वैश्विक सनातन धर्मराष्ट्र व्हावे हा भगवंतांचा संकल्प! (पूर्वार्ध)

    16-Nov-2025
Total Views |

Dnyaneshwar Maharaj
 
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०) जयंतीनिमित्त गत अडीच वर्षांपासून अहिल्यानगर येथे ‘श्री ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग सामूहिक चिंतन महाप्रकल्प’ सुरू आहे. ७५ वर्षांपूर्वी ‘वाङ्मयोपासक मंडळा’ने श्री ज्ञानेश्वरीचा नाथ संप्रदायाच्या दृष्टिकोनातून अभ्यास प्रकल्प केला होता. पुढचे पाऊल म्हणून, सर्वांगीण अभ्यास व्हावा व प्रामुख्याने राष्ट्रजागरणार्थ व राष्ट्रपुनरुत्थानाच्या दृष्टिकोनातून अभ्यास तथा चिंतन घडावे, यादृष्टीने प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. सुमारे २ हजार, ५०० पृष्ठांचा खंडात्मक ग्रंथ आकारास आहे. महाराष्ट्रातील अभ्यासक यात सहभागी आहेत. त्यानिमित्ताने प्रकल्पाचे आचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांचा लेख पूर्वार्ध व उत्तरार्ध अशा दोन भागांत देत आहोत.
 
मद् ज्ञानेश्वरी तथा भावार्थदीपिका हा ग्रंथ, महाराष्ट्राच्या मायमराठी बोलीभाषेतील ‘धर्मकीर्तन’ मंडन या स्वरूपातील भाष्य ग्रंथ आहे. श्रीमद्भगवद्गीतेतील प्रत्येक अध्यायाच्या अखेरीस ‘ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे’ असे म्हटले आहे. या निर्देशातून पृथ्वीवरील अर्थात विश्वातील मानवांच्या आध्यात्मिक आणि सामूहिक जीवनशैलीप्रणालीचा बोध केला आहे. श्रीकृष्ण भगवंतांना ब्रह्मविद्या अवलंबित सुव्यवस्थापित, आरोग्य आणि आनंदपूर्ण जीवनशैली अभिप्रेत आहे. श्रीमद्भगवद्गीता कथाप्रसंग, वैश्विक राष्ट्रातील ढासाळलेल्या जीवनमूल्यांचे निराकरण करून ‘ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे’प्रणित, सनातन धर्म-राष्ट्राचे पुनरुत्थापन करण्यासाठी घडला. श्रीकृष्णांची जगद्गुरूंची भूमिका त्यासाठीच आहे. ‘ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे’ अशा जीवनप्रणालीसाठी भगवान वेदव्यासांनी,
 
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नन्दनः|
पार्थोवत्सः सुधीरर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्॥
 
अशा स्वरूपात सनातन ज्ञानपरंपरा ज्या वेदोपनिषदांत, शास्त्रीय स्वरूपात मांडली आहे, त्या ज्ञानपरंपरेचे निष्कर्ष, सूत्ररूपाने पार्थास समुपदेशित केले. अर्जुनाची मनोवृत्ती, श्रीकृष्ण सख्याच्या सहवासात दृढ झालेली आहे, हे भगवंतांनी ओळखले होते. राष्ट्रपुनरुत्थान साधावयाचे तर अशा ‘ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे’ या संकल्पनेने काया-वाचा-मनाने, संकल्पसिद्ध राष्ट्रसेवक तथा योद्धे आवश्यक असतात, हे सनातन सत्य आहे. अर्जुन अशा मनोवृत्तीचा आहे; तथापि झाकोळलेल्या आणि संभ्रमित झालेल्या अर्थात ‘धर्मग्लानी’च्या अवस्थेत, मायामोहवशतेने हतबल झालेला आहे, हे भगवंतांनी ओळखले होते. अशा धर्मग्लानीवश, परंतु ‘ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे’ मनोवृत्तीने दृढावलेल्या राष्ट्रपायिकांना जागृत करण्याची आवश्यकता असते; त्यासाठी प्रत्यक्ष भगवंतमुखाने प्रकटलेले शाश्वत ज्ञान सर्वगत करण्याचा भगवान व्यासांचा हा खटाटोप!
 
श्रीमद् भावार्थदीपिका तथा श्री ज्ञानेश्वरी स्वरूपात ‘धर्मकीर्तन’ मांडण्याचा माऊली ज्ञानोबारायांच्या मुखाने, सद्गुरू निवृत्तीनाथांनी केलेला खटाटोप असा वैश्विक सनातन धर्मराष्ट्र घडविण्याच्या हेतूूनेच निःसंशयपणे घडला आहे! भगवंत आश्वासित करतात,
 
यदा यदा हि धर्मस्य, ग्लानिर्भवति भारत|
अभ्युत्थानम धर्मस्य, तदात्मानं सृजाम्यहम्॥
भ.गी.अ.४श्लो.७
 
‘ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे’ अशा सनातन धर्मराष्ट्राला अर्थात ‘भा+रत’ (भारत केवळ अर्जुनाचे एक नाव नव्हे) अशा अर्जुनासम ज्ञानरत लोकांना अर्थात तेजस्वी लोकांना मोहमायावशतेने या वैश्विक सनातन धर्मराष्ट्र जीवनशैलीचा विसर पडतो, तेव्हा भगवंत स्वरूपातील विभूतिमत्वे प्रकट होतात. भगवंताप्रमाणेच माऊलींचे प्राकट्य विचारात घ्यावे लागते. परकीय राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आक्रमणांचे सावट दाट होत असताना सुबत्ता, कलानिपुणता, रूढीग्रस्तता आणि पंथोपपंथाच्या पोथिनिष्ठ अभिनिवेशात, भ्रामक कल्याणप्रदतेत, ग्लानीवश झालेल्या राजा आणि प्रजा या दोन्हींनाही जागृत करण्यासाठी श्री ज्ञानेश्वरीचे अवतरण आवश्यक होते. तशीच अवस्था २१व्या शतकात विश्वाची झालेली आहे. याचसाठी भारताच्या स्वातंत्र्योत्तर अमृत काळात श्री ज्ञानेश्वरीचे पुनर्सामूहिक चिंतन आवश्यक आहे.
 
१) अर्जुन हे वैश्विक सनातन धर्मराष्ट्राचे प्रातिनिधिक विभूतिमत्व-
 
अर्जुनाचा उल्लेख ‘भारत’ या नावाने केला आहे. भारत हे केवळ एका भूप्रदेशाचे किंवा व्यक्तीचे नाव नाही. ‘भा+रत’ या शब्दात ‘भा’ म्हणजे तेज, प्रकाश किंवा ज्ञान होय. सच्चिदानंद रूपाची ही तिन्ही नावे होत. सच्चिदानंदमग्नतेने आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे ‘ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे’ अशा जीवनशैलीचा अभ्यास करावयाचा. हे केवळ नरदेहालाच शय आहे, असे सनातन मत आहे. श्रीमद्भगवद्गीतेवरील भावार्थदीपिकेत, माऊलींनी हे सांख्य, कर्म आणि आत्मसंयम योगांवर चर्चा करताना अधिक स्पष्ट केले आहे. समूहशील अशा मानवप्राण्याने ज्ञानात्मक कर्म केले पाहिजे, असे सतत सूचविले आहे.
 
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः|
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्॥
भ.गी.अ.४-श्लो.१३
 
नराच्या ठायी असलेल्या जीवात्म्याच्या योगाने अर्थात आत्मरुपाचा अंश म्हणजेच प्रत्यक्ष तत्त्वतः आत्मरुप हेच कर्ता वाटले तरी; प्रत्यक्ष आत्मरुप अलिप्त आहे. त्या आत्मरुपाच्या योगाने मानवमात्रांची व्यवस्था सर्वकल्याणात्मकतेने अर्थात एकात्मतेने मैत्रभावाने जगण्यासाठी निर्माण केली आहे. माऊली भाष्य करतात,
 
आतां याचिपरी जाण| चारही आहेती वर्ण|
सृजिले म्यां गुण| कर्मभागे॥ अ.४-ओ.७७
जे प्रकृतिचेनि आधारे| गुणाचेनि व्यभिचारे|
कर्मे तदनुसारे| विवंचिली॥” अ.४-ओ.७८
एथ एकचि हे धनुष्यपाणी|
परी जाहले गा चहूं वर्णी|
ऐसी गुणकर्मी कडसणी|
केली सहजे॥ अ.४-ओ.७९
 
अवघा मानव एक, परंतु सांख्यदर्शनातील चिकित्सेनुसार पुुरुष-बुद्धि/अहंकार/मन, वासना, विकार आणि प्रकृति-पंचमहाभूते, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, पंचतन्मात्रा आणि सत्त्वरजतम या त्रिगुणात्मकतेने वासना व विकारातून उद्भवलेले राग, लोभ, मोह, मद, मत्सर, द्वेष, असुया, तसेच माणसाठायीचे त्रिदोष, त्रिताप इ.च्या योगाने स्थल, काल, परिस्थितीप्रमाणे जी कर्मप्रवृत्ती होते; त्यांची व्यवस्था सर्व कल्याणाच्या दृष्टीने लावावी लागते. वैश्विक मानवाच्या कल्याणाचा, आनंदाचा, एकात्मभावाचा, विचार मानवी जीवनशैलीच्या ठिकाणी करावा लागतो. त्यासाठी ज्ञानात्मक कर्मतत्परता असलेले कर्तव्यनिष्ठधुरीण, रक्षक, प्रबोधक यांची गरज असते. कारण, कर्मयोगाची चर्चा करताना भगवंतांनी स्पष्ट केले आहे-
 
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः|
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते॥
भ.गी.अ.३-श्लो.२१
 
माऊली भाष्य करताना म्हणतात,
 
एथ वडील जे जे करिती| तया नाम धर्मु ठेविती|
तेचि येर अनुष्ठिती| सामान्य सकळ॥
अ.३-ओ.१५८
हे ऐसे असे स्वभावे| म्हणोनि कर्म न संडावे|
विशेषे आचरावे| लागे संती॥ अ.३-ओ.१५९
 
अर्जुन हा लोकधुरीण आहे. त्याला संत असे म्हटले आहे. तो वेदविहित कर्तव्य कर्म करू शकतो. तो प्रवृत्त झाला, तर अन्य साधारण लोक त्याप्रमाणे सिद्ध होतील. 
अर्जुनाला समोर ठेवून सुव्यवस्थापित समाज व राष्ट्र यांविषयी भगवंत समुपदेशन करीत आहेत.
 
२) कर्मअपरिहार्यतेमुळे स्वधर्माचे पालन हेच राष्ट्रोपयोगी -
 
माऊली श्री भगवंत मुखाने सांगतात,
 
जैसे स्वप्नामाजि देखिजे|
ते स्वप्निचि साच आपजे|
मग चेऊनियां पाहिजे|
तव काही नाही॥ अ.२-ओ.१३९
तैसी जाण माया| तूं भ्रमत आहासी वाया|
शस्त्रे हाणितलिया छाया| जैसी आंगी न रुपे॥ अ.२-ओ.१४०
 
असे असले तरी, शरीराठायीचे आत्मरुप (जीवात्मा) अविनाशीपणे जन्मोजन्मींचा प्रवास करतो. माऊली म्हणतात,
 
तैसे शरीरांच्या लोपी| सर्वथा नाशू नाही स्वरूपी|
म्हणऊनि तूं हे नारोपी|
भ्रांति बापा॥ अ.२-ओ.१४३
एवढेच नव्हे, तर श्रीकृष्ण भगवंत
मुखाने माऊली म्हणतात,
जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे| मग नूतन वेढिजे|
तैसे देहांतराते स्वीकारिजे|
चैतन्यनाथे॥ अ.२-ओ.१४४
 
कारण हा चैतन्यनाथ अविनाशी आणि अनंत आहे. तोच देहाकडून कर्मे घडवितो, हे लक्षात घ्यावे,
 
हा अनादि नित्यसिद्धु| निरुपाधि विशुद्ध|
म्हणऊनि शस्त्रादिकी छेदु|
न घडे यया॥ अ.२-ओ.१४५
 
माऊली श्रीकृष्ण मुखे सांख्यस्थिती प्रतिपादित करून सांगतात, जन्मल्या जीवाला कर्म करणे अपरिहार्य आहे. समूहशीलतेने जीवन कंठणार्‍यास माणसाने, वडिलांनी अर्थात श्रुतींनी विहित केलेले कर्म करणे एवढेच हातात असते,
 
म्हणोनि आइके पार्था| याचिपरी पहाता|
तुज उचित होय आता| स्वकर्म हे॥
अ.२-ओ.२६४
आम्ही समस्तही विचारिले|
तवं ऐसेचि हे मना आले|
जे न संडीजे तुवा आपुले| विहित कर्म॥
अ.२-ओ.२६५
 
कर्म अपरिहार्य आहे, तसे समूहशीलतेने अर्थात एकात्म राष्ट्रभावनेने जगताना, विहितकर्म अर्थात एकूण स्थल काल परिस्थिती, परंपरा, राष्ट्र तथा सामूहिक मानवी व्यवस्था या घटकांनी वेढलेल्या अवस्थेत, वाट्यास येणारे कर्म हा माणसाचा स्वधर्म असतो. स्वधर्मात कर्तव्यतत्परता, निरहंकारता, समरसता आणि सर्वकल्याणात्मकता असते. तेथे स्वसापेक्षता अथवा स्वार्थपरता किंवा कर्ता म्हणून अहंकारवशता असत नाही. अशा स्वरूपाच्या जीवधर्मकर्मानुसार कर्मतत्पर असणेच श्रेयस्कर असते. माऊली श्रीकृष्णमुखाने या प्रकारच्या प्राप्तकर्माला ‘विहितकर्म’ तथा ‘स्वधर्म’ या नावाने संबोधतात. विहितकर्म यज्ञ, दान, तप यांची अपेक्षा माणसाकडून करते, तर विहिततेनुसार निर्लेप कर्तव्यतत्परतेने स्वधर्मपालन करणे म्हणजे स्वाभाविक कर्तव्यकर्म तत्पर होणे होय. माऊली श्रीकृष्णमुखाने कथन करतात,
 
तरी स्वधर्मु एक आहे| तो सर्वथा त्याज्य नोहे|
मग तरिजेल काय पाहे| कृपाळुपणे॥
अ.२-ओ.१८२
माऊली दृष्टांत देऊन श्रीकृष्णमुखे सांगतात,
जैसे मार्गेचि चालतां| अपावो न पवे सर्वथा|
कां दीपाधारे वर्तता| नाडळिजे॥ अ.२-ओ.१८७
तयापरी पार्था| स्वधर्मे राहाटतां|
सकळकामपूर्णता| सहजे होय॥ अ.२-ओ.१८८
म्हणोनि यालागी पाही|
तुम्हां क्षत्रियां आणिक काही|
संग्रामावाचूनि नाही| उचित जाणे॥ अ.२-ओ.१८९
 
क्षत्रियांच्या वाट्यास राष्ट्र म्हणून समूहमनाने जीवन व्यतीत करताना, राष्ट्रव्यवस्थापन, राष्ट्रविस्तार, राष्ट्रजीवन कल्याण, राष्ट्रसंरक्षण या गोष्टींसाठी सतत संग्रामशीलच असावे लागते. हाच त्यांचा स्वधर्म होय. म्हणूनच माऊली श्रीकृष्णमुखाने सांगतात,
 
म्हणोनि स्वधर्म हा सांडसील|
तरी पापा वरपडा होसील|
आणि अपेश न वचेल| कल्पांतावरी॥
अ.२-ओ.२०१
 
स्वधर्माचरण करताना व्रतस्तता स्वीकारावी लागते, तरच जीवनात सच्चिदानंद अनुभूती घेता येते. ही व्रतस्तता निरुपित करताना माऊली श्रीकृष्णमुखाने सांगतात,
 
परी कर्मफळी आस न करावी|
आणि कुकर्मी संगति न व्हावी|
हे सत्क्रियाचि आचरावी| हेतूविण॥
अ.२-ओ.२६६॥
 
असे हेतूरहित कर्म कर्तव्यतत्परतेने करताना परमात्मा आपसुकच फल देतो. फल मिळतेच, हे श्रीकृष्ण भगवंत स्पष्ट करतात. ते फल कल्याणप्रदच अर्थात मोक्षकारकच असते,
 
हतो वा प्राप्स्यसिस्वर्गं| जित्वावा भोक्ष्यसे महीम्|
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय| युद्धाय कृत निश्चयः॥ भ.गी.अ.२-श्लो.३७
 
स्वधर्म आचरताना स्वधर्म कर्मतत्परतेचे स्वधर्मानुषंगिक फळ मिळतेच.
राष्ट्र म्हणून जीवन जगत असताना प्रत्येक समरस राष्ट्रघटकाने याच बाण्याने तत्पर व्हायचे असते, असे समुपदेशन भगवंतांनी केले आहे. कुरुकुलप्रणित सनातनधर्म-राष्ट्राचे पुनरुत्थान करावयाचे असेल, तर असे प्रत्येकाला स्वधर्मकर्मप्रवृत्त व्हावेच लागेल; असे वेदव्यास भगवंतमुखाने अर्जुनाच्या प्रातिनिधिक राष्ट्रपायिकत्वात्मक विभूतिमत्वाला समुपदेशित करीत आहेत.
 
३) वैश्विक सनातन धर्मराष्ट्र पुनरुत्थानासाठी धर्मकीर्तन -
 
श्रीमद्भगवद्गीता प्रसंगावर, शांतिकथेच्या स्वरूपात मांडलेल्या प्रवचन, निरुपण, कीर्तन स्वरूपातील भाष्य घडविणार्‍या, विधिनाट्यात्मक प्रसंगाची सांगता करताना माऊली म्हणतात,
 
किंबहुना तुमचे केले| धर्मकीर्तन हे सिद्धी गेले|
येथ माझे जी उरले| पाईकपण॥
अ.१८-ओ.१७९२
 
तुमचे धर्मकीर्तन केले म्हणजे कोणाचे? भगवान श्रीकृष्णांचे, निवत्तीनाथांचे, जाणकार श्रोत्यांचे, भगवान व्यासांचे की समकालीन,
 
तेथ यदुवंशविलासु| जो सकळकळा निवासु|
न्यायाते पोशी क्षीतीशु| श्रीरामचंद्र॥
अ.१८-ओ.१८०४
 
अशा यदुवंशकुलीन न्यायप्रिय, पृथ्वी पोशिंदा, सकळकळानिपुण अशा श्री रामचंद्र महाराजांचे, की नवनारायण अवतार लोककल्याणकारी नाथसंप्रदायाचे, की अमृतमंथन प्रसंगातून मोठ्या युक्तीने, अधर्माचे निर्दालन करून देव, मानवांसाठी अमृत प्रदान करणार्‍या शिवमहालयांच्या साक्षीने वसलेल्या आणि महर्षी अगस्त्य आणि ब्रह्मर्षी नारदमुनींनी आवाहित आणि स्थापित केलेल्या मोहिनीराजांचे, याचा विचार साकल्याने केला पाहिजे. या धर्मकीर्तनातून जो ग्रंथ प्रकट झाला, अर्थात भावार्थदीपिका तथा ज्ञानेश्वरी प्रकट झाली, त्या ग्रंथाविषयीचा माऊलींचा अभिप्राय फार महत्त्वाचा आहे. ते म्हणतात,
 
म्हणौनि तुम्ही मज संती| ग्रंथरूप जो हा त्रिजगती|
उपयोग केला तो पुढती| निरुपम जी॥
अ.१८-ओ.१७९१
 
माऊलींनी अभिप्राय निवेदिताना त्रैलोयाला पुढती उपयोग होईल, असा हा ग्रंथ वदविला असे म्हटले आहे. म्हणजे त्रैलोयात सर्वभूतमात्रांच्या कल्याणासाठी श्रुतिस्मृतिपुराणोक्त, दर्शनमान्य असा वैश्विक सनातन धर्मराष्ट्र जागरणार्थ, या ग्रंथाचा उपयोग होत राहील, असे माऊली स्पष्ट करतात. त्यानंतर विश्वात्मक देवाकडे अर्थात ‘सर्वोपकारी समर्थु सद्गुरू श्रीनिवृत्तिनाथु’ यांच्याकडे अर्थात ‘शांभवाद्वया’नुसार शिवांपासून ठायीच्या आत्मरुपाकडे, अर्थात उर्ध्वमूल परमेश्वराकडे, पसायदान मागतात तेही विश्वात्मक सनातन धर्मराष्ट्रासाठी होय. पसायदानात माऊलींनी, अज्ञानअंधार, अर्थात दुरितांचे तिमिर जावो, विश्वात मानवाच्या ठायीच नव्हे, तर भूतमात्रांच्या ठिकाणी स्वधर्माचा सूर्य अर्थात प्रखर ज्ञानमयता प्रकटो, सर्वांच्या वांच्छा आपापल्या परीने, स्वधर्माचरणाच्या मार्गाने पूर्ण होवोत, चंद्रावरलाही डाग नाहीसा होवो, अर्थात विद्वान, संत, ऋषी, साधु, सज्जन त्रितापमुक्त होवोत. त्यांचे तप सफल होऊन ते सर्व सत्निष्ठ जन होऊन, सर्वांचे सोयरे परस्परांचे स्वर्धानुसार, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक व्यवस्थेचे पायिक होऊन, हितसंबंध जपणारे होवोत आणि या ग्रंथातील समुपदेशनाने सर्वथा अर्थात त्रिकाल, वैश्विक सनातन धर्मराष्ट्र सुस्थित ठेवण्यात यशस्वी होवोत, असे दान मागितले आहे हे स्पष्ट आहे.
 
तुमचे धर्मकीर्तन, म्हणजे वैश्विक सनातन धर्मराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी कार्यरत असणार्‍या, होऊ शकणार्‍या परमेश्वर, सद्गुरू, लोक आणि लोकबंध संरक्षणाचे धुरिणत्व करणार्‍या राज्यकर्त्यांसाठी असे, या सर्वांचे धर्मकीर्तन होय.
हे धर्मकीर्तन भारतीय राष्ट्राचे धर्मकीर्तन आहे. भारतीय राष्ट्राने सनातनपणाने विश्वकुटुंबात्मक मानवता व्यवहाराचा ध्यास घेतला आहे. तोच राष्ट्र पाईकांचा स्वधर्म आहे. माऊली स्वतःच्यासंदर्भात ‘येथ माझे जी उरले| पाईकपण॥’ असे घोषित करतात. लोकजीवनातील राजापासून प्रजेपर्यंत, व्यष्टीपासून समष्टीपर्यंत प्रत्येक घटकाने या धर्मराष्ट्राचे पाईकपण निभावले पाहिजे. तामस वृत्तीने स्वार्थांधतेने खलत्ववृत्तीने आक्रमक, साम्राज्यवादी झालेल्यांची स्वार्थलोलुपता नष्ट करण्यासाठी युद्धास सिद्ध झाले पाहिजे. अशा तामस तथा राजस गुणाने आसुरी संपत्तीच्या आहारी जाऊन किंवा सत्त्वगुणाच्या योगाने केवळ मोक्षमार्गी झाल्यामुळे, लोकजीवन अंधःकारात, दुरितात ढकलले जाते. नाथसंप्रदायाची भ्रमंती या अंधःकारातून लोकमानसाला बाहेर काढून सर्वकल्याणात्मक वैश्विक मानवाचे पुनरुत्थान करण्यासाठीच आहे.
 
अनेकदा नाथसांप्रदायिक निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांनी श्रीमद्भगवद्गीताच लोकांसमोर मांडण्याची भूमिका का स्वीकारली, असा प्रश्न विचारला जातो. श्रीमद्भगवद्गीता मोक्षदायिनी आहे म्हणजे नेमके काय, या प्रश्नांना धर्मकीर्तन मांडून माऊलींनी मोहवशतेत, विलासात, कलात्मक आनंदमग्नतेत, रूढीग्रस्ततेत, पंथोपपंथात मोहवश झालेल्या अर्थात स्वधर्माविषयी ग्लानीग्रस्त झालेल्या राजापासून प्रजेपर्यंत सर्वांना जागृत करून सर्वंकश, साकल्याचा विचार करून स्वधर्मप्रवण होऊन सामरस्यपूर्वक, सर्वसमावेशक, सर्वसंरक्षक, सर्वकल्याणप्रद, लोकजीवन पुनर्स्थापित व्हावे, यादृष्टीने कुरुकुलीन द्रष्टे, भगवान व्यास यांनी मांडलेला श्रीमद्भगवद्गीतेचा प्रसंगच, वैश्विक सनातन धर्मराष्ट्र जागवू शकेल, हे लक्षात घेऊनच धर्मकीर्तन मांडले.
 
- प्रा. डॉ. अनिल सहस्रबुद्धे