नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अदानीचा मुद्दा उपस्थित करत अदानींनी ३२ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. अदानीमुळेच वीज महागली, असेही ते म्हणाले. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, "अदानी जी इंडोनेशियामध्ये कोळसा विकत घेतात आणि भारतात त्याचे दर दुप्पट होतात."
दरम्यान पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले, "लोकांची वीज चालू होताच पैसे अदानीच्या खिशात जातात. अदानीला भारताचे पंतप्रधान संरक्षण देत आहेत. जगातल्या इतर देशांमध्ये पण भारतात तपास सुरू आहे. अदानी यांना कोरा चेक देण्यात आला आहे. ते त्या चेकचा वाटेल तसा उपयोग करू शकतात. लोकांनी ३२ हजार कोटी रुपयांचा आकडा लक्षात ठेवावा. पंतप्रधान अदानींची चौकशी का करत नाहीत?" तसेच शरद पवारांच्या अदानीशी जवळीक असल्याच्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले, "शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीत, ते अदानींना संरक्षण देत नाहीत. म्हणूनच मी शरद पवारांना अदानीबद्दल प्रश्न विचारत नाही."
दरम्यान राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांवर प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, कोळशाच्या चुकीच्या किमती दाखवून अदानींनी आधीच विजेचे दर वाढवून जनतेकडून १२ हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. विजेच्या वाढत्या किमतीमागे अदानीचा हात आहे. यावर माध्यमे प्रश्न उपस्थित करत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. अशा बातम्यांमुळे सरकार पडते. आम्ही कर्नाटक आणि राजस्थानमधील लोकांना सबसिडी देत आहोत तर अदानी किंमत वाढवत आहे. ही पत्रकार परिषद फायनान्शियल टाईम्सच्या अदानीशी संबंधित बातम्या आणि कोळशाच्या वाढत्या किमतींबाबत राहुल गांधींनी घेतली होती.