संभ्रमातून सत्याकडे : द ताज स्टोरी

    16-Nov-2025   
Total Views |
The Taj Story
 
ताजमहाल या वास्तूवरचा वाद नवा नाही. या वादावर अनेक पुस्तकेही लिहिली गेली आहेत. ताजमहालच्या निर्मितीमागे असलेले सत्य शोधण्यासाठी प्रवाहाच्या विरोधात जाऊन प्रश्न उपस्थित करणारी कथा म्हणजे ‘द ताज स्टोरी.’ हा चित्रपट, त्याची कथा, अभिनय अशा सर्वांगाने या चित्रपटाचा घेतलेला आढावा...
 
इतिहासाचा अभ्यास करताना आपण केवळ घटनाक्रम समजून घेणे अपेक्षित नसते, तर त्या पलीकडे या घटनांचा वर्तमानावर झालेला परिणाम, बदललेली समाजव्यवस्था आदींचे आकलन आणि अवलोकनही अपेक्षित असते. मात्र, इतिहास लेखनाची प्रक्रियाच जर विशिष्ट हेतूने केली असेल, तर सत्य उजेडात येत नाही. हे सत्य लोकांसमोर आणण्यासाठी, प्रवाहाच्या विरोधात सुर मारावा लागतो. ‘द ताज स्टोरी’ हा चित्रपट म्हणजे, अशाच प्रवाहाविरोधात पोहणार्‍या माणसाची गोष्ट होय. इतिहास लेखनाच्या क्षेत्रात देशविघातक वृत्ती कशा कार्यरत आहेत, यावरही यामध्ये नेमकं भाष्य करण्यात आले आहे.
 
२०२४च्या डिसेंबर महिन्यात उत्तर प्रदेशमधील संबल अनेक कारणांसाठी चर्चेच्या केंद्रस्थानी होतं. त्यातील एक महत्त्वाचा भाग होता जुन्या मंदिरांचा आणि मूर्त्यांचा शोध. १९७०च्या दशकामध्ये या भागात भगवान शंकराचे एक मंदिर कायमचे कुलूपबंद करण्यात आले. या मंदिराचे दरवाजे उघडायला ४० वर्षांहून अधिक काळ जावा लागला. वास्तविक एखाद्या विहिरीतून मूर्ती सापडणे, मशिदीलगतच्या भागात देवाची मूर्ती किंवा शंकराची पिंडं सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. भारतामध्ये आजतागायत असंख्य ठिकाणी हे प्रकार घडलेे आहेत. इथल्या मातीमध्ये जगलेली, घडलेली माणसं, ज्यांनी आपल्या आस्थेतून भगवंताची प्रतिमा साकारली, त्यांच्या भक्तीचे असे असंख्य विखुरलेले अवशेष आपल्याला जागोजागी बघायला मिळतात.
 
परकीय सत्तांची आक्रमणं, धर्मांतराचे विकृत प्रयोग, युद्धात केलेल्या लाखोंच्या कत्तली, यामुळे भारतभूमीला काळाच्या ओघात असंख्य वेदना सहन कराव्या लागल्या. या वेदना कमी म्हणून की काय, भारतावर वसाहतवादाचा वरवंटा फिरला आणि पुन्हा एकदा या भूमीच्या ललाटी संघर्षच कोरला गेला. इंग्रजांनी आर्थिकदृष्ट्या या भूमीचे शोषण तर केलेच, मात्र त्याचबरोबर इथल्या समाजामध्येही दुफळी माजवून, अंतर्गत संघर्षाची ठिणगी कायम पेटती राहील याची काळजी घेतली. स्वातंत्र्यानंतर तरी या भूमीला सुगीचे दिवस येतील, असा विचार करत या स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी बलिदान दिले. जगाला हेवा वाटण्याजोगी लोकशाही भारतामध्ये रुजू लागलीच होती, परंतु सत्तासंघर्षाच्या राजकारणाने अखेर इथेसुद्धा फणा उगारलाच.
 
स्वातंत्र्योत्तर काळात भारत सर्वार्थाने बलशाली होईल, अशी इथल्या कोट्यवधी जनतेची आशा होती. कष्टकरी, शेतकरी या सार्‍या श्रमिकांसाठी न्यायाचे राज्य उभे राहील, असा विचारही अनेकांनी केला. मात्र, दुर्दैवाने याही काळात एक राष्ट्र म्हणून, आपल्याला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. एका बाजूला भौतिकदृष्ट्या आपण स्वतंत्र असलो, तरीसुद्धा हे स्वातंत्र्य इथल्या कष्टकरी वर्गाचे नाही, याची प्रचिती सामान्यांना येत होती. वसाहतवाद्यांची सत्ता दूर गेली असली, तरीसुद्धा वसाहतवादी मानसिकता मात्र शिल्लक होतीच. या मानसिकतेतून शिक्षण क्षेत्रात जे निर्णय घेण्यात आले, त्याचे परिणाम पुढच्या अनेक पिढ्यांना भोगावे लागले. याच काळामध्ये डाव्या विचारसरणीच्या काही अभ्यासकांनी, संशोधकांनी, शिक्षण क्षेत्रांत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. राजकीय सत्ता पाच वर्षांनंतर बदलण्याची किमान शयता तरी असते, मात्र डाव्यांची सत्ता ज्या ज्ञानकेंद्रांवर होती, तिथे त्यांना विरोध करणारे कोसो दूर होते. शिक्षण व्यवस्थेने वास्तविक मुलांमधली चिकित्सा जागरूक करायला हवी, प्रश्न विचारण्यासाठी त्यांना प्रवृत्त करायला हवे, असा विचार अनेक तज्ज्ञ मांडतात. ‘द ताज स्टोरी; या चित्रपटाचा नायक विष्णुदास (परेश रावल) असाच एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो आणि केवळ सिनेमातच नव्हे, तर रुपेरी पडद्याच्या बाहेरसुद्धा वादांची वादळं उठतात.
 
ताजमहालाचा गाईड म्हणून काम करणारा विष्णुदास, ताजमहालच्या वास्तवासंदर्भात एक साधा प्रश्न विचारतो आणि सभोवतालची सगळी चक्रेच फिरतात. लाखो प्रेतांच्या ढिगार्‍यावर उभा राहिलेले मुघल साम्राज्य, आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. सत्ताप्राप्तीसाठी स्वकीयांचे रक्त जिथे पाण्यासारखे वाहत होते, तिथे प्रेमाचे प्रतीक म्हणून ताजमहाल उदयाला आला. एका बाजूला दारिद्—यापायी टाचा घासून मरणारे लाखो कष्टकरी आणि दुसर्‍या बाजूला प्रेमाचे प्रतीक म्हणून उभे राहणारे ताजमहाल, यातली विसंगती बोलकी आहे. ताजमहालाच्या याच निर्मितीप्रक्रियेमागचे खोदकाम आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला मिळते. या कलाकृतीचे वैशिष्ट्य म्हणजे निर्मितीमागचा अभ्यास आणि सप्रमाण मांडलेले तर्क. यामुळे कथानक बलशाली तर झालेच आहे, परंतु जो वेगळा विचार दिग्दर्शकाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा होता, तोदेखील पोहोचवण्यात त्यांना यश आले आहे.
 
नायकाच्या (परेश रावल) मनोभूमिकेचा वेध घेणारे पार्श्वसंगीत आणि गाण्यांमुळे चित्रपट उठावदार ठरतोे. प्रत्येक टप्प्यावर नव्याने कळणार्‍या गोष्टी, इतिहासाचे व वास्तवाचे सम्यक आकलन यातून पुढे जाणारा चित्रपट, रसिकांना गुंतवून ठेवतो. आपल्या अभिनय कौशल्याने कोट्यवधी प्रेक्षकांची मने जिंकणारे परेश रावल, याही सिनेमात अत्यंत तन्मयतेने आपली भूमिका बजावताना आपल्याला दिसतात. विष्णुदास या पात्राचं जे मर्म आहे, ते त्यांनी आपल्या अभिनयातून साकारल्याचे जाणवतेे. ताजमहालासारखा विषय हाताळताना, ऐतिहासिक वास्तवाचे गांभीर्य कमी होणे, काही प्रसंग अतिरंजित होणे, आदी गोष्टींचा धोका होताच. मात्र, दिग्दर्शकाने आणि लेखकाने या सार्‍या आव्हानांवर मात करत, अत्यंत सजगतेने चित्रपट तयार केला आहे.
ऐतिहासिक वास्तूला घटनेला किंवा व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला चित्रपट आणि वाद हे समीकरण रुढच झाले आहे. ताजमहाल या चित्रपटाच्या प्रदर्शनावरसुद्धा अशाच पद्धतीचा वाद काहींनी उकरून काढला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणारी काही मंडळी, ‘ताज’साठी मात्र गप्प बसली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट केल्यावर तरी किमान आपला अजेंडा यशस्वी होईल, असा विचार काहींनी केला. मात्र, उलट न्यायालयाने अशा प्रवृत्तींनाच फटकारले आणि कलाकृतीच्या बाजूने कौल दिला.
 
मागच्या दशकभरात भारतामध्ये, सांस्कृतिक पुनरुत्थान घडून आले आहे. सनातन धर्माचा विश्वविचार, भारतीय संस्कृतीचा मानवकेंद्रित दृष्टिकोन यांमुळे देशाच्या इतिहासाकडे बघण्याचीसुद्धा नवीन दृष्टी आपल्या लोकांना मिळाली. इथल्या संस्कृती आणि परंपरेकडे ज्यांनी तुच्छतादर्शक नजरेने पाहिले, अशा अनेकांवर आपले दुकान बंद करण्याची वेळ आली. कारण, लोकांनीसुद्धा जे जे अस्सल आहे, परंपरेच्या प्रवाहात आपलं सत्त्व टिकून आहे, अशाच गोष्टींचा स्वीकार करणे पसंत केले. ‘द ताज स्टोरी’ हा चित्रपट म्हणजे, याच मनोभूमीचे द्योतक आहे. केवळ नावापुरते लोकशाहीचे गुणगान गायचे आणि वास्तविक आयुष्यात उलट हुकूमशाही प्रवृत्ती दाखवायची, अशा अनेक प्रवृत्तींना यानंतर विष्णुदास सतावणारे प्रश्न विचारत राहणार, सत्य उजेडात आणण्यासाठी भांडत राहणार, हेच नव्या भारताचे ब्रीद असेल.

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.