"मला नाही अब्रू मी कशाला घाबरु..." सुषमा अंधारेंची जीभ घसरली
24-Oct-2023
Total Views | 746
मुंबई : अंबादास दानवे यांच्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाषण केले. मी महाराष्ट्राच्या हिताची भूमिका मांडत आहे. हा महाराष्ट्र ड्रग्जमुक्त, नशामुक्त झाला पाहिजे. आज सद्गुणांनी दुर्गुणांवर मात करण्याचा दिवस आहे. महाराष्ट्राचा उडता पंजाब होऊ नये म्हणून आम्ही सातत्याने भूमिका मांडतोय. मला नाही अब्रू मी कशाला घाबरु अशी अनेकांची अवस्था आहे. असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, "महाराष्ट्र ड्रग्जमुक्त आणि नशामुक्त झाला पाहिजे. आज विजयादशमीचा दिवस आहे. त्यादिवशी एक संकल्प करु. महाराष्ट्राचा उडता पंजाब व्हायला नको म्हणून आम्ही सातत्याने एक भूमिका घेऊन उभे आहोत. १० ऑक्टोबरला ३०० कोटींचा ड्रग्जचा साठा सापडला. मुंबईत ७१ कोटींचं कोकेन जप्त झालं. संभाजी नगरमध्ये २३ कोटींचं ड्रग्ज सापडलं. नदीच्या पात्रात ड्रग्ज सोडण्याचा प्रयत्न झाला. ज्या ज्या लेकीला, पत्नीला, आईला वाटतं की आपल्या घरात व्यसन नको ती प्रत्येक स्त्री माझ्याशी सहमत असेल."
"आम्ही प्रश्न विचारले की मंत्री घाबरवतात. धमक्या देतात, अब्रू नुकसानीचा दावा करु सांगतात. मागच्या दहा दिवसांपासून माझ्याशी मांडवलीची भाषा करतात. माध्यमांच्या समोर एक बोलायचं पाठीमागून दुसरीच कृत्यं करायची हे काय चाललंय? व्हाया सुरत गुवाहाटी अब्रू कुठे ठेवली होती? मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरु? अशी म्हण आहे. या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांची अवस्था अशीच असेल. मी सांगू इच्छिते की तुम्ही आमच्या पक्षातल्या लोकांना खोट्या गुन्ह्यांखाली अडकवलंच ना? गृहमंत्री म्हणून ललित पाटीलला मागचे नऊ महिने का लपवलं होतं? त्यासाठी इतका वेळ का लागला? ललित पाटील आमच्या पक्षाचा आहे हे सांगत आहात. मात्र आज तुम्हाला सांगते आहे बात निकलेगी तो दूर तलक जायेगी. इथे पक्षाचा प्रश्न नाही. महाराष्ट्रातला तरुण व्यसनाधीन व्हायला नको ही आमची भूमिका आहे." असं अंधारे म्हणाल्या.