मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये नुकतेच ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकसमिती’च्या १४१व्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २०३६ साली भारत ‘ऑलिम्पिक’ तसेच आगामी ‘युथ ऑलिम्पिक’च्या आयोजनासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यानिमित्ताने भारताची यापूर्वीची ऑलिम्पिकमधील कामगिरी, या स्पर्धेसाठी पात्रतेचे निकष आणि क्रिकेटसह अन्य क्रीडाप्रकारांचा ऑलिम्पिकमध्ये होणारा समावेश यांचा उहापोह करणारा हा लेख...
ठरावीक वर्षात ऑगस्ट ते ऑक्टोबर उजाडले की, क्रीडा क्षेत्रामध्ये जगात सर्वत्र ‘ऑलिम्पिक’चे वारे वाहू लागतात. दर चार वर्षांनी येणारा ‘ऑलिम्पिक’चा सोहळा हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. आंतरराष्ट्रीय स्तरावर भरणार्या ‘ऑलिम्पिक’ स्पर्धा असोत, त्याच्या आंतरराष्ट्रीय समितीच्या बैठका असोत, ‘ऑलिम्पिक’ क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्यासाठीच्या पात्रतेच्या फेर्या असोत, अशा सगळ्यात भारताचा सहभाग असणे, हे समस्त देशभक्तांचे जणू कर्तव्यच. तेच कर्तव्य सध्या क्रीडाप्रेमी पार पाडत आहेत.
‘ऑलिम्पिक’मध्ये सहभाग घेण्यासाठी काही निकष असतात, ते मिळवण्यासाठी नुकत्याच ‘आशियाई क्रीडा स्पर्धा’ होऊन गेल्या. भारताने त्यात सहभाग घेत तेथूनच ‘पॅरिस ऑलिम्पिक’ कोटा मिळवला. त्यासाठी ‘आशियाई क्रीडा स्पर्धे’त भारताचा जो ६५५ जणांचा चमू गेला होता, त्यात मागील संख्येप्रमाणे या वेळेसही हरियाणाच्या ८९, तर त्या खालोखाल महाराष्ट्राच्या ७३ जणांचा समावेश होता. अशी संख्या सर्व २६ राज्यांमध्ये मोठी होती. महाराष्ट्रासह पंजाब पदके मिळवण्यात हरियाणा पाठोपाठ होते.
या ‘आशियाई स्पर्धां’नंतर २०२४च्या ‘पॅरिस ऑलिम्पिक’ स्पर्धेच्या धामधूमीत आपण व्यस्त होऊ. पण, त्याआधी दि. १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान भारत सरकार, महाराष्ट्र शासन, ‘भारतीय ऑलिम्पिक समिती’चे पदाधिकारी हे सगळे मुंबईत ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’च्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत व्यग्र झाले होते. ‘ऑलिम्पिक’संबंधी कोणत्याही कार्यात आपल्या देशाचा सहभाग असणे, हे आपल्या दृष्टीने अभिमानाचे आणि मोठ्या जबाबदारीचे असते.
जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देणारे, क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तमाचा गौरव करणारे आणि मैत्री, परस्पर सन्मान, उत्कृष्टता अशा ‘ऑलिम्पिक’च्या आदर्श उद्दिष्टांना अधिक बळकट करणारे असेल. हे सत्र, क्रीडाक्षेत्राशी संबंधित विविध भागधारकांना परस्पर संवाद आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध करून देऊन गेले आणि आपण ते पार पाडण्यात यशस्वीही झालो. या अधिवेशनात काय झाले, हे आपण बघू.
‘ऑलिम्पिक’ कार्यकारिणी भारतात
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये दि. १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’च्या १४१व्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या सत्राचे शनिवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी उद्घाटन केले. हे सत्र ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’च्या सदस्यांची एक महत्त्वाची बैठक मानली जाते. या सत्रात ‘ऑलिम्पिक’ स्पर्धांच्या भविष्याशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. भारतात ही बैठक दुसर्यांदा होत आहे. याधीची बैठक सुमारे ४० वर्षांपूर्वी झाली होती. ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’चे ८६वे सत्र, नवी दिल्लीत १९८३ साली झाले होते. आता हे १४१वे सत्र भारतात संपन्न होत असून, हे सत्र जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देणारे, क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तमाचा गौरव करणारे आणि मैत्री, परस्पर सन्मान, उत्कृष्टता अशा ‘ऑलिम्पिक’च्या आदर्श उद्दिष्टांना अधिक बळकट करणारे ठरले. हे सत्र क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध भागधारकांना परस्पर संवाद आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध करून देणारे होते. या सत्राला ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’चे अध्यक्ष थॉमस बाच आणि इतर सदस्य उपस्थित होते. त्याशिवाय भारतातील क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती आणि ‘भारतीय ऑलिम्पिक संघटने’सह विविध क्रीडा महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. अशा बैठकीत सदस्य देशांचे प्रतिनिधी ‘ऑलिम्पिक चार्टर’ आणि ‘ऑलिम्पिक’आयोजित करण्यासाठी शहरांची निवड, क्रीडा प्रकार वगळणे, अतिरिक्त क्रीडा प्रकार समाविष्ट करणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतात, निर्णय घेतात.
त्यानंतर निर्णयाला अंतिम रूप देऊन घोषणा केली जाते. या वेळच्या ‘ऑलिम्पिक समिती’च्या मुंबईतील बैठकीच्या अनुषंगाने भारतीय क्रीडाजगतात नव्या युगाची सुरुवात होत आहे. भारताने एकूणच क्रीडा क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर मोठी झेप घेत एक समृद्ध आणि आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेलं ‘ऑलिम्पिक राष्ट्र’ म्हणून ओळख निर्माण केली आहे. भारत हा जगातील प्रमुख तीन अर्थव्यवस्थांपैकी एक होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तसेच विविधतेने परिपूर्ण, असे राष्ट्र असल्याचा अभिमान सारे बाळगत आहेत. यापूर्वी १३९व्या बीजिंगमध्ये झालेल्या बैठकीतील भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व ‘भारतीय ऑलिम्पिक समिती’च्या पहिल्या महिला सदस्या व प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी या होत्या. ‘भारतीय ऑलिम्पिक संघटने’चे तत्कालीन अध्यक्ष नरिंदर बात्रा, युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा हेदेखील या समितीमध्ये सहभागी झाले होते. ‘भारतीय ऑलिम्पिक संघटने’च्या पी. टी. उषा या आता विद्यमान अध्यक्षा आहेत. ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’चे अध्यक्ष थॉमस बाच आणि इतर सदस्य या १४१व्या बैठकीला उपस्थित होते. भारतातील क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती आणि ‘भारतीय ऑलिम्पिक संघटने’सह विविध क्रीडा महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत भारत जागतिक पातळीवर अनेक क्षेत्रात सगळ्या देशांना एकत्र आणत, त्यांचे प्रतिनिधित्व करत एकजुट करत असलेले दिसून येत आहे. भारत ‘ऑलिम्पिक’सारख्या संघटनेतही तसेच मोठे कार्य सिद्धीस नेत आहे.
आज भारतात नीरज चोप्रासारख्या विद्यमान ‘ऑलिम्पिक’ क्रीडापटूंसहित गतविजेत्या ऑली एम सी मेरी कॉम, राजवर्धन राठोड, सायना नेहवाल अशा अनेकांसकट सगळ्याच विद्यमान व माजी ‘ऑलिम्पिक’पटूंचे स्वप्न असते की, एकदा तरी ‘ऑलिम्पिक’ स्पर्धा भारतीय भूमीवर होताना बघाव्यात. “हमारे जनसांख्यिकीय और हमारे युवाओं के साथ भारत में बहुत संभावनाएं हैं। ‘ऑलिम्पिक’ मूव्हमेंट वास्तव में भारत के युवाओं को न सिर्फ चॅम्पियन बनाने के लिए प्रेरित कर सकता हैं, बल्कि मुझे लगता हैं कि ‘ऑलिम्पिक’वाद हमारे युवा समाज को एक नई दिशा देने में भी सकारात्मक भूमिका निभा सकता हैं। हे त्या दिग्गजांचे विचार सगळ्या भारतीयांचेच जणू प्रतिनिधित्व करतात.
१४१व्या सत्रात दि. १४ ते ३० जुलै २०२८ दरम्यान होणार्या आगामी २०२८च्या ’लॉस एंजलिस ऑलिम्पिक’मध्ये क्रिकेट, बेसबॉल/सॉफ्टबॉल, अमेरिकन फुटबॉल’च्या धर्तीवर खेळला जाणारा फ्लॅग फुटबॉल, लॅक्रूस आणि स्क्वॅश या खेळांचा समावेश असेल, असे जाहीर करण्यात आले. आता या क्रीडा प्रकारांत ‘ऑलिम्पिक’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठीच्या देशांना, त्यांच्या क्रीडापटूंना परवाना/‘ऑलिम्पिक’ कोटा/लॉस एंजिलिसची तिकिटे देण्याचे निकष वगैरे ठरवले गेले.
मुष्टियुद्धास स्थगिती!
या पाच क्रीडा प्रकाराबाबत लिहिण्याआधी मुष्टियुद्धाबद्दल एक लक्षात घ्यावे लागेल. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेची मान्यता ‘ऑलिम्पिक समिती’ने रद्द केली आहे. मुष्टियुद्धाच्या दुसर्या कुठल्याही यंत्रणेला मान्यता दिलेली नसल्याने २०२८च्या ‘लॉस एंजिलिस ऑलिम्पिक’मध्ये मुष्टियुद्धाचा समावेश करण्याचा निर्णय समितीने स्थगित केला आहे. त्यामुळे बॉक्सिंग अंधारातच आहे.
‘क्रिकेट’ एक धर्म! भारतात क्रिकेटवेड किती आहे, हे सांगायलाच नको. क्रिकेट हा एक धर्म म्हणूनच मानला जातो, अशा क्रिकेटचा समावेश आता तब्बल १२८ वर्षांनंतर ‘ऑलिम्पिक’मध्ये होत आहे.
बहुविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत २०२३च्या आधीच महिला क्रिकेटचा ‘राष्ट्रकुल’ तर महिला आणि पुरूष क्रिकेटचा ऑक्टोबर २०२३च्या पहिल्या आठवड्यात संपन्न झालेल्या ‘आशियाई क्रीडा स्पर्धे’त समावेश करण्यात आला होता. या ‘आशियाई क्रीडा’ प्रकारात अंतर्भाव होता, हे आपण पाहिले. क्रिकेट प्रथम १८९६च्या ’अथेन्स ऑलिम्पिक’मध्ये खेळवण्याची योजना होती. पण, त्यात अपेक्षित संघ न मिळाल्याने ते बारगळले. त्यानंतर १९९०च्या ‘पॅरिस ऑलिम्पिक’मध्ये खेळवण्याचे ठरले. तेव्हा घरचा पॅरिसचा आणि बाहेरचा फक्त इंग्लंड असे दोन संघ उतरले होते आणि त्यात पाहुणा संघ विजेता ठरला होता. असे हे क्रिकेटविश्व ‘ऑलिम्पिक’मध्ये खेळण्यास उत्सुक नव्हते. पण, आता चित्र बदललेले दिसेल. कारण, आता दोन डावांचे वेळखाऊ (दोन इनिंग) क्रिकेट नसेल, तर झटपट निकाल देणारा, मर्यादित केवळ २० षटकांचे क्रिकेट असेल, तर अशा या टी-२० मध्ये पुरुषांचे आणि महिलांचे असे प्रत्येकी एक तरी पदक आपण मिळवू शकतो. मग ते सुवर्ण, रौप्य अथवा कांस्य यांपैकी कोणतेही असो. आज ‘टी-२०’मध्ये पुरुषांच्या जागतिक क्रमवारीत भारत सगळ्यांना मागे टाकत प्रथम क्रमांकावर आहे, तर महिलांमध्ये भारत चौथ्या स्थानी आहे. जगभरात क्रिकेटची लोकप्रियता बघता दूरचित्रवाणींवर करण्यात येणार्या प्रसारणाच्या हक्कांपोटी २०२४च्या ’पॅरिस ऑलिम्पिक’च्या १५८.६ कोटी रुपयांच्या तुलनेत २०२८ ‘लॉस एंजलिस ऑलिम्पिक’मध्ये १ हजार, ५२५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. आपल्या क्रिकेटपटूंना क्रिकेटव्यतिरिक्त जे असंख्य क्रीडा प्रकार आहेत, त्याच्या दिग्गजांचा आता जवळून परिचय होईल. आज आपल्या क्रिकेटपटूंना पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरणे, प्रेक्षणीय स्थळी खेळण्याच्या निमित्ताने जाणे हे अंगवळणी पडले होते. आता मात्र ते ‘ऑलिम्पिक’ व्हिलेजमध्ये जातील इतरांसमवेत मुक्कामी राहतील, तेव्हा ते खरे क्रीडा विश्व अनुभवतील आणि ‘ऑलिम्पिक’चे ते ध्येयवाक्य प्रत्यक्षात अनुभवतील, ही चांगलीच गोष्ट आहे.
बेसबॉल
बेसबॉलमध्ये भारतीय पुरूष संघ ६४व्या तर महिलांचा संघ ११व्या स्थानावर आहे. जागतिक क्रमवारीत असे चित्र जरी दिसत असले, तरी ’बेसबॉल प्रो लीग’सारख्या स्पर्धा आजकाल प्रसिद्ध होत आहेत. मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणांच्या जोडीने सातार्यासारख्या ठिकाणाहूनही बेसबॉलचे क्रीडापटू नावारुपास येत आहेत. आता तर रोहटक हरियाणास्थित ‘हौशी बेसबॉल फेडरेशन ऑफ इंडिया’ (अइऋख) ही भारतातील बेसबॉलची प्रशासकीय संस्था कार्यरत आहे.
स्क्वॅश
‘स्क्वॅश’ या क्रीडाप्रकाराची माहिती तर सगळ्या भारतीयांना नुकत्याच संपन्न झालेल्या ‘आशियाई स्पर्धे’त दोन सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्यपदक मिळवून झाली आहेच.
पाचमधले अन्य
पाश्चिमात्य देशात जे खेळ जास्त प्रमाणात खेळले जातात, त्या (नवीन पाच क्रीडा प्रकारांतील) उर्वरित फ्लॅग फुटबॉल, लॅक्रूस या क्रीडा प्रकारांबद्दल आपण आतापासूनच काही अंदाज काढायला नकोत.
‘ऑलिम्पिक’प्रेमी भारत...
आपला युवाभारत अंतिम परिणाम येईपर्यंत अंतिमतः निकाल जाहीर होईस्तोवर आपले प्रयत्न सोडत नसतो. भारत आपले सर्वोत्तम देण्याची सर्वश्रेष्ठ होण्याचा अटोकाट प्रयत्न करत असतो. ‘आशियाई क्रीडा स्पर्धे’त सहभागी खेळाडूंची दि. १० ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली होती, तेव्हा बोलताना त्यांनी सांगितले की, देशात खेळांचा विकास होण्यासाठी येत्या पाच वर्षांत तीन हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत तीन हजारांहून अधिक खेळाडूंना प्रशिक्षण, वैद्यकीय, आहारविषयक मदत मिळत आहे. आजमितीला खेळाडूंना एकूण २५ हजार कोटी रुपयांची मदत मिळत आहे. यामुळे खेळाडूंच्या मार्गात आर्थिक मदतीची अडचण राहणार नाही. देशातच अधिक दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. स्पर्धा कुठलीही असो आशियाई किंवा अन्य आंतरराष्ट्रीय, भारतीय खेळाडू पदक मिळवत आहेत. देशातील क्रीडा संस्कृती वाढण्यासाठी, हे चांगले संकेत आहेत. हे यश आगामी ’पॅरिस ऑलिम्पिक’साठी देखील प्रेरक ठरेल, यात शंकाच नाही. आजची पिढी आजच्या यशस्वी खेळाडूंना आपले आदर्श मानत आहेत.
अशा भारताने ‘ऑलिम्पिक समिती’पुढे प्रस्ताव मांडला आहे की, २०३६ साली ‘ऑलिम्पिक’ भारतात आयोजित करण्याची तसेच आगामी ‘युथ ऑलिम्पिक’च्या आयोजनासाठीही आम्ही इच्छुक असून, आम्हाला तशी संधी द्यावी. त्यासाठी जे काही करायचे, ते कधीपर्यंत आणि कसे तयार करत, ते आपण यशस्वी करून दाखवू! लवकरच ‘ऑलिम्पिक’ भारतात कसे, कुठे दिसेल याचे चित्र आता तयार होईल. आपल्या सगळ्यांची खात्री आहे की, ‘ऑलिम्पिक’चे धनुष्य आपण नक्की पेलून दाखवू. आपण सारे त्यासाठी शुभेच्छा व्यक्त करू.
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी हॉकीपटू आणि
खेलकूद आयाम प्रमुख,
जनजाती कल्याण आश्रम,
पश्चिम महाराष्ट्र प्रांत आहेत.)
९४२२०३१७०४