलच्या आक्रमकतेविरोधात आवाज उठवला आहे. पॅलेस्टिनींवर होणारा कथित अन्याय आणि त्यांची होणारी हिंसा ही मानवतेला कलंक आहे, अशी पुरोगाम्यांची भावना. म्हणूनच भारताने पॅलेस्टिनींना पाठिंबा द्यावा, ही त्यांची मागणी. अलीगढ विद्यापीठात हीच भावना प्रतिबिंबित झाल्याचे त्यांचे म्हणणे. पॅलेस्टिनी समर्थकांना पुन्हा एकदा अचानक जोर आला असून, इस्रायलविरोधात आवाज उठवणे कसे आवश्यक आहे, असे त्यांचे आग्रही प्रतिपादन आहे.

एकीकडे इस्रायलमध्ये ‘हमास’चे मानवतेवर क्रूर, अमानवी हल्ले सुरू असताना, महिलांवर पाशवी अत्याचार होत असतानाच, त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत ‘सेव्ह गाझा’चे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. हे तेच गाझा आहे, ज्या भूमीतून इस्रायलवर हल्ला चढवण्यात आला. इस्रायली सैनिक, आबालवृद्ध, महिला यांचे अपहरण करून गाझा पट्टीत नेण्यात आले. गाझा पट्टीत मृतदेहांची विटंबना ‘हमास’च्या दहशतवाद्यांकडून कशी केली जात आहे, याचे शहारा आणणारे व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत. रानटी पद्धतीने निष्पापांना फासावर चढवले जात आहे. माणुसकीला काळिमा फासणारे असे प्रकार घडत असताना, मागे असेच प्रकार ‘हमास’ने केले असतानाही, मानवी हक्कांचे उल्लंघन मात्र इस्रायल करते, असा दावा ‘सेव्ह गाझा’वाले करतात. शेकडो इस्रायली नागरिक ‘हमास’च्या हल्ल्यात ठार झाल्यानंतर इस्रायलने याला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली असून, त्यात अर्थातच पॅलेस्टिनी बळी पडत आहेत. त्यामुळे लगेचच पुन्हा एकदा ‘सेव्ह गाझा’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. भारतातही हिचे समर्थक आहेत. भारत सरकारने पॅलेस्टिनींना पाठिंबा द्यावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.

इराणच्या पाठबळावरच ‘हमास’ने हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणला आहे, याची खात्री संपूर्ण जगाला पटली आहे. इस्रायलवर हल्ला होताच अमेरिका तातडीने त्याच्या मदतीला धावून जाईल, हे माहिती असल्यानेच इराणने अमेरिकेची मध्यपूर्वेतील विश्वासार्हता संपुष्टात आणण्यासाठी हे घडवून आणले का, हाही प्रश्न आहे. मध्य-पूर्वेतील अमेरिकी हस्तक्षेप इराणला नको आहे. मध्य-पूर्वेत शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी अमेरिकेच्या पुढाकाराने प्रयत्न होत होते. या प्रक्रियेला आता पूर्णविराम मिळाला आहे. हे युद्धच आहे, असे म्हणत इस्रायलने संपूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. प्रदेशातील मुस्लीम राष्ट्रे सध्या तरी इस्रायल आणि ‘हमास’पासून अंतर राखून आहेत. इतकेच काय, इराणनेही ‘हमास’ने केलेल्या हल्ल्याशी आपला संबंध नसल्याचे सांगत आहे.

भारतासह अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, रशिया यांनी याचा निषेध केला आहे. अमेरिकेने इस्रायलला तातडीचे लष्करी साहाय्य जाहीर केले असून, अमेरिकी युद्धनौका इस्रायलच्या मदतीसाठी रवानाही झाली आहे. ‘संयुक्त राष्ट्रसंघा’नेही अर्थातच निषेध नोंदवला आहे. हिंसाचार थांबवण्याचे ‘हमास’ला आवाहनही करण्यात आले आहे. ‘हमास’ ही दहशतवादी संघटना, या आवाहनाला भीकही घालणार नाही, हेही तितकेच खरे. गाझा पट्टीचे प्रशासकीय नियंत्रण ताब्यात असलेली, ही दहशतवादी संघटना इतक्या सहजी शरणही येणार नाही. आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेली ‘हमास’ जगभरातून निधी मिळावा, म्हणूनच हा हल्ला करण्यास प्रवृत्त झाली, असाही एक मतप्रवाह आहे; तर अमेरिकेच्या शांततेच्या प्रयत्नांना यश लाभत असल्यानेच इराणने, ही शांतता प्रक्रिया एकाप्रकारे थांबवली आहे, असेही मानले जाते.

भारताने नुकत्याच आयोजित केलेल्या ‘जी २०’ शिखर परिषदेच्या वेळी भारत-युरोप इकोनॉमिक कॉरिडोरची घोषणा केली होती. मध्य-पूर्वेतून भारताला युरोपशी जोडणारा हा प्रकल्प संपूर्ण प्रदेशातील व्यापार-रोजगाराला चालना देणारा असाच आहे. चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट, वन रोड’ प्रकल्पाला समर्थ पर्याय म्हणून भारताने जाहीर केलेल्या प्रकल्पाकडे पाहिले जाते. भारताच्या प्रकल्पामुळे चीनचा प्रकल्प धोक्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी मध्य-पूर्वेत शांतता प्रस्थापित होणे, हे नितांत गरजेचे आहे. मध्य-पूर्वेत भडकलेला युद्धाचा वणवा नेमकी किती हानी करणारा आहे, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट झालेले असेल. तथापि, अलीगढ विद्यापीठासारख्या मुस्लीम विद्यापीठातून त्याला मिळणारा पाठिंबा देशांतर्गत ज्या देशद्रोही शक्ती कार्यरत आहेत, त्यांचा चेहरा उघडा पाडत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121