एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम हत्याकांड घडवून पाकने भारताची कुरापत काढली आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकला जबर दणका देऊन सगळ्या जगालाच चकित करून सोडले; पण जूनमध्ये अमेरिकी माध्यमांनी प्रसिद्ध केलेली चित्रे पाहून जग पुन्हा चकित झाले. पाकचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर हे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत ‘व्हाईट हाऊस’मध्ये भोजन घेत आहेत. सप्टेंबरमध्ये पुन्हा चित्रे झळकली. फील्ड मार्शल मुनीर, पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि ट्रम्प हास्यविनोद करत आहेत. मुनीर ट्रम्प यांना तांबे आणि सोने यांनी भरलेली एक संदूक दाखवत आहेत. जाणून घेऊया या प्रकरणाबद्दल...
दि. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांना बढती मिळून ते ‘जनरल’ बनले. याला लष्करी भाषेत ‘फोर स्टार जनरल’ असे म्हटले जाते. खरे म्हणजे दि. २७ नोव्हेंबर २०२२ या दिवशी मुनीर रीतसर सेवानिवृत्त होणार होते. पण, त्यांची मुदत वाढवली जाऊन दि. २९ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांना ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ’-लष्करप्रमुखपदावर बसवण्यात आले. पाकिस्तानच्या इतिहासातला हा पहिला सेनाप्रमुख, ज्याने या पदावर येण्यापूर्वी पाकिस्तानी लष्करी गुप्तहेर खाते आणि ‘आयएसआय’ ऊर्फ ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ अशा दोन्ही गुप्तहेर संघटनांचा प्रमुख म्हणून काम केलेले आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये पुन्हा एकदा मुनीर यांची निवृत्ती पुढे ढकलून लांना तीन ते पाच वर्षांसाठी सेवेत ठेवण्यात आले.
आता एवढ्या मोठ्या क्षमतेचा सेनापती पाकने सेवेत कायम ठेवला, बढती देऊन नावलौकिकाला चढवला, तर त्याने पाकसाठी काहीतरी कामगिरी करून दाखवायलाच हवी. आता पाक लष्करप्रमुख आपल्या अक्कलहुशारीचा दिमाख दाखवणार, म्हणजे काय करणार? तर एक म्हणजे पाकच्या अंतर्गत बलुची, सिंधी इत्यादी बंडखोर मुसलमानांना चेपणार. दुसरे म्हणजे नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार इत्यादी छोट्या आणि चीन या मोठ्या शेजार्यांना सतत भारताविरुद्ध चिथावत राहणार आणि तिसरे म्हणजे, भारत-पाक सीमेवर उघडपणे भारतविरोधी कारवाया करत राहणार भारताचा सतत द्वेष करत राहणे, हेच मुळी पाक नेतृत्वाचे एकमेव जीवितकार्य आहे. त्यांच्या कार्यसूचीवर अजेंड्यावर दुसरे कोणतेही कलम नाहीच, त्यामुळे त्यांचा लष्करप्रमुख तोच कार्यक्रम पुढे नेणार.
तर नोव्हेंबर २०२४ मध्ये दुसर्यांदा कार्यवाढ मुदत मिळण्यापूर्वीच ऑगस्ट २०२४ मध्ये मुनीर यांच्या हस्तकांनी बांगलादेशमधल्या असंतुष्ट लोकांना उचकावून शेख हसीना यांचे सरकार कोसळण्यात यश मिळाले. अशीही शक्यता आहे की, ऑगस्टमधल्या या यशामुळेच नोव्हेंबरमध्ये मुनीर यांना मुदतवाढ मिळाली. कदाचित यामुळे प्रोत्साहन मिळून मुनीर यांच्या हस्तकांनी एप्रिल २०२५ मध्ये काश्मीरच्या पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांची कत्तल केली. याचा परिणाम मात्र भलताच झाला. मे २०२५ मध्ये भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे कमालीचा तिखट जबाब दिला. आतापर्यंत बाहेर आलेल्या माहितीनुसार दि. ७ मेपासून पुढे चार दिवस भारतीय वायुदलाने पाकमध्ये खोलवर मुसंड्या मारून पाकच्या पेकाटात सणसणीत लाथा हाणल्या.
पण गंमत म्हणजे, तरीही दि. २२ मे २०२५ या दिवशी पाक सरकारने जनरल मुनीर यांना ‘फिल्ड मार्शल’ ही पदवी दिली. ‘जनरल’ हा वयानुसार सेवानिवृत्त होतो. ‘फिल्ड मार्शल’ हा आजीवन सेवेत आहे, असे मानले जाते. तर दि. २२ मे रोजी ‘फिल्ड मार्शल’ बनलेले मुनीर दि. १८ जून २०२५ रोजी ‘व्हाईट हाऊस’मध्ये पोहोचले आणि त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत दुपारचे जेवण घेतले. घटनाक्रम एवढ्यावरच थांबला नाही. दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी फिल्ड मार्शल मुनीर यांच्यासोबत पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ हेही ‘व्हाईट हाऊस’मध्ये पोहोचले. राजशिष्टाचारानुसार एखाद्या देशाचा पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष जेव्हा ‘व्हाईट हाऊस’ला भेट देतो, तेव्हा सर्व माध्यमांना रीतसर आमंत्रण दिले जाते. पाहुण्या राष्ट्रप्रमुखाची आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची संयुक्त मुलाखत आयोजित केली जाते. काही महत्त्वाचे करार-मदार होणार असतील, तर त्या समारंभात माध्यमांना मुद्दाम प्रवेश दिला जातो.
शरीफ-मुनीर आणि ट्रम्प यांच्या भेटीत यातले काहीही करण्यात आले नाही. माध्यमांना फक्त चित्रे प्रसिद्घीसाठी देण्यात आली. एका चित्रात मुनीर ट्रम्प यांना एक संदूक दाखवत आहेत. तिच्यात विशिष्ट प्रकारचे दगड दिसत आहेत.
कसले आहेत हे दगड? त्या दगडांमध्ये तांबे आणि सोने आहे. पाकच्या बलुचिस्तान प्रांतातल्या रेको दिक इथल्या खाणेतले ते दगड आहेत. या खाणीत इतके अपरंपार तांबे आणि सोने आहे की, उत्खनन करायला सुरुवात केल्यापासून पुढची किमान ४० वर्षे त्या खाणीतून वर्षाला दोन लाख टन तांबे आणि सहा लाख टन सोने (दोन्ही धातू कॉन्सेंट्रेट स्वरूपात) एवढे उत्पादन होऊ शकेल. वैज्ञानिकांच्या सध्याच्या अंदाजानुसार, ही सोन्याची जगातली सर्वांत मोठी पाचव्या क्रमांकाची खाण आहे. पण, वैज्ञानिकांना असेही वाटत आहे की, प्रत्यक्ष खोदाईला सुरुवात केल्यावर कदाचित ही जगातली प्रथम क्रमांकाची खाणसुद्घा बनू शकेल.
म्हणजे लक्षात येतेय का? जगातली सर्वांत मोठी सोन्याची नि तांब्याची खाण आपल्या प्रदेशात आहे, हे अचानकपणे पाकच्या लक्षात आलेय. तसे अगदी अचानक नव्हे. २०१० सालापासूनच अनेक युरोपीय कंपन्यांचे लक्ष रेको दिकवर आहे. वांधा असा आहे की, रेको दिक हे ठिकाण बलुचिस्तान प्रांताच्या म्हणजेच पाकिस्तानच्या आणि इराण नि अफगाणिस्तानच्या सरहद्दीच्या अगदी जवळ आहे. रेको दिकच्या खाणीतून तांबेयुक्त आणि सोनेयुक्त माती खणून बाहेर काढल्यावर ती पुढच्या प्रक्रियेसाठी बाहेर नेणार कशी?
रेको दिकपासून जवळचे बंदर आहे ग्वादार. पण, ते चीनच्या व्यवस्थापनासाठी आहे. म्हणून पाश्चिमात्य कंपन्यांना ते नको आहे. दुसरा पर्याय आहे, तो अर्थातच रेल्वेचा. रेको दिकपासून रेल्वेने प्रांतिक राजधानी क्वेट्टा शहरापर्यंत आणि तिथून कराची बंदराचे जोडबंदर असलेल्या कासीम बंदरापर्यंत रेल्वेने ही समृद्ध माती आणायची, तर १ हजार, ३३० किमी एवढे अंतर आहे. म्हणून आतापर्यंत कोणतीही कंपनी हा प्रकल्प हातात घ्यायला तयार नव्हती. पण, आता ‘बॅरिक मायनिंग कॉर्पोरेशन’ या बड्या कॅनेडियन कंपनीने हे काम हाती घेतले आहे. सुरुवातीची जुळवाजुळव चालू झाली झाली असून २०२८ पर्यंत प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईल, असा अंदाज आहे.
आता यातले ५० टक्के भांडवल कंपनी गुंतवणार आहे. उरलेले ५० टक्के हे पाकिस्तान केंद्र सरकार २५ टक्के आणि बलुचिस्तान प्रांत सरकार २५ टक्के असे गुंतवायचे ठरले आहे. एकूण प्रकल्प ६.६ दशकोटी डॉलर्सचा आहे. म्हणजेच ३.३ दशकोटी डॉलर्स पाकला उभे करायचे आहेत. शिवाय अफगाणिस्तान, इराण आणि खुद्द बलुचिस्तान प्रांतातली राजकीय स्थिती कमालीची अस्थिर आहे. ‘इन्स्टिटयूट ऑफ इकोनॉमिस अॅण्ड पीस’नामक आर्थिक सर्वेक्षण करणार्या एका संस्थेने पाकिस्तानला अतिरेकी कारवायांनी अशांत असलेला जगभरातला दुसर्या क्रमांकाचा देश घोषित केले आहे. (पहिल्या कमांकावर बुर्किना फासो हा आफ्रिकन देश आहे.) बरे, ज्या रेल्वेमार्गाने ही धातूसमृद्ध माती कासीम बंदरापर्यंत येणार, तो मार्ग धड आहे का? तर नाही.
पाक राज्यकर्त्यांनी जो काही थोडाफार अंतर्गत विकास घडवलाय, तो फक्त पंजाब प्रांतात आणि कराची हे बंदर सिंध प्रांतात असल्यामुळे थोडाफार सिंध प्रातांत झालेला आहे. क्वेट्टा शहर हे इंग्रजी कालखंडापासून लष्कराचे महत्त्वाचे ठाणे असल्यामुळे, तिथून इस्लामाबादच्या दिशेने रस्ते, रेल्वे बर्यापैकी आहेत. बाकी अवघा आनंदीआनंद आहे. अशा स्थितीत ते उरलेले ५० टक्के भांडवल उभे करायला पाकला कोण मदत करणार? आणि हे सगळे चित्र चीन शांतपणे बघत राहील का? मग आता, अनाथांचा नाथ, भक्तांचा कैवारी, दीनदुःखितांचा एकमेव वाली कोण राहिला? अमेरिका! म्हणजेच ट्रम्पतात्या! त्यासाठी त्या जून आणि सप्टेंबरमधल्या भेटी होत्या. समझ गये बर्खुरदार?
सर रिचर्ड बर्टन : जन्मशताब्दी
त्याच्या हयातीत त्याच्याबद्दल असे बोलले जात असे की, एक तर तो लंडनच्या ओल्ड व्हिक नाट्यगृहाच्या रंगमंचावर ‘हॅम्लेट’ करत असेल, अथवा न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेवरच्या मॅजेस्टिक नाट्यगृहाच्या रंगमंचावर ‘ऑथेल्लो’ सादर करून नाट्यगृह दणाणून सोडत असेल, अथवा हॉलीवूडमधल्या एखाद्या स्टुडिओत कॅमेर्यासमोर एखादी भूमिका चिरस्मरणीय करत असेल आणि यांपैकी कुठेच जर नसला, तर नक्कीच सिगारेट, मदिरा आणि मदिसक्षी यांच्या सहवासात बेहोष होऊन पडलेला असेल. मूळ नाव रिचर्ड जेंकिन्स. पण, त्याचा आवडता शिक्षक पीटर बर्टन याच्या नावावरून तो स्वतःचे नाव लावू लागला ‘रिचर्ड बर्टन.’
शेसपियरची नाटके हे आज ५०० वर्षांनंतरही अभिनेत्यांना आव्हान वाटते. गेल्या साधारण पाऊणशे वर्षांत सर लॉरेन्स ऑलिव्हिफ, सर जॉन गिलगुड, पीटर ओटूल हे फार ख्यातनाम अभिनेते होऊन गेले, ज्यांनी शेसपियरच्या विविध व्यक्तिरेखा फार ताकदीने रंगमंचावरून सादर केला. सर रिचर्ड बर्टन हे त्यातलेच एक झगमगते नाव. रंगमंचाप्रमाणेच चित्रपटातही या सर्वांनीच उत्कृष्ट अभिनय केला. मात्र, ऑलिव्हिफ आणि गिलगुड चित्रपटात रमले नाहीत. रिचर्ड बर्टनने मात्र हॉलीवूडमध्येही चांगलाच जम बसवला. १९७०च्या दशकात एका चित्रपटासाठी दहा लाख डॉलर्स मानधन घेणारा तो एकमेव अभिनेता होता.
अत्यंत गुणवान असा हा अभिनेता काही अवगुणांमुळे पार वाया गेला. तो दिवसाला किमान १०० सिगारेटी फुंकायचा, किमान चार अख्ख्या बाटल्या संपवायचा आणि तो कमालीचा विषयासक्त होता. अखेर वयाच्या ५९व्या वर्षी १९८४ मध्ये तो मरण पावला. अति मध्यपान, अति धूम्रपान आणि अति स्त्रीसंग यांनी सगळ्या गुणांची माती झाली. दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी त्याची जन्मशताब्दी झाली.