मुंबई : कोरोना निर्बंध पूर्णपणे हटवल्यानंतर यंदा सर्वच जण उत्साहात गणेशोत्सव साजरा करत होते. "या अशा उत्साहाच्या प्रसंगी प्रभादेवी येथे जे घडले ते झाले नसते तर बरे झाले असते"अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे. मी सर्वांनाच आवाहन करतो की पुन्हा अशा गोष्टी घडू नयेत यासतघी प्रयत्न करावेत. दादर प्रभादेवी भागात उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली त्याच प्रकरणी आता आ. सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'आवाज करणार तर ठोकणारच, आज पेंग्विन सेनेला स्वतःची लायकी समजलीच असेल', अशा प्रकारची फेसबुक पोस्ट करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील संतोष तेलवणे या कार्यकर्त्याला ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही हाणामारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी या प्रकरणी २५ जणांवर गुन्हा दाखल केला होता.
सदा सरवणकरांनी आपल्याकडील पिस्तुलाने गोळीबार केल्याचा आरोप केला जात होता, तो फेटाळून लावत आपण असले काहीच केले नाही मला बदनाम करण्याचे हे सवच षडयंत्र असल्याचा आरोप सरवणकरांनी केला. अशा प्रकारचे प्रकार परत होऊ नयेत यासाठी सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भान बाळगावे आणि असे प्रकार पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यावी असे आवाहन सदा सरवणकरांनी केले आहे.