देव, देश व धर्मरक्षणासाठी ब्रिटिशांविरोधात उभे ठाकलेले आणि जल, जमीन, जंगलावर जनजातींचाच अधिकार आहे, यासाठी ‘उलगुलान’ म्हणजे सशस्त्र लढा देणार्या भगवान बिरसा मुंडा ज्यांना ‘धरती का आबा’ म्हणूनही ओळखले जाते, त्यांची आज जयंती. हा दिवस ‘राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस’ म्हणूनही साजरा केला जातो. त्यानिमित्ताने बिरसा मुंडांचे हे क्रांतिस्मरण...
दि. १५ नोव्हेंबर १८७५ रोजी तत्कालीन छोटा नागपूर, पूर्वीच्या बिहारमधील आणि आताच्या झारखंड राज्यातील रांचीमधील उलिहातु या गावी एका निर्धन मुंडा परिवारात बिरसा मुंडा यांचा जन्म झाला. आईचे नाव करमी मुंडा, तर वडिलांचे नाव सुगना मुंडा. दोघेही बिरसासह असलेल्या आपल्या अन्य दोन मुले व दोन मुलींचे लालनपालन करण्यासाठी मोलमजुरी करत. त्यामुळेही असेल कदाचित, बिरसाचे बालपण मावशी आणि आयुबहत येथील मामाकडे गेले. बालक बिरसा शेळ्या-बकर्या चरायला जायचा. पावा (बासरी) सुंदर वाजवायचा. पशु, पक्षी आणि माणसे अगदी मंत्रमुग्ध होत. तेथे जयपाल नाग शिक्षक भेटले.
अक्षरओळखीसोबत गणित अवगत झाले. मल्लविद्या शिकले. शरीर कोणताही सामना करण्याइतपत कसदार झाले. अनेक विषयांतील हुशारी, अंगी असलेल्या विविध गुणांमुळे नायकपद चालून यायला लागले. त्यातच एका जर्मन पाद्रीचा संपर्क आला. त्यानेही या बालकाला हेरले. आपल्या मुलाने शिकून मोठे व्हावे, यासाठी इंग्रजी शाळेत दाखल होणे गरजेचे होते. आजही आमच्या म्हणजे चर्चच्या अटी कबूल असतील, तरच तुम्हाला त्यांची तथाकथित सेवा उपलब्ध केली जाईल, हा सिद्धांत त्यावेळीच रुजलेला होता. अशा त्या जाचक अटींवरच तर बुर्जू येथील मिशनरी चर्चच्या शाळेत बिरसाला प्रवेश मिळाला. गावात येऊन दया, प्रेम बरसवणार्या पाद्रीचे मायावी रूप शाळेत बदलताना अनुभवाला येऊ लागले. सर्वांत प्रथम नाव बदलले गेले. मुंडाचा ‘बिरसा डेव्हिड’ झाला. शेंडी कापली गेली. गळ्यात ‘क्रॉस’ आला. हिंदूचा ख्रिश्चन झाला. संपूर्ण परिवाराचा धर्म बदलला गेला. इतयाने काम कसे भागेल? म्हणून संपूर्ण परिवर्तनासाठी एके दिवशी समोर गायीचे मांस खायला दिले गेले. बिरसाने आतापर्यंत शिक्षणप्राप्ती सारे सहन केले होते; पण अखेर संयमाचा बांध फुटला, स्वधर्माचा ज्वार जागृत झाला आणि गोमांस भक्षण करण्यास चक्क नकार दिला. स्वाभाविक, मारहाण झाली. त्रास सुरू झाला. जातीचा उद्धार होऊ लागला.
१८५७ नंतर पाद्री आणि चर्चरुपी चौथी आर्मी ब्रिटिश सरकारच्या आदेश नियमांतर्गत कार्यरत झाली. जरी तिचे भंपक स्वायत्तेचे दाखवायचे दात वेगळे असले, तरीही तेथे एक गोष्ट १५ वर्षीय बिरसाच्या लक्षात आली, ती म्हणजे ब्रिटिश सरकारची प्रशासनिक टोपी आणि पाद्रीची टोपी एकच आहे. दोघांचे उद्देश समान आहेत. त्यातील पहिला आणि सुस्पष्ट हेतू म्हणजे, हिंदू धर्म नासवणे; येन केन प्रकारेण आपल्या धर्मात लोकांना आणणे; हिंदू समाजात फूट पाडणे; सत्ता ताब्यात घेऊन जुलुमी राज्य चालवणे. प्रशासन जबरदस्तीने आणि चर्चसेवेच्या फसव्या माध्यमातून संपूर्ण भारतीयांना ख्रिश्चन करू लागले. दोघांची कार्यप्रणालीही सारखीच आहे. दुसर्या बाजूने प्रामाणिक व भोळ्या जनजाती समाजाला ‘चोर’, ‘डाकू’ संबोधणे सुरू झाले. अशा चाईबासामध्ये बिरसा एक क्षणही थांबणार नाही, असे त्याने निक्षून सांगितले. वारंवार वाढणारा दबाव झुगारून सर्वांच्या देखत त्या पाद्रीला ठणकावून सांगणे, म्हणजे केवढे ते साहस! सिंहाच्या गुहेत जाऊन त्याला ललकारायलाही शेवटी सिंहाचेच काळीज लागते. या अनुभवातून चीड, संताप आणि उद्रेक कायमचा मनात घेऊन बिरसा पुन्हा सनातन हिंदू मुंडा होऊन बाहेर पडला.
त्याचदरम्यान १८९१ म्हणजे वयाच्या १६व्या वर्षी बिरसाची चैतन्य महाप्रभू यांचे शिष्य महेश पांडे यांची भेट झाली. त्यांच्याकडून रामायण, महाभारत शिकले त्यातून आपल्या गौरवशाली संस्कृतीची, सनातन हिंदू धर्माची नाळ पुन्हा पक्की झाली. एका पाद्रीचे आणि त्याच्या यंत्रणेचे मायावी रूप आणि दुसर्या बाजूला मानवतेचे, भक्तीचे खर्या अर्थाने अमृतसिंचन करणारे दार्शनिक त्यांच्या सहवासाने पुढचा मार्ग प्रशस्त होऊन सनातन हिंदू धर्माच्या रक्षणाचा संकल्प सिद्ध झाला. त्यानुसार स्वयंसिद्ध होऊन पितांबर नेसून, डोईवर सफेद फेटा आणि जानवे धारण करून, पवित्र तुळशीच्या वृंदावनासमोर ‘उलगुलान’ म्हणजे क्रांती, सशस्त्र लढा. अर्थातच ‘अबुवा दिशुम-अबुवा राज, हमरा देश हमरा राज.’ धर्मरक्षणासाठी कटिबद्ध होऊन इंग्रज आणि त्यांचे चमचे जमीनदार, सावकार यांच्या शोषण व गुलामगिरीच्या जोखडातून जनतेला मुक्त करण्याचा ध्यास धरत. सर्वांना एकजूट करून इंग्रज सरकारशी तीर कमठ्याने संघर्ष करून देशाच्या बाहेर काढणे, या अंतिम उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वतोपरि संघर्ष करण्याच्या संकल्प सोडला.
१८५७ नंतर पुन्हा क्रांती होऊ नये, म्हणून ब्रिटिश सरकार विविध कायदे पारित करत चालले होते. त्यांच्यामार्फत दमणशाहीचा धडाका सुरू होता. त्याच कुटिल नीतीनुसार १८८२ला जंगल-कानूनपारित केला गेला, ज्याअंतर्गत आतापर्यंत सुरक्षित आणि जनजातींच्या ताब्यात असलेले जल, जमीन, जंगल आणि त्यातील खनिज संपत्ती इंग्रजांना हिसकावून घेता येणार होती. या कायद्याने जनजाती समाजात एक प्रकारे असंतोष निर्माण झाला आणि आपल्या अस्मितेसाठी त्यांनी असंघटित का होईना, मिळेल त्या हत्यारांनी एका दृष्टीने सामूहिक, परंतु प्रभावी नेतृत्वाविना संघर्ष प्रारंभ केला. त्याचवेळी देव, देश व धर्मरक्षणासाठी ही जुलमी सत्ता उखडून टाकली पाहिजे; आपल्या जल, जमीन, जंगलावर आपलाच अधिकार आहे आणि तो कायम राखणे, हीपण आपलीच जबाबदारी आहे. बिरसाच्या अशा अनेक ललकार्यांनी जनजाती क्षेत्र गरजू लागले. त्यातून अनेक तरुण त्याच्याभोवती जमू लागले. गुण ओळखून तरुणांची कार्य विभागणी केली. त्यांच्यामध्ये लढण्याचे व संघटन बांधणीचे कौशल्य निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण सुरू केले. युवकांची शक्ती तीन भागांत विभाजित केली.
एक संघटन, दुसरे आरोग्य व निकेतन आणि तिसरे सक्षम क्रांतिकेंद्र. याचा प्रत्यय यायला लागला. जमीनदार, सावकार यांच्याविरोधात आवाज उठू लागला. इंग्रज सरकारलाही जंगलात सहजासहजी प्रवेश बंद झाला. त्यातच १८९४ पडलेल्या भीषण दुष्काळात आरोग्य निकेतनच्या माध्यमातून जीवाची पर्वा न करता, आपल्या बांधवांना बिरसाने मदत केली. ज्याप्रमाणे ‘कोविड’च्या महामारीत संघविचारआधारित विविध संस्थांनी व केंद्र सरकारने जात, पात, धर्म न पाहता, केवळ माणुसकीच्या नात्याने सेवा केली; पण तथाकथित सेवेच्या आडून धर्मांतरित करणार्यांनी मात्र आपली मूळ प्रतिमा त्या काळातही जपलीच. हाच अनुभव बिरसाच्या गाठीशी असल्याकारणाने त्यांनी आपत्तीतही आपल्या बांधवांना आरोग्यतपासणी व सुधारासाठी चर्चच्या पुतनारूपी दवाखान्याच्या दावणीला बांधले नाही. त्यासाठी वनौषधींची माहिती करून घेतली आणि लोकांवर भगत, वैदू बनून उपचार केले. बिरसाच्या हातात दैवी शक्ती वास करते, या विश्वासाने, श्रद्धेने रुग्ण बरे होऊ लागले. लोक त्यांना हळूहळू देव समजू लागले. जो आपले दुःख निवारण्यासाठी आपल्यामध्ये वावरत आहे, असा अटळ विश्वास निर्माण झाला.
बिरसाचे उद्दिष्ट पक्के होते. आपला वनवासी बांधव सनातन हिंदूच राहिला पाहिजे, म्हणून या विविध आघाड्यांवर लढता लढता आपल्या समाजबांधवांना विधायक पद्धतीने सनातन रूढी-परंपरेची जोडून ठेवण्यासाठी आणि मुखत्वे ब्रिटिशांच्या कुटिल कारस्थानाला बळी न पडण्यासाठी बरोबरीने काम करणार्या सहकारी व त्यांच्या घरी असलेल्या महिला व बुजुर्ग लोकांसाठी बिरसाइत रूपी प्रमुख अशा १२ नियमांची लक्ष्मणरेखा आखून दिली, जी ‘बिरसाइत’ म्हणून प्रसिद्ध झाली आणि बिरसाला ‘धरती का आबा’ म्हणून मान्यता प्राप्त करून गेली.
१) ईश्वर आणि सिंगा बघा एकच आहे. २) गायीचे रक्षण करा. तसेच समस्त प्राण्यांवर दयाभाव दाखवा. ३) नशा करू नका. अशुद्ध भोजन घेऊ नका. ४) रोज आंघोळ करूनच कार्याला सुरुवात करा. साधे राहा, साफ-सुथरे, स्वच्छ राहा. आपल्या घरी तुळशी वृंदावन नक्की लावा. ५) मोठ्यांचा आदर करा. कुसंगतीपासून दूर राहा. ६) ख्रिश्चनांच्या मोहजालात फसू नका. ७) परधर्मापेक्षा स्वधर्म केव्हाही चांगला. ८) आपली संस्कृती, धर्म आणि आपल्या पूर्वजांप्रति श्रद्धा ठेवा. ९) धर्म, संस्कृती आणि आपल्या परंपरेला विसरल्यानंतर त्या समाजाची स्वतःची ओळख नष्ट होते. १०) एकजूट राहा. कधीही आपापसांत भांडू नका. ११) आठवड्यातून एक दिवस ‘सिंगा बोगा’ म्हणजे ईश्वराची पूजा करा आणि त्यादिवशी बैलांना नांगराला जुंपू नका. नांगर चालवू नका. १२) पूर्वजांनी आखून दिलेल्या गोत्रामध्येच लग्न व नाती निर्माण करा.
आपल्या या देवावर दिवसेंदिवस लोकांची श्रद्धा वाढू लागली. ‘बिरसा’ नावाचा दबदबा निर्माण झाला. स्थानिक इंग्रज प्रशासन, चर्च यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अंगावर वीज पडून ही बिरसा जिवंत राहिला; कारण तो देवाचा अवतार आहे, अशा खर्या-खोट्या वदंता ही इंग्रजांचे भय वाढवू लागले. त्यात १८९५ मध्ये एका लढाईदरम्यान बिरसा इंग्रजांच्या ताब्यात आला. त्याला अटक झाली; पण त्यांना राजद्रोहाचे आरोप सिद्ध न करता आल्याने दोन वर्षांनी सोडून द्यावे लागले. पण, त्या काळातही ‘उलगुलान’ची मशाल प्रखर तेजाने तेवत होती. कारण लोक विश्वास ठेवायला तयार नव्हते की, बिरसा तुरुंगामध्ये होता आणि आमच्यापासून दूर गेला होता.
लोक शपथेवर सांगत, तुम्ही आमच्यामध्येच वावरत होतात. त्या इंग्रजांना हा महाचेटूक करणारा कोणीतरी भूत आहे आणि आपण त्याच्यासोबत लढू शकत नाही, असे वाटून चर्चने सरकारला कळवून टाकले की, बिरसाच्या रूपात एक हिंदू राजा प्रभावी होत आहे आणि त्याची मनीषा हे ब्रिटिश सरकार भारतातून हकलवून देण्याचे आहे, तरी याचा बिमोड करण्यासाठी ब्रिटिश सरकारने सर्वतः प्रयत्न करावे. सरकारचे प्रयत्न सुरू झाले; परंतु १८९७ ते १९०० या काळात छोटा नागपूर येथे लढलेल्या अनेक लढायांत इंग्रजांना पराभवाची धूळ चाखावी लागली. भगवान बिरसा मुंडांच्या अलौकिक नेतृत्वाने छोटा नागपूर इंग्रजांच्या अधिपत्याखालून मुक्त होऊ लागला. जल, जमीन-जंगलावर पुन्हा आपला कब्जा निर्माण केला. सावकार, जमीनदार यांना सळो की पळो करून सोडले. धर्म, संस्कृती इतकी मजबूत करणे सुरू केले की, त्या आघाडीवर ही चर्च नामोहरम होऊ लागले.
परिस्थितीचा लेखाजोखा घेतल्यानंतर इंग्रज आपल्या कुटिल आणि नीच हरकतीवर स्वार झाले. १७५७च्या प्लासीच्या लढाईत सिद्ध झालेले आणि त्यानंतर अनेक वेळा वापरलेले गद्दार अस्त्र त्यांनी बाहेर काढले आणि बिरसाला रानटी ठरवून जो पकडून सरकारच्या ताब्यात देईल, त्याला ५०० रुपयांचे इनाम जाहीर केले. आपली ताकद बिरसा शक्तीला नेस्तनाबूत करण्यासाठी पणाला लावली. स्वतः गाफील राहायचे नाही, पण शत्रूला गाफील ठेवून गद्दारामार्फत ताब्यात घेणे, या दृष्टीने त्यांनी आपला फासा जानेवारी १९००ला डोमवाडी टेकडीवर बिरसा आपल्या अनुयायांशी विचारविमर्श करत असताना टाकला. अंतिम संघर्षाला सुरुवात झाली. एका बाजूला आधुनिक बंदुका आणि शस्त्रसाठा यांच्यासमोर, तर दुसर्या बाजूला बिरसा सेनेच्या तुटपुंज्या हत्यारांनी हल्लाबोल केला. परिणामस्वरूप इंग्रजांनी निर्दयतेने बायका-मुलांसह कत्तल प्रारंभ केली आणि शेवटी गद्दाराच्या आशाळभूत फितुरीला सलाम करत भगवान बिरसा मुंडाला दि. ३ फेब्रुवारी १९०० रोजी अटक करून रांची तुरुंगात बेड्या ठोकून ठेवले.
धरती आबाची लोकप्रियता इतकी होती की, सर्व क्षेत्र त्या बातमीने प्रक्षोभक झाले. इंग्रजांच्या लक्षात आले की भगवान बिरसा मुंडा यांना फाशी दिली, तर फार मोठा संघर्ष होईल. म्हणून त्यांनी त्यांचा अतोनात छळ प्रारंभ केला; पण त्यालाही जेव्हा यश येत नाही, असे दिसताच, त्यांनी आणखी एक कट रचला आणि त्यांच्यावर विषप्रयोग केला. त्यातच दि. ९ जून १९०० रोजी त्यांचा मृत्यू झाला. लोकांना बिरसा आजाराने मृत्यू पावला, असे सांगितले. पण, लोकांचा त्यावर कधीच विश्वास बसला नाही. अवघे २५ वर्षांचे अद्वितीय आणि अतुलनीय पराक्रम करत जगलेले जीवन धरती आबा, जनजाती समाजाचे आणि पर्यायाने राष्ट्रीय जनचेतनाचे प्रतीक झाले. वनवासी वीर, आदिवासींचा आवाज बुलंद करणारा, संघर्ष करायला लावणारा, राष्ट्रासाठी प्राण देणारा, कुशल संघटक, वीर योद्धा, सकारात्मक क्रांतीचा प्रणेता, हिंदू धर्मरक्षक भगवान बिरसा मुंडांचे स्वप्न अजूनही संपूर्णतः साकार झालेले नाही; ते साकार करण्यासाठी आपण सारे कटिबद्ध होऊया. पण, सजग राहून, कारण ज्या देश, धर्म आणि सनातन हिंदू धर्मासाठी जो भगवान होऊन लढला, त्याचे भगवानपद काही नास्तिक आणि विघ्नसंतोषी संघटनेला मान्य नाही. त्यामुळे तेही त्या गद्दाराप्रमाणे अराष्ट्रीय लोकांच्या हातात पुन्हा भगवान बिरसाला वर्तमानात सोपविण्यासाठी त्याचा उल्लेख क्रांतिसूर्य करत आहे.
बिरसा हा भगवान नसून एक मनुष्य होता, अशा प्रकारे वर्तमान जनजाती समाजात फूट पाडत आहेत. हेही षड्यंत्र लक्षात ठेवले पाहिजे. कारण, डाव्या विचारसरणी ईश्वर मानत नाहीत; पण त्यांना हे कुठे माहीत आहे की, बिरसा मुंडांना त्यांच्या हयातीतच सहकार्यांनी आणि वनवासी समाजाने ‘धरती आबा’ म्हणजे देव मानले होते. त्यामुळे जसे आपण ज्ञानेश्वरांना ‘माऊली’ मानतो, त्याप्रमाणे बिरसा मुंडा हे केवळ क्रांतिवीर नसून, ‘धरती आबा’च आहेत. त्यांचा जन्मदिवस दि. १५ नोव्हेंबर यापुढे ‘राष्ट्रीय जनजाती गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा एकदिलाने, एकजुटीने हिंदू म्हणून आपण सारे संकल्प करूया आणि केंद्र सरकारला तो घोषित करण्याचे आवाहन करूया, असे कल्याण आश्रमाने जगजाहीर केले.
आपल्या प्रस्तावाद्वारे सर्वमान्य करून घेतले. यानिमित्ताने विविध कार्यक्रम देशभरात केले. परिसंवाद चर्चा घडवून आणल्या. याचा परिणाम म्हणून या आवाहनाला प्रतिसाद देत २०२१ मध्ये केंद्र सरकार व भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. १५ नोव्हेंबर हा ‘जनजाती गौरव दिवस’ म्हणून जाहीर केलेला आहे. २०२५ हे भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्माचे १५०वे वर्ष आणि हे वर्ष सरकारने ‘समता वर्ष’ म्हणून ही घोषित केलेले आहे. त्यामुळे सर्व समाजांनी विशेष करून जनजाती समाजात काम करणार्या संघटनांनी हा दिवस अधिक उत्साहाने साजरा करत जनजाती समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवला पाहिजे.
- शरद चव्हाण
(लेखक वनवासी कल्याण आश्रमाचे प्रांत सह संघटन मंत्री, उत्तर बंग (बंगाल) आहेत.)