संघविचारांच्या कसोटीवर महापुरुषांच्या विचारांचे केलेले मूल्यमापन या आणि अशा कितीतरी रमेश पतंगेंच्या साहित्यनिर्मितीच्या बाजू आहेत. भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, अब्राहम लिंकन, मार्टिन ल्युथर किंग या सगळ्यांच्या लिखाणाचे सार मानवतेच्या कल्याणाचे कसे आहे, याचे नवनीत रमेश पतंगेंनी वाचकांसमोर ठेवले. या लिखाणाला कृतिरूप आराखड्यांची जोड मात्र नेहमी होती!
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे उर भरून आणणारे सोहळे देशभरात सुरू असताना राजधानीतून एक बातमी आली आणि समर्थवाणीतल्या ‘आनंदवनभुवनी’ या शब्दाची आठवण झाली. ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि संविधानाचे भाष्यकार रमेश पतंगे यांना ‘पद्मश्री’ जाहीर झाल्याची ही बातमी होती. बातमी तेव्हाच बातमी होते, जेव्हा त्या बातमीत प्रत्येकाला हवे असलेले काही सापडते. रमेश पतंगे यांना मिळालेल्या ‘पद्मश्री’च्या बातमीतही असेच काही होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांना आणि त्यातल्या अंत:प्रवाहांनाच आपल्या विचारांची आणि आयुष्याची दिशा मानणार्या सगळ्यांसाठी हा क्षण रोमहर्षक असेल. देशाच्या गौरवस्थानांपैकी एक असलेल्या राष्ट्रपती भवनात भारताच्या सामर्थ्यशाली अशा तिन्ही युद्धदलांचे प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मश्री’ त्यांना प्रदान करण्यात येईल. लाखो देशवासीय हा सोहळा पाहात असतील.
मात्र, यातल्या हजारो लोकांनाही ‘पद्मश्री’ जणू आपल्याच हृदयावर विराजमान होत असल्याचा आनंद मिळेल. या पुरस्काराचे आणि रमेश पतंगेंनी जीवनभर मांडलेल्या विचारयज्ञाचे सारे सार यातच दडले आहे. संवादाला वजन येते जेव्हा तो आत्मसंवाद होतो. आत्मसंवाद लोकांचा होतो, तेव्हा तो जनसंवाद होतो. विचारांच्या प्रसाराची प्रक्रिया ही अशी असते. रमेश पतंगे अशा हातावर मोजता येईल अशा विचारवंतांपैकी, ज्यांचा आत्मसंवाद ‘जनसंवाद’ झाला. रमेश पतंगेंनी किती पुस्तके लिहिली आहेत, हे जरा सूची पाहून नक्कीच सांगता येईल. मात्र, पतंगेंनी मांडलेल्या विचारांतून प्रेरणा घेऊन किती जणांनी त्याला कृतिरूपतेची जोड दिली, याची काही मोजदाद करता येणार नाही. पतंगेंचे कार्य हे केवळ पांढर्यावर काळे करण्याचे नाही.
जो विचार कागदी पुस्तकांवरच राहून जातो, तो पराभूत होतो. मात्र, ज्या पुस्तकांमध्ये विचार प्रक्रिया बदलण्याची ताकद असते, ती पुस्तके ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘भावार्थदीपिके’सारखी सदैव तेवत राहतात. रमेश पतंगेंचे ‘मी, मनू आणि संघ’ पुस्तक त्यापैकीच एक. मुळात हे पुस्तक जेव्हा आले, तेव्हाचा काळ म्हणजे संघविचारांसाठी अत्यंत प्रतिकूल. वैचारिक विश्वात विखारी डावे आणि लबाड समाजवादी यांचा दबदबा असलेला तो काळ. दामू अण्णा दाते, प्रल्हादजी अभ्यंकर अशी पहाडासारखी मोठी माणसे या काळात ‘समरसता’ हा विषय महाराष्ट्राच्या विचारविश्वात रुजविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत होती. ‘दोन डॉक्टर एक आजार’ ही रमेश पतंगेंची त्या काळात लिहिलेली पुस्तिका आजही अनेकांना आठवत असेल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तिच्या सहयोगी संघटना या तथाकथित उच्चवणीर्र्यांनी आपला वैचारिका अजेंडा चालविण्यासाठी व समाजावरचा उच्चवर्णीय पगडा आणि पकड कायम ठेवण्यासाठीच चालविल्या जात आहेत, असा समज सर्वदूर पोहोचविण्यात बर्याच मंडळींना यश आले होते. समरसतेच्या कामाने आणि ‘मी, मनू आणि संघ’ या पुस्तकाने हे बेगड पुरते उतरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यावरून महाराष्ट्रात जो वाद निर्माण झाला, त्यात नामांतराच्या बाजूने असूनदेखील संघपरिवार आणि संघकार्यकर्त्यांच्याबाबत विखार पसरविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू होते. रमेश पतंगे, भिकूजी इदाते या दोन कार्यकर्त्यांनी या काळात जो संघर्ष केला तो ऐतिहासिकच!
‘विवेक’सारख्या मराठी भाषेत मोठ्या प्रमाणावर वाचक असलेल्या व संघसृष्टीसाठी दीपस्तंभाचे काम करणार्या साप्ताहिकाचे संपादन आणि त्याचबरोबर नव्या प्रवाहांचे आकलन करीत पुस्तकांचे लिखाण आणि या सगळ्याला जोड देशभर चाललेल्या व्याख्याने आणि परिसंवादांची. ‘विवेक’च्या संपादक पदावरून निवृत्त झाल्यानंतरही उरलेल्या दोन गोष्टी करण्यातच रमेश पतंगेंची दिनचर्या व्यापलेली असते. प्रवास आजही कमी झालेले नाहीत. विचारांना कृतिरूप आराखड्याची जोड हा त्यातला महत्त्वाचा भाग. गिरीश प्रभुणेंपासून नव्या दमाच्या नरसिंग झरेपर्यंत आणि सुवर्णा रावळांपासून योगिता साळवींपर्यंत सर्वांनाच रमेश पतंगे जवळचे वाटतात, यातच रमेश पतंगेंच्या विचारातली अनुकरणीयता जाणवत राहते. घरात कमालीची गरिबी, अंधेरीतील त्यावेळच्या गुंदवली नावाच्या गावात जन्म, घरी वडील शिलाईचे काम करणारे.
वडिलांच्या सोबतच रमेश पतंगे संघाच्या शाखेत जायला लागतात आणि त्यांचे जीवन संघमय होऊन जाते. समरसतेच्या विचारांनी भारावून जाऊन समरसतेने पतंगेंचे व्यक्तिमत्व उभे केले की, पतंगेंनी समरसतेच्या संकल्पनेचा विकास केला, हे आता सांगणे अवघड. अव्याहतपणे वाचन, चिंतन, लिखाण संघविचारांच्या कसोटीवर महापुरुषांच्या विचारांचे केलेले मूल्यमापन या आणि अशा कितीतरी रमेश पतंगेंच्या साहित्यनिर्मितीच्या बाजू आहेत. भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, अब्राहम लिंकन, मार्टिन ल्युथर किंग या सगळ्यांच्या लिखाणाचे सार मानवतेच्या कल्याणाचे कसे आहे, याचे नवनीत रमेश पतंगेंनी वाचकांसमोर ठेवले.‘कुंभकार की कृती होकर निर्माण बन गया’ अशी एक ओळ वाजपेयींच्या कवितेत आहे. ‘पद्मश्री’ रमेश पतंगे यांचे अभिनंदन करताना ती आठवल्याशिवाय राहात नाही.