क्रांतिकारक विद्यापीठाचे कुलगुरू : लहुजी वस्ताद साळवे

    14-Nov-2025
Total Views |

Lahuji Vastad
 
वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी ‘जगेन तर स्वातंत्र्यासाठी आणि मरेन तर स्वातंत्र्यासाठी!’ अशी शपथ घेणारे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांच्या २३१व्या जयंती दिनानिमित्ताने क्रांतिकारकांच्या या महागुरूला त्रिवार वंदन करुन, त्यांच्या क्रांतिगाथेचा आढावा घेणारा हा लेख...
 
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील सशस्त्र क्रांतीचे जनक म्हणजे लहुजी वस्ताद साळवे होय. माणूस, माणुसकी आणि मानवतावाद यांचा ध्यास आणि श्वास असलेले मानवतेचे शिल्पकार लहुजी! अज्ञान, अन्याय, अत्याचार यांचा कर्दनकाळ म्हणजे लहुजी! अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा, चालीरिती, जातिभेद, लिंगभेद, धर्मभेद यांना समूळ नष्ट करून समतेचा विचार समाजमनांत रुजविण्यासाठी अतिशय निष्ठेने, प्रामाणिकपणे, प्रांजळपणे, निःस्वार्थीपणे कृतिशीलतेने प्रयत्न करणारे युगपुरुष म्हणजे लहुजी वस्ताद साळवे! ज्ञान, संस्कार, न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव म्हणजे लहुजी! न्यायाची चाड आणि अन्यायाविरुद्ध चीड हाच लहुजींचा स्थायीभाव होता. त्यांचे घराणे शिवछत्रपतींच्या अलौकिक कार्याशी जोडले गेले होते.
 
लढवय्ये कुटुंब
 
छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे सह्याद्रीच्या कडेकपार्‍यांत असलेल्या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ या गावात साळवे कुटुंबीय राहात होते. हे कुटुंब वंशपरंपरेने शूर धाडसी आणि शस्त्रविद्येत निपुण होते. या कुटुंबाचे शस्त्रकौशल्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पणजोबांना पुरंदर किल्ल्याचे रखवालदार आणि त्यांना ’राऊत’ ही पदवी देऊन खर्‍या अर्थाने सन्मान केला होता. या पदवीमुळे त्यांच्या वंशात पुढेही पेशवेकालीन राज्यातही राघोजी साळवेंपर्यंत ही जबाबदारी चालू राहिली. राघोजी हे शूर, पराक्रमी आणि संघर्षशील व्यक्तिमत्त्व होते. पुरंदर किल्ल्याभोवती असलेल्या घनदाट जंगलात त्यांचा वावर असायचा.
 
एकदा त्या जंगलात वाघ असल्याची कुणकुण लागल्यानंतर राघोजींनी त्याला ठार न मारता, त्याला पकडायचे ठरवले. त्या घनघोर जंगलात समोर आलेल्या वाघाशी झुंज देत, त्यांनी हातातील दांडयाने त्याच्या पुढच्या व मागील पायांवर जोरदार प्रहार करून जखमी केले. नंतर त्याला जेरबंद करून आणि मुसया बांधून त्याला आपल्या खांद्यावर घेऊन ते गावात आले. संपूर्ण गाव राघोजी आणि वाघाला पाहायला जमा झाले. ही बातमी पुण्याला पेशव्यांपर्यंत येऊन थडकली. पेशव्यांनी राघोजींचे तोंडभरून कौतुक करत त्यांना पर्वतीजवळ असलेल्या शिकारखान्याचे प्रमुख केले. अशा धडाडीच्या राघोजींच्या घरी लहुजींचा जन्म दि. १४ नोव्हेंबर १७९४ रोजी झाला. कालांतराने साळवे कुटुंब पुण्याच्या पूर्व भागातील जानाईच्या मळ्यात राहायला आले.
 
पुढे मल्हारराव होळकरांनी अचानकपणे चढाई करून पेशवे राज्यशकट हादरवून टाकत त्यांचा पराभव केला. गेलेली पेशवाई परत मिळवण्यासाठी थोरल्या बाजीराव पेशव्यांनी त्यांचे सहा हजार सैनिक आक्रमणकर्त्या इंग्रजांकडे ठेवून १८९२ मध्ये इंग्रजांशी तह केला. हा तह सर्व जनतेला आवडला नव्हताच. पेशव्यांना त्यांचे राज्य मिळाले, परंतु सर्व अधिकार इंग्रजांकडे गेले. याला दुसरा बाजीराव पेशवे वैतागले होते. गेलेली सत्ता परत मिळवण्यासाठी त्यांनी इंग्रजांबरोबर युद्ध करायची योजना तयार करून त्याचे नेतृत्व विश्वासातील बापू गोखले यांच्याकडे दिली. युद्धासाठी लागणारी शस्त्रात्रे, सामग्री आणि सैन्यासाठी जमवाजमव करून शस्त्रसज्ज राहण्याची जबाबदारी शस्त्रागारप्रमुख असलेल्या राघोजींकडे सोपवण्यात आली. त्यांनी अहोरात्र कष्ट करत अत्यंत निष्ठेने ही जबाबदारी पूर्ण केलीच आणि त्यासाठी राघोजींनी स्वतःबरोबरच त्यांची दोन्ही मुले-मोठा मुलगा शिवाजी आणि धाकटा लहुजी लढाईसाठी सिद्ध केले. दि. ५ नोव्हेंबर १८१७ रोजी लढाईला सुरुवात झाली, ‘खडकीचे युद्ध’ या नावाने ही लढाई इतिहासात प्रसिद्ध आहे.
 
जगेन तर स्वातंत्र्यासाठी आणि मरेन तर स्वातंत्र्यासाठी!
 
दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे सैन्य आणि इंग्रजांमध्ये घनघोर लढाई झाली. या लढाईत बापू गोखले यांच्या घोड्याला गोळी लागल्यामुळे ते मागे फिरले. सेनापतीच्या माघारीमुळे सैन्यात अस्थिरता पसरली. परंतु, तातडीने राघोजींनी पुढाकार घेतला. लढाई चालू असतानाच एक गोळी लागताच राघोजी घोड्यावरून खाली कोसळले. चवताळलेल्या इंग्रज सैनिकांनी त्यांना ठेचून मारले. हे दृश्य लहुजींनी आपल्या डोळ्यांनी पाहिले आणि तिथेच त्यांनी शपथ घेतली, ‘जगेन तर स्वातंत्र्यासाठी आणि मरेन तर स्वातंत्र्यासाठी!’ अवघे २३ वर्षांचे असलेल्या लहुजींना, इंग्रजांच्या गोळीला बळी पडून आणि त्यांच्या सैनिकांनी ठेचलेल्या वडिलांचा डोळ्यांसमोर झालेला मृत्यू जिव्हारी लागला होता.
 
इंग्रजांविरुद्ध मनात त्वेष निर्माण झालेल्या लहुजींनी जुलमी राजवट उलथावून टाकायची, असा निर्धार केला. शूर वडिलांच्या देखरेखीखाली तयार झालेल्या लहुजींची शरीरयष्टी मजबूत होती. ते तलवार, बंदूक, दांडपट्टा, छडीपट्टा, बोथाटी, भालाफेक अशी शस्त्रे चालवण्यात तसेच घोडदौड आणि मल्लविद्येतही तरबेज होते. या कमावलेल्या बेगमीतूनच इंग्रजांविरुद्ध सशस्त्र सेना तयार करण्याचे निश्चित करून १८२० साली त्यांनी पुण्याच्या गंज पेठेत आखाडा बांधून त्याचे उद्घाटन पुण्यातील प्रसिद्ध असलेले सरदार रास्ते यांच्या हस्ते झाले. लहुजींनी आखाड्यात कुस्ती, व्यायामाचे धडे देत तगडे मल्ल तयार करण्यास सुरुवात केली.
 
तरुण मल्लांना तब्येत कमावून, शस्त्रविद्येचे धडे देत, गुप्तपणे स्वराज्य मिळवण्याची शपथ देऊन अनेक तरुणांना क्रांतीसाठी सज्ज केले. त्या तालमीत खर्‍या अर्थाने क्रांतिविद्यापीठ आकाराला येऊ लागले. या क्रांतिविद्यापीठात अगदी हाकेच्या अंतरावर राहात असलेले जोतिराव फुले, उमाजी नाईक, पुण्याच्या मध्यवस्तीत असलेल्या गायकवाड वाड्यातून बाळ गंगाधर टिळक तसेच वासुदेव बळवंत फडके आदी तरुण लहुजींच्या देखरेखीत घडत होते.
 
शिक्षण प्रसारक लहुजी
 
या सर्वांचा एकमेकांशी विशेष स्नेह होता. याच कालावधीत आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांनीही इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले होते. त्यांना बंडासाठी लागणारी शस्त्रास्त्रे लहुजींच्या तालमीतून मिळत होती. लहुजी खर्‍या अर्थाने क्रांतिकारक विद्यापीठाचे कुलगुरू होते. आपल्यापेक्षा ३३ वर्षांनी लहान असलेल्या जोतिराव फुले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या मुलींच्या आणि अस्पृश्यांसाठी सुरू केलेल्या शाळेसाठी मदतीचा हात पुढे करत तत्कालीन सवर्णांचा विरोध मोडून काढण्यासाठी लहुजींचा मोठाच आधार मिळाला. लहुजींच्या प्रयत्नाने शाळेसाठी विद्यार्थीही मिळायला लागले.
 
दि. १५ मार्च १८५२ रोजी जोतिरावांनी सुरू केलेली तिसरी शाळा वेताळ पेठेत सुरू केली; तिथे महार-मांगांची मुलेसुद्धा शिकण्यास यायला लागली, ती लहुजींमुळेच. लहुजी मातंग समाजातील वस्त्यांमधील घरोघरी जाऊन, शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन, त्यांची मुले शाळेत पाठवण्याची विनंती करत, आर्जवे करत. लहुजी खर्‍या अर्थाने जोतिरावांच्या शाळेचे प्रचारक बनले. त्यांच्या प्रयत्नांतून शाळेच्या पटावर मुलांची मोठी भरती झाली. शाळेसाठी देणग्या आणि वर्गणी गोळा करण्याचे कामही लहुजींनी केले. अस्पृश्यांना आणि स्त्रियांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणार्‍या जोतिरावांना त्यांच्या या कार्यात लहुजींनी अखेरपर्यंत मदत केली.
 
समरसतेचे दूत
 
जोतिराव फुल्यांचे शाळेपासून असलेले गोविंद बल्लाळ गोवंडे हे ब्राह्मण मित्र बुधवार वाड्यातील सरकारी शाळेत एकत्र शिकत होते. ध्येयसिद्धीसाठी आणि उच्चतम जीवन जगण्यासाठी शारीरिक सामर्थ्य आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन हे दोघे मित्र मर्दानी खेळ खेळत, दांडपट्टा, तलवार, नेमबाजी यात ते प्रवीण झाले. लहुजी या दोघांचे या विषयातील गुरू होते. त्यांच्या हाताखाली क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी सैनिकी शिक्षण घेतले होते. जोतिराव दांडपट्टा चालवण्यात अत्यंत कुशल ठरले. त्यांचा दांडपट्ट्याचा खेळ पाहण्यासाठी लोकांची मोठी झुंबड उडत असे. त्यांची शरीरयष्टी रेखीव व उत्तम होती. फुल्यांचे इतरही मित्र मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम परांजपे हेही लहुजींच्या तालमीत येत असत.
 
इंग्रजांविरुद्ध सातार्‍यात उठावाचा कट केलेले रंगो बापू फितुरीमुळे, इंग्रजांनी केलेल्या धरपकडीतून निसटले. आपल्याविरुद्ध बंड करणारे तरुण पुणे, सातारा येथून येतात, असे इंग्रजांना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शोधमोहीम राबवली. लहुजींच्या हे ध्यानात येताच ते वेशांतर करून आपले कार्य बजावत राहिले. परंतु, नाथा, यशवंत, मल्ल्या, योरिया बाबिया इ. मांग समाजातील लढवय्ये इंग्रजांना सापडले. त्यांना नंतर फाशी दिली गेली. १८५७च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यातही लहुजींच्या शिष्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. १८५७च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यातही लहुजींच्या शिष्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. अशा या महान क्रांतिगुरूंना शत शत वंदन!
 - डॉ. सुनील भंडगे
(लेखक माजी प्रमुख, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आहेत.)