अंगणवाडी सक्षमीकरणावर सरकारचा भर

    12-Jan-2023
Total Views |


अंगणवाडी सक्षमीकरणावर सरकारचा भर


मुंबई : सामाजिक संस्था आणि लोकसहभागाच्या माध्यमातून राज्य सरकारने महाराष्ट्रातील अंगणवाड्यांचे सक्षमीकरण करण्याच्या कार्यक्रमाला गती दिली आहे. राज्यातील अंगणवाडी केंद्र सामाजिक संस्थांना दत्तक देऊन त्या माध्यमातून त्यांचे बळकटीकरण करण्यावर सरकारने भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभाग आणि सामाजिक संस्थांमध्ये बुधवार, दि. ११ जानेवारी रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे. करार करण्यात आलेल्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून एकूण ५० अंगणवाड्या बळकट होण्यास मदत होणार असल्याची भावना महिला आणि बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली आहे.
 
 
महाराष्ट्र सरकारसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘जनकल्याण समिती’सह, ‘युनायटेड वे मुंबई’, ‘सुरक्षा चॅरिटेबल ट्रस्ट’, ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्ट’, ‘भव्यता फाऊंडेशन’ आणि ‘लायन्स क्लब ऑफ जुहू’ यांच्यामध्ये बुधवारी झालेल्या ‘सामंजस्य करार’ (एमओयू) अंतर्गत ५० अंगणवाड्या दत्तक देण्यात आल्या आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या दालनात या करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. यावेळी एकात्मिक बालविकासच्या आयुक्त रुबल अग्रवाल, महिला व बालविकास विभागाचे उपसचिव वि.रा.ठाकूर, अवर सचिव खान, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे उपायुक्त विजय क्षीरसागर,जनकल्याण समिती कोकण प्रांत अध्यक्ष अजित मराठे, ‘युनायटेड वे मुंबई’चे अनिल परमार, ‘सुरक्षा चॅरिटेबल ट्रस्ट’चे जय कुमार जैन, ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्ट’चे जयराम शेट्टी, ‘भव्यता फाऊंडेशन’चे कुनिक मणियार, ‘लायन्स क्लब ऑफ जुहू’चे अंकित अजमेरा उपस्थित होते.
 
 
मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “सरकार आणि सामाजिक संस्थामध्ये करण्यात येत असलेल्या करारानुसार पुढील दहा वर्षांसाठी शासनाला सहाय्य करण्यासाठी संस्थांनी अंगणवाडी दत्तक घेतल्या आहेत. जनकल्याण समिती मुंबईतील १२ अंगणवाड्या, ‘युनायटेड वें मुंबई’ कर्जतमधील २० अंगणवाड्या, ‘सुरक्षा चॅरिटेबल ट्रस्ट’ यांनी वडाळामधील तीन, ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्ट’ यांनी पश्चिम उपनगर येथील पाच, ‘भव्यता फाऊंडेशन’ यांनी मुंबई उपनगर घाटकोपर येथील पाच अंगणवाड्या, ‘लायन्स क्लब ऑफ जुहू’ यांनी मुंबई उपनगरातील पाच अशा ग्रामीण व शहरी मिळून एकूण 50 अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत.
 
दत्तक घेतलेल्या कालावधीत या अंगणवाड्यांचे नूतनीकरण, रंगकाम, फर्निचर, क्षमता वाढ, आरोग्य तपासणी,सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर उपक्रमांची जबाबदारीदेखील ‘जनकल्याण समिती’द्वारे घेण्यात येणार आहे,” असेही लोढा यांनी यावेळी विशेषत्वाने नमूद केले.
 
हे काम सरकारच्या देखरेखीखालीच : लोढा
“राज्य सरकारने केवळ अंगणवाड्यांच्या बळकटीकरणासाठी सामाजिक संस्थांना सोबतीला घेतले आहे. एखादे काम जर लोकसहभाग आणि सर्वांच्या सहकार्याने अधिक चांगल्या प्रकारे केले जाऊ शकत असेल, तर त्यात गैर काय आहे? राज्यातील एक लाख दहा हजार अंगणवाड्यांच्या सक्षमीकरणाचे ध्येय आम्ही उराशी बाळगले असून त्यासाठी आम्ही प्रयनशील आहोत. यात कुठेही सरकार आपल्या जबाबदारीपासून दूर जात नाही. सरकार आपले दायित्व योग्यप्रकारे सांभाळत आहे. आम्हाला सरकार म्हणून जे करायचे आहे, ते आम्ही योग्यरीतीने करत आहोत. अंगणवाड्यांची जबाबदारी जरी सामाजिक संस्थांवर देण्यात आली असली, तरी हे सर्व काम सरकारच्या देखरेखीखालीच होणार आहे,” असे महिला आणि बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले.
वस्ती परिवर्तनासाठी आमचे प्रयत्न
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून आम्ही सरकारच्या सहकार्याने अंगणवाड्यांचे बळकटीकरण करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. मुंबई आणि इतर भागात अशा अनेक दुर्गम आणि अतिदुर्गम वस्त्या आहेत जिथे मूलभूत सुविधांसाठीही नागरिकांना संघर्ष करावा लागतो. या वस्त्यांमध्ये जनकल्याण समिती कार्यरत असून त्या भागातील नागरिकांच्या आयुष्यात आवश्यक ते सर्व बदल करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.आता सरकारच्या सहकार्यांनी अंगणवाद्यांचा चेहरा मोहरा बदलण्याची संधी चालून आली असून या माध्यमातून संपूर्ण वस्ती परिवर्तनासाठीच आमचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
 
- अजित मराठे, प्रांत अध्यक्ष, जनकल्याण समिती कोकण
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.